(स्रोत – टाईम्स ऑफ इंडिया)

रिक्षाचालकांनी कित्येक रुग्णांना या कठीण काळात सेवा दिली. ही आरोग्य सेवा अधोरेखित करण्यासाठी विकास शिंदे व चाँद सय्यद या रिक्षाचालकांच्या सेवेचा परिचय…

“त्या तीन महिन्यात मी अनेक कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलो. त्यांना धरून रिक्षात बसवलं. नातेवाईक रुग्णांच्या जवळ येत नव्हते. सुरुवातीला मलाही भीती वाटायची. पण नंतर विचार केला, डॉक्टर आणि पोलीस जीवाची बाजी लावून सेवा देतायत. आपणही वाटा उचलला पाहिजे.” लॉकडाऊनच्या काळाबद्दल विकासभाऊंचं हे मनोगत. विकासभाऊ मुळचे चाकणचे. गावी त्यांची शेती आहे. ते विमा एजंटही आहेत. केवळ रिक्षाच्या धंद्यावर त्यांचा दारोमदार नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये फक्त पैशांची तजवीज करण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवली नाही. 

विकास मच्छिंद्र शिंदे

विकासभाऊ पुण्यातील जनवाडीमध्ये राहतात. पत्नी, दोन मुली व वृद्ध आई या छोट्या कुटुंबाची त्यांच्यावर जबाबदारी आहे. विकासभाऊंना कोविडची लागण झाली असती तर या कुटुंबांवर मोठचं अरिष्ट आलं असतं. पण विकासभाऊंमध्ये इतरांच्या मदतीला धावून जायची उर्मी आहे. कोरोनामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं. नि हा गृहस्थ घरात अडकून पडलेला. ”पहिले दहा-बारा दिवस काही सुचतच नव्हतं.” विकासभाऊ सांगतात, ”अचानक एके दिवशी सिटी ग्लाइडचे राहुल शितोळे यांचा फोन आला. आणि मला परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला…”

विकासभाऊ सांगतात, ”भीतीची पाल माझ्याही मनात चुकचुकत होती. कारण घरी लहान मुली आणि वयस्कर आई होती. म्हणून मी दोन्ही हातात एकावर एक दोन हँडग्लोज घातले, नाकावर दोन मास्क चढवले. शिवाय चेहऱ्यावर फेस शिल्ड लावलं. सतत सॅनिटायजरने हात स्वच्छ करू लागलो. घरी आलो की तुरटीच्या पाण्यानं आंघोळ सुरू केली. सकाळ-संध्याकाळ आयुर्वेदिक काढा पिऊ लागलो.” असा जामानिमा करून विकासभाऊ जनसेवेला सज्ज झाले.

एके दिवशी कुसाळकर पुतळ्याजवळ एक वयस्कर महिला थांबलेली. तिला धाप लागलेली. कोरोनाकाळात अशा माणसाच्या वाऱ्यालाही कुणी थांबत नव्हतं. पण त्या एकट्या बाईला असंच कसं सोडणार? विकासभाऊंनी त्या वृद्धेला गाडीतून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात पोहचवलं. ते म्हणतात, ”मी किमान पन्नास-साठ तरी कोरोनाचे पेशंट दवाखान्यात पोचवले असतील.”

