• मोफत/सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी.. साथी हेल्पलाईन 94 22 32 85 78
‘करोना’ची म्हणजेच ‘कोव्हिड’ची लागण झाली आहे का हे पाहण्यासाठी आता काही वस्त्यांमध्ये आरोग्य खात्याचे कर्मचारी येऊन कोव्हिड-टेस्ट करत आहेत. रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांना त्यांच्या घरीच वेगळ्या खोलीत अलग राहायला ते सांगतात. हे शक्य नसलेल्यांना सरकारच्या ‘कोव्हिड केअर सेंटर’ मध्ये १४ दिवस दाखल करतात. असे दाखल करायला काही ठिकाणी गैरसमजापोटी विरोध होतो आहे. काही ठिकाणी या विरोधी अफवाही पसरल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या चाचण्या करणं आणि ‘कोव्हिड केअर सेंटर’ मध्ये काही जणांना दाखल करणं याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे ते थोडक्यात समजावून घेऊयात.

कोव्हिडची लागण झालेल्यांचे लवकरात लवकर निदान होण्याची फार गरज असते. एक तर कोव्हिडची लागण झालेल्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून त्यांच्यापैकी कोणामध्ये काही गंभीर गुंतागुंत झाली तर ती वेळेवर ओळखून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येते. दुसरे म्हणजे कोव्हिडची लागण झालेल्यांना इतरांपासून वेगळे ठेवले म्हणजे विलगीकरण केले तर इतरांचा लागणीपासून बचाव होतो. जेव्हा कोव्हिडची लागण झालेल्याला वेगळ्या खोलीत ठेवण्याइतके घर मोठे नसते तेव्हा त्याला दहा ते चौदा दिवस सरकारी कोव्हिड-केंद्रात ठेवण्याची गरज असते. थोडक्यात ही चाचणी करणे आणि गरज असल्यास लागण झालेल्याला सरकारी कोव्हिड-केंद्रात भरती करणे हे नागरिकांच्या हिताचे आहे.

टेस्ट करतात म्हणजे काय करतात?

तर कापूस गुंडाळलेल्या निर्जंतुक काडीने नाक आणि घशातील स्रावाचा नमुना (स्वाब) घेतात आणि त्यावर टेस्ट करून रिपोर्ट देतात. कुटुंबाच्या आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण करायला हवे. या टेस्टविषयी असा गैरसमज पसरला आहे की कोव्हिडची लागण न झालेल्या माणसाला तो कोव्हिड-पॉझिटिव्ह आहे असे खोटे सांगून त्याला विनाकारण कोव्हिड-सेंटरमध्ये दाखल करतात. यामागे कोव्हिड-सेंटरचे कॉन्ट्रॅक्टर, भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे कारस्थान आहे असा आरोप केला जातो. खरी परिस्थिती अशी आहे की कोव्हिड बाबतचे खोटे रिपोर्ट दिले जात नाहीत. मात्र आरोग्य-खात्याने केवळ तोंडी नव्हे तर लेखी रिपोर्ट द्यायला हवा. नाहीतर ‘खोटे रिपोर्ट’चे आरोप होतच राहतील.

या टेस्ट बाबत दुसरी तक्रार म्हणजे पहिल्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर दुसरी ‘पीसीआर’ नावाची टेस्ट करायला सांगतात आणि ती मात्र अनेकदा पॉझिटिव्ह येते. त्यामुळे या टेस्ट करण्याबाबत काहीतरी गडबड आहे असे अनेकांना वाटते. हा गैरसमज का आहे हे थोडक्यात समजावून घेऊयात.

वस्त्यांमध्ये जाऊन आरोग्य-कर्मचारी करत असलेल्या टेस्टला ‘रॅपिड अँटीजेन-टेस्ट’ म्हणजे ‘जलद-टेस्ट’ असे म्हणतात. तिचा फायदा असा की तिचा रिपोर्ट लगेच, अर्ध्या तासात मिळतो. पण तिची मर्यादा अशी की कोव्हिड-लागण असूनही टेस्ट झालेल्यांपैकी अर्ध्या लोकांच्या बाबतीत रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोव्हिड-लागण झाली असण्याची शक्यता खूप आहे आणि त्याचे निदान ताबडतोब करायची गरज आहे अशा वेळी ही जलद टेस्ट केली जाते. उदा. समजा एखाद्यामध्ये दम लागण्यासारखी गंभीर कोव्हिड-आजाराची लक्षणे आहेत पण पीसीआर टेस्ट केलेली नाही. या पेशंटला कोव्हिड-वॉर्डमध्ये दाखल करण्याआधी ही जलद-टेस्ट करतात. किंवा समजा एखाद्या वस्तीत करोनाच्या खूप केसेस सापडल्या आहेत. अशावेळी त्या वस्तीतल्या आणखी ज्यांना लागण झाली आहे अशांना लगेच हुडकून लगेचच इतरांपासून वेगळे करण्याची गरज असते. तेव्हा अशा वस्तीतील लोकांची रॅपिड टेस्ट करतात. तसेच ती निगेटिव्ह येऊनही डॉक्टरांना वाटले की या व्यक्तीला कोव्हिडची लागण झाली आहे तर दुसरी, अधिक खात्रीलायक पीसीआर टेस्ट करतात. पण तिचा रिपोर्ट मिळायला एक-दोन दिवस लागतात. वरील सर्व बाबी लक्षात घेता जलद टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला पण दुसऱ्या पीसीआर टेस्टचा पॉझिटिव्ह आला तर त्याबाबत संशय घेऊ नये.

