रूग्णांचं सरंक्षणॽ कुणापासूनॽ

रूग्णांचं सरंक्षणॽ कुणापासूनॽ

आरोग्य सेवा हा मल्टीनॅशनल उद्योग आहे. भारतीय डॉक्टर्स विदेशात सेवा देतात, तसेच तिकडचे रूग्ण स्वस्तात सेवेसाठी भारतात येतात. विचार करा, किती प्रचंड बाजारपेठ आहे ही! बाजारपेठेची स्वाभाविक लक्षणं असतात. बाजारपेठेच्या चलनवलनात ‘कंझ्युमर’चं हित राखण्यापेक्षा ‘गिऱ्हाईकं’ गाठणं महत्त्वाचं असतं. आरोग्याच्या बाजारपेठेतही हे घडतं. येथे औषधांच्या बाजारपेठेचं उदाहरण पाहू.

बाजारपेठेत सातत्यानं नवी औषधं येतात. त्यासाठी संशोधनं सुरू असतात. जलद आराम मिळावा, तसेच औषधांचे दुष्परिणामही टाळावेत हा या संशोधनांचा हेतू. औषधं बाजारात येण्यापूर्वी विविध कसोट्यांवर पारखली जातात. त्यातली महत्त्वाची चाचणी असते – मानवी शरीरावरचा परिणाम अभ्यासने. अशा परिक्षणांचे शारिरिक-मानसिक दुष्परिणाम असू शकतात.

रूग्णांचं या दुष्परिणांमांपासून सरंक्षण व्हावं, यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कायदे-निकष आहेत. या निकषांनुसार ‘क्लिनिकल ट्रायल्स’ अनिवार्य आहेत. या चाचण्या वेळखाऊ असतात. कोविडची लस तयार झाली, तेव्हा या लसींचं परिक्षण कितपत, कधी, कोणावर झालंयॽ याबाबतच्या चर्चा आठवून पहा.

जलद परिणाम व निर्धोक औषधांची मागणी कायम राहते. त्यामुळं औषध कंपन्याही नवी औषधं बाजारात आणत असतात. नवनवी उत्पादनं आणल्यानेच कंपन्या बाजारात टिकून राहतात. त्यामुळे आडमार्गाने क्लनिकल चाचण्यांचा परिपाठ उरकण्यासाठी कंपन्या धजावतात.

मागणीनुसार पुरवठा या न्यायानं मग गरीब देशातील नागरिकांवर चाचण्या होतात. अशा चाचण्या करून देणाऱ्याही कंपन्या अस्तित्त्वात आहेत, या कंपन्या स्थानिक डॉक्टरांशी संगनमत करतात. काही भ्रष्ट डॉक्टर्स रूग्णांची संमती न घेताच चाचणीपूर्व औषधं रूग्णांच्या माथी मारतात. रूग्ण या व्यवहारात अनभिज्ञ असतात. समजा रूग्णांना औषधांचे दुष्परिणाम जाणवले, तरी कायदेशीर लढाईची क्षमता नसते.

बऱ्याचदा विविध ब्रँडमधील चढाओढीतही औषधं बाजारात येतात. ही होड इतकी तीव्र असते की, कंपन्यांना क्लिनिकल ट्रायल्सच्या पायऱ्यांचा अडसर वाटतो. अशा कंपन्यांना भारतासारखे देश सोईचे वाटतात. कारण आपल्याकडे मनुष्यबळ व वैद्यकीय चाचण्यांची यंत्रणाही स्वस्तात मिळते. फार्मास्युटिकल कंपन्यांच्या स्पर्धेत सामान्य रूग्णांचा बळी जातो. योग्य चाचण्यांचे निकष पूर्ण न करताच बाजारात आलेल्या औषधांबद्दल जागरूकताही नाही.

आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्यांच्या नजरेआड वरीलसारखे प्रकार चालतात. त्यावर नियंत्रण यायचं तर रूग्ण सुरक्षिततेबाबत जागरूकता यावी. हा आहे ‘वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे’ चा उद्देश.

Prashanat khunte