एकदा विकासभाऊ पॅसेंजर सोडून परतत होते. तेव्हा त्यांना फुटपाथवर एक माणूस दिसला. यालाही धाप लागलेली. त्या माणसाची उलाघाल बघवत नव्हती. त्याचे नातेवाईकही हवालदील झालेले. रुग्णवाहिकेला फोन करावा, तर अ‍ॅम्ब्युलन्स यायला वेळ लागणार. त्यामुळे विकासभाऊंनी लगेचच त्या माणसाला रिक्षात घेतलं. त्याला ससून रुग्णालयात पोचवलं. तो माणूस पुढे बरा झाला असावा. पण दुसऱ्या एका पेशंटला दवाखान्यात पोचवूनही तो दगावल्याचं यांना नंतर समजलं. खरेतर कोविडची लक्षणं असतील अशा रुग्णांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स दारात यायची. पण काही लोक भांबावलेले होते. असे गोंधळलेले लोक रिक्षात बसल्यावर त्यांना उतरवणार तरी कसं? विकासभाऊ सांगतात, ”त्या पेशंटला मी ससूनपर्यंत नेलं. पण तिथे खाटा उपलब्ध नव्हत्या. काय करणार? मग मी गाडी नायडू रुग्णालयात नेली. तिथे त्याला एडमिट केलं. पण नंतर तो माणूस कोविडने वारला. मला खूप वाईट वाटलं.” हा काळ दु:ख उगाळत बसण्याचा नव्हता. कारण या काळात विकासभाऊ अगदी ओळखीपाळखीतील लोकांच्या दुर्दैवी मृत्युंचेही साक्षीदार झाले.

जनवाडीमधील राजेश हा टपरीचालक विकासभाऊंच्या परिचयाचा. त्याची तब्येत अचानक बिघडली.  राजेशची आई व बहीण असं तिघांचंच कुटुंब. राजेशची तब्येत बिघडल्यावर त्या मायबहिणीला काहीच सुचेना. त्यांनी विकासभाऊंना बोलावलं. यांनी राजेशला दवाखान्यात नेलं. पण कुठल्याच रुग्णालयात त्याला दाखल करता आलं नाही. हा कोविडचा रुग्ण नव्हता. पण क्रिटिकल अवस्थेत होता. नि दवाखान्यांमध्ये अत्यवस्थ रुग्णांसाठी बेडस् मिळत नव्हते. अखेर या तरुणाचा उपचारांविना करुण मृत्यू झाला. मग विकासभाऊंनीच त्याचा अंत्यविधी केला. 

याच काळातील विकासभाऊंच्या वस्तीतील बनसोडे नावाच्या वृद्धाचा मृत्यूही असाच मन हेलावणारा. बनसोडेंचं खोलीतच वृद्धापकाळाने निधन झालं. त्यावेळी त्यांच्या पत्नीशिवाय कुणीच जवळ नव्हतं. त्या आजी रात्रभर रडत बसलेल्या. कुणीतरी आपल्या पतीचा अंत्यविधी करावा म्हणून त्यांचं रूदन सुरू होतं. पण त्यांची मुलं दूर होती. पुण्यात त्यांची एक मुलगी आहे. पण तीही खूप उशिरा येऊ शकली. कारण लॉकडाऊन! वस्तीमधीलही कुणी या अंत्यविधीला पुढे आलं नाही. कारण कोरोनाची भीती! अशावेळी विकासभाऊंनीच रिक्षा काढली. मृत्युचा दाखला आणला. मर्तिकाचं साहित्य खरेदी केलं. शववाहिनी बोलावली. आणि त्या वृद्धाचा अंत्यविधी केला.

वस्तीतील रुग्णांनाही विकासभाऊंची या काळात खूपच मदत झाली. दोन महिलांना रात्री बाळंतवेणा सुरू झालेल्या. विकासभाऊ कधीकधी रात्री बारा वाजता घरी येत. मग आंघोळ करून जेवायला बसत. त्यात दिवसभर सारखं गाडी व हातांना सॅनिटायजर लावल्याने नाकात तोच वास असे. अन्नाचा घास घशाखाली उतरत नसायचा. तरी अशा अडलेल्या महिलांची खबर मिळताच, त्यांनी ताटावरून उठून रिक्षा काढली. नि या महिलांना तातडीनं दवाखान्यात पोचवलं. एक तीन वर्षांचं बाळ असंच रात्रभर रडत होतं. या छोट्या मुलीला पोटदुखी होती. विकासभाऊंनी तिलाही रात्री दोन वाजता दवाखान्यात नेलं. उपचारानंतर या बाळाला आराम पडला. एक महिला माहेरी गेलेली. तिचं बाळ आणि नवरा घरी होते. लॉकडाऊनमुळं ती बाई माहेरीच अडकलेली. या बाईलाही विकासभाऊंनी तिच्या रडणाऱ्या बाळापर्यंत पोचवलं.