तिसरे म्हणजे ‘कोव्हिड केअर सेंटर’ मधून रुग्णाला घरी परत पाठवायच्या आधी आता पुन्हा टेस्ट करत नाहीत यामुळेही काही जण संशय घेतात. पण तज्ज्ञ सांगतात की, ‘लक्षणे दिसल्यापासून १० दिवसांनी बहुसंख्य रुग्णांकडून इतरांना लागण होण्याचे बंद होते’.

एकंदरित पाहता हे लक्षात घ्यायला हवे की ज्या वस्त्यांमध्ये कोव्हिडचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत तिथे शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये ही जलद टेस्ट जरूर केली पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त कोव्हिड-बाधित व्यक्तीचे लवकरात लवकर निदान होईल. त्यांना योग्य वेळेत सल्ला देणं, औषधे देणं हे करता येईल. तसेच त्यांना इतरांपासून लगेच अलग राहायला सांगून कोव्हिडच्या प्रसाराला आळा घालायला मदत होईल. हे लक्षात घेता सर्वांनी आपल्या भागा/वस्तीमध्ये येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करायला हवे.

डॉ. अनंत फडके हे ‘जन आरोग्य अभियान, महाराष्ट्रा’चे समन्वयक आहेत. लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

जर एखादी व्यक्ती कोव्हिड – 19ने आजारी असलेल्या व्यक्तीच्या सहवासात आली असेल आणि जरी तिला काही त्रास नसला तरी तिला घरात किंवा घरी शक्यच नसेल तर सरकारने सोय केलेल्या ठिकाणी सतरा दिवस इतर माणसांपासून वेगळे ठेवतात. त्याला ‘क्वारंटाईन / विलगीकरण करणे’ असे म्हणतात.

क्वारंटाईन / विलगीकरणम्हणजे काय?

जर एखादी व्यक्ती कोव्हिड – 19ने आजारी असलेल्या व्यक्तीच्या सहवासात आली असेल आणि जरी तिला काही त्रास नसला तरी तिला घरात किंवा घरी शक्यच नसेल तर सरकारने सोय केलेल्या ठिकाणी सतरा दिवस इतर माणसांपासून वेगळे ठेवतात. त्याला ‘क्वारंटाईन / विलगीकरण करणे’ असे म्हणतात.

जर एखादी व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह असेल आणि तिला सौम्य त्रास असेल तर तिला आपल्या घरात किंवा सरकारने सोय केलेल्या ठिकाणी आयसोलेशनमध्ये ठेवतात.

या व्यक्तींपासून इतरांना संसर्ग होऊ न देणे आणि करोनाची साखळी तोडणे हा याचा मुख्य उद्देश असतो.

आपण यापुढे ‘क्वारंटाईन अथवा विलगीकरण / आयसोलेशन’ यासाठी ‘क्वारंटाईन’ हा शब्द वापरणार आहोत.

जिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्या व्यक्तीमध्ये दहा दिवसात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि त्यानंतर तिच्यापासून दुसर्‍या व्यक्तीला करोनाची लागण होत नाही. म्हणून सरकारी सोय जिथे असते तिथून त्या व्यक्तीला दहा दिवसांनी घरी सोडतात. तसेच बहुसंख्य व्यक्ती सतरा दिवसात ताप/ खोकला/ अशक्तपणा यातून बाहेर पडतात व त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हायचे दहा दिवस अधिक सात दिवस खबरदारी म्हणून असा क्वारंटाईनचा सतरा दिवसांचा कालावधी असतो.

क्वारंटाईनचा अजून हा उपयोग असा आहे की कोव्हिड पॉझिटिव्ह पेशंटवर लक्ष ठेवणे आणि गरज भासल्यास त्याला तत्काळ हॉस्पिटलला हलवणे.

कुणाला क्वारंटाईन केले जाते?

  • ज्या व्यक्ती दुसर्‍या ‘कोव्हिड – 19 बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आल्या आहेत,  मग त्यांना त्रास असो वा नसो. त्यांची टेस्ट झाली नसली तरी.
  • कोव्हिडची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे; ज्यांना ताप खोकला आहे पण गंभीर लक्षणे नाहीत असे पेशंट.

कोव्हिड – 19साठी क्वारंटाईन / विलगीकरण आपआपल्या घरात करू शकतो का?

जर तुमचं घर तुम्ही एका खोलीत स्वतंत्रपणे २४ तास एकटे राहू शकत असाल एवढं मोठं असेल तर. आणि टॉयलेटही स्वतंत्र आहे तर तुमचे क्वारंटाईन घरात अगदी सहज होऊ शकते नव्हे तसेच करावे. एकच काळजी घ्यायची. तुमचा संपर्क इतरांना होऊ नये. पण जर ते शक्यच नसेल तर मात्र सरकारने सोय केलेल्या ठिकाणी, क्वारंटाईन करावे.

कृपया आमच्या घरात सोय आहे असे खोटे सांगून आरोग्य यंत्रणांना फसवू नका. तुम्ही तुम्हाला स्वतःलाच फसवत आहात हे लक्षात घ्या. घरी विलगीकरणाची सोय करता येत नसली तरी घरी थांबताना आपल्यामुळे आपल्या घरच्यांना -शेजारच्यांनाच कोव्हिडची लागण होणार आहे हे लक्षात घ्या. म्हणून घरी सोय होत नसेल तर सरकारने जिथे सोय केली आहे तिथे जा.

आपल्या घरात विलगीकरण करताना ही काळजी घ्यावी.

  • आजारी व्यक्ती व इतर सर्वांनी सतत मास्क लावायला हवा. (कापडी मास्क)
  • दर आठ तासांनी मास्क बदलायचा आहे. मास्कऐवजी तीन पदरी रुमाल/ कापड चालेल.
  • आजारी व्यक्तीने वापरलेला मास्क तसेच त्या व्यक्तीने वापरलेले कपडे तसेच त्या व्यक्तीच्या जेवणाची भांडी साध्या साबण पाण्यात पंधरा वीस मिनिटे बुडवून ठेवली तर ते कपडे इतर कपड्यांबरोबर साबणाने धुता येतात. (कोव्हिडचा व्हायरस साबण पाण्यात पटकन मरून जातो.)
  • आजारी व्यक्तीने त्याच्या खोलीतच जेवण घ्यावे. दिवसभर वेगळ्या खोलीत आणि संध्याकाळी कंटाळा आला म्हणून टीव्ही बघायला इतरांबरोबर असं नको.
  • आजारी व्यक्ती एकटीच घरात नको. एक तरी इतर व्यक्ती आजारी माणसावर लक्ष ठेवायला आजूबाजूला हवी. किंवा ऐनवेळी कुणीतरी धावून येईल अशी व्यवस्था हवी.

व्यक्ती घरात क्वारंटाईन असताना एकच बाथरूम व संडास कसे वापरता येईल?

शक्यतो क्वारंटाईन / विलगीकरण घरी केले गेले तर त्या माणसाला वेगळी रूम, बाथरूम वा टॉयलेट असावी. पण भारतात अशी चैन काहींनाच शक्य आहे. मग त्या कुटुंबात एकच बाथरूम व संडास कसा वापरायचा?

बाथरूम व संडासमध्ये ब्लिचिंग पावडर घातलेल्या पाण्याची (1 % सोडियम हायपोक्लोराईट याचे पाच लिटरचे कॅन उपलब्ध असतात) वेगळी बादली ठेवावी. ज्याला क्वारंटाईन/ विलगीकरण केले आहे त्याने ती बाथरूम व संडास वापरण्याआधी आणि नंतर (जमीन, कडी, नॉब व भिंती) या पाण्याने धुऊन घ्याव्यात. क्वारंटाईन/ विलगीकरण केलेल्या व्यक्तीने जाता-येता इतरांपासून कमीत कमी सहा फूट अंतर राहील हे बघावे.

काय झाले तर क्वारंटाईनमधल्या व्यक्तीला तत्काळ कोव्हिड सेंटरला घेऊन जायचे?

  • श्वास घ्यायला त्रास होणे/ दम लागणे.
  • छातीत दुखू लागणे, दाब वाटू लागणे.
  • गुंगी येणे/ शक्तीपात झाल्यासारखे वाटणे.
  • ओठ, हाताची नखे निळसर पडणे.
  • जर पल्स ऑक्सीमीटर असेल तर,

– 94 वा त्या खाली रीडिंग येणे.
– चार पाचने रीडिंग खाली जाणे (नेहमी समजा 98 असेल आणि ते 94 झाले तर),
– खोलीतल्या खोलीत सहा मिनिटे चालून जर रीडिंग चार पाचने कमी झाले तर.