जनवाडी ही गरीब-कष्टकऱ्यांची वस्ती. इथं युपी, बिहारकडून आलेले मजुरही राहतात. त्यांचा रोजगार गेलेला. गावी परतण्याशिवाय त्यांना तरणोपाय नव्हता. पण त्यासाठी आधी रेल्वेचं तिकीट बुक करावं लागायचं. त्याकरिता दोन-तीन तास रांगेत थांबून तिकीट घ्यावं लागायचं. या लोकांना मेडिकल सर्टिफिकेटही आणावं लागायचं. या सर्व उठाठेवीत विकासभाऊ या गरिबांच्या मदतीला आले. त्या लोकांना तिकीट व मेडिकल सर्टिफिकेट मिळेपर्यंत तिष्ठत थांबणं, रेल्वे स्टेशनवर सोडवणं ही कामं त्यांनी विनातक्रार केली. पेशंटची ने-आण करण्यासाठी विकासभाऊ या काळात नेहमीच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जात. या रुग्णालयाचे एक डॉक्टर विचित्र समस्येत अडकलेले. डॉक्टरांचा गॅस सिलेंडर संपलेला. ते राहायला एकटेच होते. सिलेंडर घेऊन ते रस्त्यावर उभे होते. डॉक्टरांना पाहताच विकासभाऊंना त्यांची अडचण लक्षात आली. विकासभाऊ नसते तर त्या डॉक्टरांची गॅस सिलेंडर आणण्याची समस्या सुटली नसती. ही देखील एक अप्रत्यक्ष आरोग्य सेवाच म्हणायची!

या काळात पोलिसांकडून काही बरेवाईट अनुभवही विकासभाऊंना आले. विकासभाऊंच्या एका मित्राला त्याच्या मालकाने पगाराचा चेक दिलेला. तो वठवण्यासाठी बँकेत जायचं होतं. पण यांना पोलिसांनी अडवलं. यांचं काहीही ऐकून न घेता लॉकडाऊनमध्ये रिक्षा काढली म्हणून पोलीस दमदाटी करू लागला. हुज्जत वाढली. कहर म्हणजे त्या पोलिसाने यांना मारहाण तर केलीच. शिवाय वीस मिनिटं उन्हात उभं केलं. पोलिसांबाबतचा त्यांचा दुसरा अनुभव तुलनेनं थोडा सौम्य आहे.

एक वृद्ध त्यांच्या गाडीत बसला. या काळात घराबाहेर पडायचं असल्यास पास अनिवार्य होता. मात्र त्या वृद्धाकडे पास नव्हता. त्याच्याकडचे पैसे संपलेले. घरात अन्न नव्हतं. त्यामुळे ती व्यक्ती बँकेत पैसे काढण्यासाठी निघालेली. रस्त्यात यांची रिक्षा पोलिसांनी अडवली. पॅसेंजरकडे पास नसल्याने पोलीस रिक्षा जप्त करण्याची भाषा बोलू लागले. बऱ्याच बोलचालीनंतर अखेर विकासभाऊ पोलिसांना म्हणाले, “साहेब, तुम्ही जशी सेवा करताय तशीच मी पण सेवा करतोय. यात माझी काय चूक आहे. या माणसाला घरात खायला नाही. जर सेवा करणं हा माझ्या गुन्हा असेल तर मला नका सोडू तुम्ही.” हे बोलणं ऐकून पोलिसांनी यांना सोडलं.

या काळात विकासभाऊंना आर्थिक नुकसानही सोसावं लागलं. रिक्षात भरलेल्या गॅसचे पैसेही रिक्षाच्या भाड्यातून वसूल होत नव्हते. तरी ते भाडं आणायला रिकामी गाडी घेऊन जात. कधी कधी पॅसेंजरला घ्यायला पोचल्यावर भाडं कॅन्सल व्हायचं. त्यामुळे इंधन वाया जायचं.