डॉ. अरूण गद्रे हे ज्येष्ठ स्रीरोग तज्ज्ञ व लेखक आहेत.

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही. This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.

कोव्हिड १९ च्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने विशिष्ट काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जसे की तोंडाला मुखपट्टी अर्थात मास्क लावणे, वारंवार साबणाने व सॅनिटायझरने हात धुणे…

मास्क का वापरावा?

जगभरातील अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की कोव्हिड १९ चा प्रसार मुख्यतः नाका-तोंडातून उडालेल्या तुषारांमार्फत होतो. मास्क वापरल्याने हा प्रसार बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतो. जेव्हा केव्हा घराबाहेरील व्यक्तीशी किंवा बाहेरून येणाऱ्या घरातील व्यक्तीशी जवळून संपर्क येतो तेव्हा लागण होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे अशा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. सर्व लोकांनी मास्क योग्य प्रकारे वापरला तर साथ नियंत्रणात राहायला बरीच मदत होईल.

मास्क कोणी, कधी व कुठे वापरावा?

सध्याच्या काळात घराबाहेर पडताना मास्क हा आपल्या इतर पेहरावाचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. ऑफिस किंवा कार्यालये, भाजी मंडई, सुपर मार्केट, सार्वजनिक वाहने, लिफ्ट, सार्वजनिक शौचालये, बँक, क्लिनिक्स, अशा सर्व ठिकाणी मास्क वापरावा. एखादा माणूस ओळखीचा तर आहे किंवा एखाद्या माणसाला कुठलीच लक्षणे दिसत नाहीत मग कशाला मास्क घालायचा असा विचार करून, आपण नातेवाईंकाकडे गेल्यावर किंवा मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना, सहकार्यांबरोबर बोलत असताना, फोनवर बोलताना नकळत मास्क गळ्यापाशी उतरवतो. असं करणं चुकीचं आहे. अनेकांना कोव्हिड असूनही त्याची कुठलीच लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येकच वेळी संसर्गाचा धोका असू शकणार अशी खूणगाठ मनाशी बांधून मास्क सतत वापरला पाहिजे. एकत्र जेवताना, चहापाणी करताना मास्क घालणं शक्य नसतं.

अशा वेळी एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखायला पाहिजे. शक्यतो एकत्र येण्याचे कार्यक्रम, विशेषतः बंदिस्त ठिकाणी एकत्र येण्याचे कार्यक्रम आवर्जून टाळायला पाहिजेत. जर कोणाच्या घरात कोव्हिड रुग्ण असेल, किंवा लागण झाल्याची शंका असेल तर अशी व्यक्ती, रुग्णांची काळजी घेणारे, रुग्णांच्या घरातील इतर नातेवाईक किंवा रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्ती अशा सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे.

मास्क कसा वापरावा?

  • सुती कपड्याचा मास्क वापरत असाल तर तो कमीत कमी तीन पदरी असावा. इलॅस्टिक आणि दोरी असलेले असे दोन्ही प्रकारचे मास्क येतात. दोरी असल्यास नीट बांधावी. वरची दोरी कानावरून डोक्यावर आणि खालची दोरी मानेच्या मागे बांधावी. इलॅस्टिक असल्यास ते पुरेसे घट्ट/आपल्या मापाची आहे ना बघावे, सैल नसावे. खूप सैल किंवा खूप घट्ट मास्क वापरू नये. सैल मास्क नाकावरून खाली घसरतो. खूप घट्ट मास्क असेलं तर श्वास घ्यायला अडचण येते आणि मग बोलताना मास्क सारखा खाली घेतला जातो. काही लोक मास्क बऱ्याचदा नाकाखाली ठेवतात. त्यामागे कारणं असू शकतात. गुदमरतं किंवा बोलताना अडचण होते किंवा मास्क सैल असतो वगैरे. पण मग अशाप्रकारे मास्क वापरण्याचा फारसा उपयोगच होत नाही.
  • मास्क घालताना नाक, तोंड आणि हनुवटी सर्व व्यवस्थित झाकले जाईल ह्याची काळजी घ्यायला हवी. नाक आणि गालाकडचा भाग उघडा राहत नाही ना ह्याकडे लक्ष द्यायला हवे. एकदा मास्क घातल्यावर सतत वर खाली करू नये, बोलत असताना नाकाच्याखाली किंवा गळ्यात लटकवून ठेवू नये. सुती मास्क रोजच्या रोज धुवून आणि वाळवूनच वापरले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाकडे मास्कचे ३-४ संच असणे केव्हाही चांगले. खराब किंवा ओला झालेला मास्क वापरू नये. स्वत:चा मास्क स्वत:च वापरावा, इतरांचा मास्क वापरू नये.
  • डिस्पोजेबल मास्कचा वापर पुन्हा पुन्हा अजिबात करू नये. मास्क काढताना तो आधी मागच्या बाजूने सैल करावा आणि काढावा. मास्क काढताना मास्कच्या बाहेरील भागाला हात लावू नये. मास्क काढल्यावर हात साबण पाण्याने लगेचच धुवावेत. एकदा वापरलेला मास्क साबणाने धुऊन, पूर्ण वाळल्यावरच पुन्हा वापरावा.
  • मास्क जर कोव्हिड पेशंट / पेशंटची काळजी घेणारे / पेशंटच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीने वापरलेले असतील तर अशा वेळी १% सोडियम हायपोक्लोराइट द्रावण वापरून मास्कचे निर्जंतुकीकरण करावे किंवा कागदी पिशवीमध्ये ७२ तास ठेवून नंतर त्याची विल्हेवाट नेहमीच्या कचऱ्यात करता येईल.
  • व्यायाम करत असताना काही वेळेला मास्कमुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्यामुळे मास्क न घालता असे व्यायाम करायचे असतील तर समुहाने किंवा एकत्रितपणे व्यायाम करण्याचे टाळावे.

मास्क तर वापरायचा आहेच पण बरोबरीने वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवणे, साबणाने हात वरचेवर धुणे, बंद खोलीत खूप वेळ एकत्र बसायचे टाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे ह्यासारख्या गोष्टी पुढील काही काळ तरी नियमितपणे करत राहाव्या लागणार आहेत. ही सर्व काळजी पण सर्वांनी घेतली तरच कोव्हिडपासून आपला बचाव व्हायला तसेच कोव्हिडची साथ नियंत्रणात आणायला मदत होईल.

डॉ. रितू परचुरे ‘प्रयास आरोग्य गट’, पुणे येथे ‘सिनिअर रिसर्चर’ म्हणून काम करतात.

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.

मी सुमन पुजारी. गेली १७ दिवस कोव्हिडचा अत्यंत भीषण असा अनुभव घेऊन मी घरी परतले आहे. हा काळ माझ्यासाठी जीवन मरणाचा होता. शरीराला आणि मनालाही असंख्य वेदना…

मी सुमन पुजारी. गेली १७ दिवस कोरोनाचा अत्यंत भीषण असा अनुभव घेऊन मी घरी परतले आहे. हा काळ माझ्यासाठी जीवन मरणाचा होता. शरीराला आणि मनालाही असंख्य वेदना झाल्या. आपलं जगणं किती मोलाचे आहे हे मत्यूच्या दरवाजावरून परतल्यानंतर मला कळले. एक प्रकारे माझा हा पुनर्जन्मच झालाय. मागच्या सात आठ महिन्यांपासून कोरोनाबद्दलच्या बातम्या मी ऐकत होते. याची काळजी कशी घ्यायची हे मला माहिती होते. तरीही त्या विषाणूने कुठल्या तरी बेसावध क्षणी मला गाठले आणि माझ्यासोबत माझ्या आप्तस्वकीयांची जणू परीक्षाच त्याने घेतली. मात्र ही लढाई जिंकण्यात आम्ही यशस्वी झालो याचे समाधान आहे.

..आणि कोरोनाची लागण झाली

५ सप्टेंबरचा तो शनिवारचा दिवस नेहमीसारखाच उजाडला.  त्या दिवशी ‘आशा वर्कर्स संघटने’ची जिल्हा परिषदेवर निदर्शने होते. त्याची मी तयारी करीत होते. सकाळी आशा सांगलीत जमत असल्याचा निरोप मला मिळत चालला होता. आज आंदोलनात काय करायचे याची जुळवाजुळव सुरू झाली होती. आणि साडेदहाच्या सुमारास मला श्वास घ्यायला त्रास होतोय असे वाटायला लागले. मी कॉम्रेड शंकर पुजारींना याबद्दल सांगितले. त्यांनी मला धीर दिला आणि काही डॉक्टरांशी बोलायला सुरुवात केली. मी डॉक्टरांना काय होतय हे थोडक्यात सांगितले. त्यांनी मला पुण्यातील मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. कॉम्रेड शंकर यांनी आशांच्या आंदोलनाची जबाबदारी घेतली आणि मी रुग्णालयात जायचे ठरवले. माझी मुलगी शरयू आणि जावई विशाल बडवे यांनी मला रुग्णालयात भरती केलं. सुदैवानं तिथं बेड उपलब्ध होता. किमान सहा दिवस राहावे लागेल असे त्यांनी मला भरती होताना सांगितले. त्यामुळे काही दिवस इथंच राहावे लागणार याची मानसिक तयारी माझी झाली होती. मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काहीच वेळात मला ऑक्सिजन लावण्यात आला. इतर वेळा आपल्या निसर्गात असणारा मुबलक ऑक्सिजन आपल्याला जीवंत ठेवत असतो, त्याची किंमत मला आता कळायला लागली होती. त्या दिवशी रात्रभर मी तळमळत होते. आठवणींचा, माझ्या माणसांचा विचार करणे सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लेक शरयू मोबाईलचा चार्जर देण्यासाठी आली आणि देऊन निघून गेली. ती जाण्यासाठी मागे वळली तेव्हाही मला पुन्हा पुढचे काही आठवडे भेटणारचं नाही अशी शंकादेखील मनाला शिवली नाही. त्यानंतर जो काही तिच्याशी संपर्क होता तो मोबाईलच्या माध्यमातून. 