एका स्वयंसेवी संस्थेमार्फत गरिबांना शिधा वाटप केलं जात होतं. विकासभाऊंनी आपल्या वस्तीतील पन्नास गरीब कुटुंबांची यादी केली. त्यांच्यापर्यंत ही धान्य किट्स पोचवण्यासाठी आपली रिक्षा मोफत दिली. ते स्वत: विमा उतरवण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांना डिजिट कंपनीच्या विमा योजनेची माहिती होती. कोविड योद्ध्यांसाठी ही मोफत विमा योजना होती. पण पोलीस व आरोग्य सेवकांनाच कोविड योद्धे मानलं जात होतं. विकासभाऊंनी आपल्या परिचयातील रिक्षाचालकांना या योजनेच्या कक्षेत आणलं. त्यांनी जवळपास ५० रिक्षाचालकांचा हा विमा उतरवला. असे हे सेवावृती विकासभाऊ. लॉकडाऊन संपलं. त्या काळातील यांच्यासारख्या रिक्षाचालकांच्या सेवेची दखल कुणी घेवो न घेवो विकासभाऊ आपली रिक्षा घेऊन शहराच्या सेवेत हजर आहेत! 

– वर्षा वाघजी, (लेखक पत्रकार आहेत)

विकास मच्छिंद्र शिंदे (मो.- ९९२२४ ८८०८७)   

चाँदभाई उर्फ दादा

”माझ्या मावस मेव्हण्याची कोरोनाने डेथ झाली. मला नातेवाईकांना घरी सोडून मयतीला जायचं होतं. आमचा एरिया रेडझोन होता. त्यामुळे पोलिसांनी बेरिकेडस् लावलेले…” चाँदभाई लॉकडाऊनमधील अनुभव सांगतात, ”पोलिस कुणालाच वस्तीत येऊ देत नव्हते. मी वस्तीतल्या कार्यकर्त्याला मध्यस्थीची विनंती केली. पण तो म्हणाला, ”मी काही करू शकत नाही.” मला वाईट वाटलं. मी त्याला इतकंच म्हणालो, ”वेळ सगळ्यांवर येते!’ लॉकडाऊन काळात ही हतबलता अनेकांनी अनुभवली. अशा अनुभवांनी खट्टू होऊन एखाद्याच्या मनातून मदत हा विषयच तिटकाऱ्याचा झाला असता. पण चाँदभाईंचं तसं झालं नाही.

लोक घराबाहेर पडले तर रिक्षाचालकांचं पोट चालतं. लॉकडाऊनमध्ये किती दिवस जातील? असे प्रश्न रिक्षाचालकांनाही सतावत होते. अशा मन:स्थितीत चाँदभाईंना ‘इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायची इच्छा असल्यास कॉल करा!’ असा मेसेज आला. त्यांनी दुसऱ्या मिनिटाला संपर्क केला. वातावरणात कोरोनाची भीती होती. घराबाहेर पडणं धोक्याचं होतं. पण चाँदभाई रिक्षा घेऊन बाहेर पडले. त्यांच्या पत्नीने थोडा विरोध केला. पण यांनी काम केलं नाही, तर चूल कशी पेटणार? हा प्रश्नही होताच. त्यामुळे चाँदभाईंची रिक्षा गरजूंच्या मदतीला हजर झाली.

चाँदभाई राहतात येरवड्यातील लक्ष्मीनगर वसाहतीत. पुण्यात कोविडने झालेला पहिला मृत्यू याच वस्तीतला. त्यामुळे वस्तीच्या प्रवेशाजवळ बांबूंनी अडसर लावलेले. चाँदभाईंची रिक्षा नेहमी त्यांच्या घराजवळच असते. ही रिक्षा घेऊन ते रोज बाहेर जाऊ लागले. त्यामुळे काही लोकांनी विरोध सुरू केला. ‘रिक्षा वस्तीत आणू नका!’ पण ”कोरोनाच्या पेशंटस्‌साठी अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. रिक्षात फक्त गरजूंचीच ने-आण होतेय. शिवाय माझी गाडी मी सतत सॅनिटाईज करतोय. स्वत: मास्क वापरतोय.” हे चाँदभाईंनी आक्षेप घेणाऱ्यांना कसंबसं पटवून पाहिलं. पण भीतीपोटी ते कुणी समजूनच घेतलं नाही. लोक यांच्याकडे संशयाने पाहत होतेच. हा माणूस जणू कोरोनाचे विषाणूच घेऊन फिरतोय अशी ती नजर होती.