तब्येत ढासळतच गेली..

पहिले दोन दिवस मी ऑक्सिजनच्या साहाय्याने प्रकृती सुधारण्याच्या मागे होते. दरम्यान माझी सीटी स्कॅन करण्याचे ठरले होते. त्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णवाहिका उभी होती. तिथपर्यंत जाण्यासाठी व्हिलचेअर मिळाली नाही आणि त्यामुळे मला चालत जावे लागले. रुग्णवाहिकेमधून आम्ही जिथे पोहोचलो तिथेही मला चालतच जावे लागले. परिणामी माझी धाप वाढली. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये परतले होते तेव्हा माझा त्रास वाढला होता. बेडवर पडल्यानंतर काही वेळाने मला शौचाला जावे लागले. मी तिथल्या मावशींना तसे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘समोरच आहे टॉयलेट, जाऊन या’. मी चालत गेले. काही वेळानंतर मला कमोडवरून उठताच येत नव्हते. कशीबशी मी बेसीनपर्यंत पोहोचले आणि मला तिथे झटका लागल्यासारखे झाले. तो मला आलेला स्ट्रोक होता. टॉयलेटचा दरवाजा उघडाच असल्यामुळे तिथले कर्मचारी धावत आले. त्यांनी मला व्हिलचेअरवरून बेडपर्यंत आणले. त्यानंतर काही काळ मला काहीच आठवायचे बंद झाले. मला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यात किती वेळ गेला हे मला आठवत नाही. पण मला जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या नाका तोंडावर व्हेंटिलेटर होते. त्यातूनच माझा श्वासोच्छवास सुरू होता. आता हाच व्हेंटिलेटर पुढचे अनेक दिवस माझ्या तोंडावर राहणार असल्याची कल्पना मला नव्हती. या काळात माझे शरीर अत्यंत थंड पडत चालले होते. माझ्या रक्तात गुठळ्या तयार होऊ शकत होत्या. ज्यामुळे तो खूप मोठा धोका होता. मला फारसा खोकला नव्हता पण उबळ यायची. एकदा रक्तही आले. व्हेंटिलेटर सलग तीन-चार तास असायचे. त्यानंतर थोडेसे पाणी दिले जायचे. सततच्या व्हेंटिलेटरमुळे माझ्या तोंडात अजिबात लाळ जमा होत नव्हती. दिवसभरात मला तीस इंजेक्शन्स लावण्यात आली होती.

त्यानंतर पुजारींनी पुण्याच्या डॉ. अनंत फडके आणि कोल्हापूरचे डॉ. शरद भुताडिया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी, मी ज्या रुग्णालयात दाखल होते तेथील डॉक्टरांशी ओळख काढण्याचा सल्ला दिला, ओळख काढण्यात आली. सदर डॉक्टर कॉम्रेड शंकर यांना ओळखत होते. पेशंट क्रिटिकल असल्याचे त्यांनी सांगितले पण डॉक्टरांनी बराच धीर दिला. माझी प्रकृती स्थिर होती. सुधारणा होण्याची शक्यता होती. माझी काळजी घेणारे केवळ कुटुंबातलेच नाहीत तर याच हॉस्पिटलमधील ही डॉक्टर मंडळी, नर्स, ब्रदर्सही आहेत याची जाणीव झाली. खचायचे नाही, हेच प्रत्येकजण सांगत होता. एके दिवशी मला खूप भरून आले. माझ्या डोळ्यातले पाणी पाहून एक मावशी म्हणाल्या, ‘तुम्ही बऱ्या होऊन घरी जाव्यात, म्हणूनच आम्ही काम करतोय.’

टोसीलीझँबइंजेक्शन ठरले वरदान!

आणखी एक उपाय म्हणून ‘टोसीलीझँब’ नावाचे इंजेक्शन द्यावे लागणार होते. मात्र या इंजेक्शनचे साईड इफेक्ट्सही होते. यातून शरीरातील इम्यूनिटी खूप वाढवली जाते आणि ती कमी करण्यासाठी काही वेळानंतर दुसरी दोन इंजेक्शन्स् द्यावी लागणार होती. टोसीलीझँब या इंजेक्शनची किंमत ४० हजार ५०० होती. याचे किती डोस द्यावे लागणार याची कल्पना कुणालाच नव्हती. दुसरे म्हणजे या इंजेक्शनचा तुटवडा होता. अखेर हे इंजेक्शन देण्याचा निर्णय माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतला. बऱ्याच प्रयत्नानंतर हे इंजेक्शन सांगलीत उपलब्ध झाले आणि अखेर रात्री बारा वाजता मला हे इंजेक्शन देण्यात आले. त्या रात्री माझी लेक शरयू आणि जावई विशाल रात्रभर हॉस्पिटलच्या बाहेर जीव मुठीत धरून बसले होते. हे इंजेक्शन दिल्यानंतर माझ्यावर नेमका काय इफेक्ट झालाय याची धास्ती त्यांना होती.

सकाळी जाग आली तेव्हा मला बरे वाटू लागले होते. मी सहाच्या सुमारास शरयूला फोन केला. मला बरे वाटत असल्याचे सांगितल्यानंतर तिच्या आवाजात झालेला बदल मला आनंद देणारा होता. तू आता नक्की बरी होऊन बाहेर येणार असे ती म्हणाली. त्यानंतर डॉक्टरांनी टोसीलीझँब इंजेक्शनचा आणखी डोस देण्याचे ठरवले आणि पुढील ट्रिटमेंट सुरू झाली. याचा चांगला परिणाम माझ्या प्रकृतीवर होत होता. खूप अशक्तपणा होता. अंगात त्राण उरले नव्हते. असे दहा बारा दिवस गेले. हळूहळू माझ्या तब्येतीत सुधारणा होत गेली.

कोव्हिड योद्ध्यांना सलाम !

१७ दिवसांच्या खडतर उपचारानंतर मला डिस्चार्ज मिळाला. या काळात माझ्या वॉर्डमधील अनेकांनी प्राण सोडला. एखादा पेशंट दगावल्यानंतर आतमध्ये जी आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ होते ती जीवघेणी असते. आपण केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश न आल्याचे शल्य डॉक्टरांसह सर्वांनाच असते. त्यांच्या पीपीई कीटच्या आतमध्ये त्यांचे पाणावलेले डोळे कुणाला दिसत नाहीत. ही माणसं आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत. त्यांचे मनोबल टिकवणे खूप गरजेचे आहे. आयुष्यात निसर्गाइतकेच प्राण वाचवण्याचे काम हे कोव्हिड योद्धे करीत आहेत. त्यांच्या या समर्पण वृत्तीला माझा सलाम.

रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे मी वाचले. या काळात माझे नातेवाईक, चळवळीतील असंख्य कार्यकर्ते, अनेक ज्ञात अज्ञातांनी माझ्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानते. आता माझी तब्येत सुधारत आहे. अशक्तपणा आहे. पुढचे काही दिवस मला विश्रांती घ्यावी लागणार आहे. मी पुन्हा लवकरच चळवळीच्या कामासाठी सक्रिय होईन याची मला खात्री आहे. तुम्हीही कोरोनापासून स्वतःला दूर ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. लढेंगे, जितेंगे!!!

संबंधित डॉक्टर रुग्णालयाचे नाव गोपनीय ठेवले आहे.

सुमन पुजारी ह्यामहाराष्ट्र आशा वर्कर्सगटप्रवर्तक संघटना (आयटक)’च्या जनरल सेक्रेटरी आहेत.

बहुतांश लोक घरी ट्रीटमेंट घेऊन बरे होतात. अजिबात घाबरू नका. कोव्हिड झालेल्या १० पैकी ९ जण हॉस्पिटलमध्ये दाखल न होता घरी ट्रीटमेंट घेऊन बरे होतात. काळजी मात्र सर्वांनी घ्यायला…

.    बहुतांश लोक घरी ट्रीटमेंट घेऊन बरे होतात.

  • अजिबात घाबरू नका. कोव्हिड झालेल्या १० पैकी ९ जण हॉस्पिटलमध्ये दाखल न होता घरी ट्रीटमेंट घेऊन बरे होतात.
  • काळजी मात्र सर्वांनी घ्यायला पाहिजे.
  • रिपोर्ट मिळाल्यावर सरकारी किंवा खाजगी डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • तुमची लक्षणे व एकंदर परिस्थिती पाहता आणखी काही टेस्ट करायच्या का ते तुम्हाला सांगतील.
  • तसेच कोणती औषधे घ्यायची ते सांगतील;
  • उदा.- ताप कमी करण्यासाठी ‘पॅरासिटॅमॉल’ची गोळी दिवसातून गरजेप्रमाणे तीन ते चार वेळा घ्यायला सांगतील.
  • कोरडा खोकला, ताप, उलट्या इ. पैकी त्रास असल्यास डॉक्टर त्यासाठी गोळ्या/ औषध सांगतील.