चाँदभाई वस्तीत कधी कुठल्या झमेल्यात नसतात. शिवाय कुणाला रात्री-अपरात्री रिक्षाची गरज पडली तर विनातक्रार हजर असतात. त्यामुळे त्यांना वस्तीत मान आहे. लोक त्यांना आदराने ‘दादा’ संबोधतात. म्हणून असेल कदाचित चाँदभाईंना झालेला विरोध हळूहळू मावळला.

चाँदभाई सांगतात, ”मी एका पॅसेंजरला घेऊन जात होतो. रस्त्यात एका तरुणाने माझ्या रिक्षाला हात दाखवला.” एरवी भाडं गाडीत असताना रिक्षा थांबत नाही. पण हा काळ कठीण होता. कुणाची काय गरज असेल सांगता येत नव्हतं. म्हणून चाँदभाई थांबले. त्या तरुणाचा भाऊ आजारी होता. सोमाटणे फाट्याजवळील एका कंपनीत असलेल्या या रुग्णाला घरी आणायचं होतं. चाँदभाईंनी या तरुणाला भाडं सोडून येतो असं आश्वासन दिलं. खरेतर हे भाडं फारच दूरचं होतं. पण तरीही गरज ओळखून ते गेले. सोमाटणे फाट्याजवळ तो रुग्ण गाडीत बसला. नि परतीच्या वाटेला गाडी लागताच पोलिसांनी रिक्षा अडवली. चाँदभाई सांगतात, ”त्या पोलिसांमधील इन्सपेक्टरने सरळ दमदाटी सुरू केली. परवानगी नसताना रिक्षा बाहेर काढलीच कशी म्हणून तो उर्मटपणे बोलू लागला. माझी गाडी इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये आहे. माझ्याकडे पास आहे. गाडीत आजारी माणूस आहे. वगैरे मी सांगून पाहिलं. पण तो ऐकेना. गाडी बाजूला घे. याच्यावर केस लावा. अशा धमक्या देऊ लागला.” या संकटप्रसंगात पोलिसांच्या तुकडीतील एका हवालदाराने चाँदभाईंची मदत केली. चाँदभाई सांगतात, ”त्या हवालदारालाही बहुदा इन्सपेक्टरने शिवीगाळ केली होती. इन्सपेक्टर उगाचच लोकांना त्रास देतोय याची त्याला जाणीव होती. त्यामुळे हवालदार म्हणाला, ”किक् मार आणि निघून जा.” हवालदाराच्या मदतीमुळे चाँदभाई निसटले.

एका पेशंटचाही मासलेवाईक अनुभव चाँदभाई सांगतात, ”हा माणूस कोरोना पॉझिटिव्ह होता. त्याच्या सोसायटीने त्याला बाहेर काढलेलं. म्हणून तो मित्राच्या फ्लॅटवर क्वारंटाईनमध्ये राहिलेला. त्याने मला नायडू हॉस्पिटलला रिक्षा न्यायला सांगितली. मी नेली. तो दवाखान्यातून येईपर्यंत मी थांबलो. आल्यावर त्याने त्याचं गुपित सांगितलं. त्याला वाटलेलं मला ते कळलं असतं, तर मी त्याला गाडीतच घेतलं नसतं. सुशिक्षित लोकांनी त्याला सोसायटीतून हाकललेलं. त्यामुळे त्याची तशी भावना झाली असेल. पण मी इतक्या लोकांना गाडीतून सोडलं होतं, त्यामुळे मला काही वाटलं नाही. उलट मी त्याला म्हणालो, “आप पहले बोलते तो भी मै आपको छोडता…”