२. असे असेल तर विशेष काळजी घ्यायला हवी.

  • वय साठ पेक्षा जास्त असेल किंवा डायबेटिस, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, दम्याचा आजार असे इ. पैकी आजार असेल तर विशेष काळजी घ्यायला हवी.
  • उदा.- ‘डायबिटीस’ असेल तर रक्तातील साखर परत तपासायला हवी, जादा ब्लडप्रेशर असेल तर परत ब्लडप्रेशर तपासायला हवे.
  • आपण घेत असलेली औषधे व त्यांचा डोस बरोबर आहेत ना याची डॉक्टरमार्फत परत खात्री करा.
  • दम लागायला लागला तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी ताबडतोब सरकारी किंवा खाजगी डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • खरं तर दम लागेपर्यंत वाट न बघता पल्स ऑक्सीमीटर या छोट्याशा उपकरणाने रोज रक्तातील ऑक्सीजनची पातळी तपासायला हवी; ती ९४ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा.
  • ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमामार्फत सरकार ‘पल्स ऑक्सीमीटर’ची सोय सर्व कोव्हिड-रुग्णांना उपलब्ध करून देणार आहे.
  • ‘डायबिटीस’ असलेल्यांची रक्तातील साखर तपासणे, ब्लडप्रेशर असलेल्यांचे ब्लडप्रेशर तपासणे हेही करणार आहे.

३.    कोव्हिड-लागण आणखी पसरू नये म्हणून…

  • तुमच्या घरातील मंडळींची तसेच गेल्या चौदा दिवसात मास्क न लावता सहा फुटाच्या आत दहा-पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ जे कोणी आले त्या सर्वांची सरकारी यंत्रणा टेस्ट करेल. त्यांच्याशी सहकार्य करा.
  • लक्षणे सुरू झाल्यापासून १४ दिवस घराबाहेर पडू नका.
  • घरातही १४ दिवस इतर सर्वांपासून दूर, नाकाला मास्क लावून एका वेगळ्या खोलीत रहा!
  • जेवण-खाण्यासाठी वेगळी ताट-वाटी, भांडी वापरा किंवा शक्यतो स्वत: साबण-पाण्याने धुवा. 
  • शक्यतो तुम्ही स्वतंत्र संडास/बाथरूम वापरा. 
  • हे शक्य नसेल तर संडास/बाथरूम वापरल्यावर संडास-बाथरूम मधील नेहमी हात लागणाऱ्या जागा १% टक्के ब्लीचिंग म्हणजे सोडियम हायपोक्लोराइट सोल्युशनने ते पुसून घ्या किंवा त्यावर फवारा. 

४.         कोव्हिड-केअर सेंटरमध्ये का दाखल व्हायचे?

  • बहुतांश लोकांची घरे फार लहान असल्याने रुग्णासाठी वेगळी खोली असे शक्य नसते.
  • अशांनी जवळच्या असलेल्या सरकारी कोव्हिड-केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे.
  • अनेक सरकारी सेंटर्समध्ये चांगली सोय असते. 
  • नाश्ता, चहा, जेवण, आंघोळीसाठी पाणी इ. सर्व सोयी असतात.
  • गरजेप्रमाणे साधी औषधे, ब्लड प्रेशर तपासणी, पल्स ऑक्सीमीटर तपासणी इ. सोयी असतात.
  • तब्येत बिघडली तर ते सुयोग्य हॉस्पिटलमध्ये दाखलही करतात.
  • या सोयींच्यामध्ये काही कमतरता असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्फत तक्रार करून सुधारणा करून घ्या. 
  • या केंद्रांच्या विरोधात खोटा प्रचार केला जात आहे. त्यावर विश्वास ठेवू नका.     

५.    बरे झाल्यावर घ्यायची काळजी

  • हे १४ दिवसांचे अलगीकरण संपल्यावर परत टेस्ट करायला हवी का? तर ‘नाही’.
  • दुसरे म्हणजे निदान काही महिने तरी या कोव्हिड-विजेत्यांना कोव्हिड होत नाही.
  • मात्र काही जणांना १४ दिवसांनंतरही काही त्रास होत राहतो व काही ना काही चिवट आजारही होतो.
  • त्यामुळे काही त्रास होत असल्यास जरूर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. अनंत फडके हे ‘जन आरोग्य अभियान, महाराष्ट्रा’चे समन्वयक आहेत,