एक दिवस चाँदभाईंनी सलग दहा तास गाडी चालवली होती. कित्येक गरजूंची मदत केली होती. अक्षरश: त्या दिवशी पाणीही प्यायला त्यांना उसंत मिळाली नव्हती. अशावेळी एका महिलेचा कॉल आला. भाडं सूसगावचं होतं. एकतर बाईमाणूस. त्यात दूरचा रस्ता. त्यामुळे चाँदभाईंनी भाडं स्वीकारलं. या बाई बँकेच्या कर्मचारी होत्या. म्हणजे सुस्थितीतील होत्या. मोबाईल अ‍ॅपमध्ये नोंद झाल्याप्रमाणे सूस गावापर्यंत त्यांनी सोडवलं. पण या बाईंना आणखी सात कि.मी. आतपर्यंत जायचं होतं. या बाईंना घेण्यासाठी चाँदभाई आपली मोकळी गाडी घेऊन आले होते. तरी मीटरनुसारच त्यांनी भाडं घेतलं होतं. पण ‘आणखी आत जायचं असेल तर दहा रुपये जादा लागतील.’ असं सांगताच त्या बाईंनी झिकझिक सुरू केली. दहा रुपयांसाठी त्या बाईंनी इतकी तणतण केली की चाँदभाई काहीच बोलले नाहीत.

एका गर्भवती महिलेच्या तपासण्यांसाठी चाँदभाईंनी नियमितपणे आपली रिक्षा हजर ठेवली. या महिलेने त्यांना नेहमीच मीटरपेक्षा अधिक बिदागी दिली. असे आणखीही काही लोक त्यांना भेटले. पण माणुसकीची ही भेट चाँदभाईंनी केवळ स्वत:जवळच ठेवली नाही. एकदा एक माणूस खिन्न चेहऱ्याने उभा असलेला त्यांना दिसला. त्या काळात प्रवासी मजदुरांसाठी नुकत्याच ट्रेन सुरू झालेल्या. या गृहस्थाला बिहारला जायचं होतं. खायचेही पैसे त्याच्याकडे नव्हते. चाँदभाईंनी या मनुष्याला मोफत स्टेशनवर सोडलं. शिवाय काही पैसे बळेच त्याच्या खिशात कोंबले. वाटेत भूक लागल्यास उपयोग होईल, म्हणून त्यांनी केलेली ही छोटीशी मदत होती.

ही माणुसकी चाँदभाईंमध्ये कुठून आली? कदाचित बालपणापासून गरिबी पाहिलेली असल्यानेच  लॉकडाऊनकाळात त्यांच्यातील माणूसपण अधिक प्रखर झालं असावं. चाँदभाईंचे वडील कचरू सय्यद हमाली करायचे. त्यांना दिवसाकाठी दीड-दोन रुपये मजुरी मिळत असे. आई शरिफा टोपलीत केळी घेऊन दारोदार फिरत असे. या केळींच्या व्यवसायातून किरकोळ आमदनी व्हायची. चाँदभाई सांगतात, ”त्याकाळी सव्वा रुपया किलो तांदूळ मिळायचा. पण तो घेण्याचीही आमची ऐपत नव्हती. एकदा मला आठवतंय, आईने पावशेर तांदळाचा भात शिजवलेला. तो खायला आम्ही पाच भावंड भगुल्याभोवती बसलेलो. पावसाळा होता. त्यामुळे झोपडीच्या पत्र्यातून गळणारं पाणी भगुल्यात पडत होतं. आणि आम्ही तोच भात खात होतो.”

ही परिस्थिती कधीतरी बदलेल ही आशा छोट्या चाँदला नव्हती. त्यामुळे दहावीत नापास झाल्यावर हा मुलगा थेट रस्ते डांबरीकरण कामाच्या मजुरीवर जाऊ लागला. धोंडीबा नावाच्या मित्राने याला रिक्षा शिकवली. मग त्यांनी शिफ्टने बिना लायसन्स रिक्षा चालवली. खूप कष्ट केले. बचत केली. मग कर्जाने स्वत:ची रिक्षा घेतली. स्वत:ची खोली विकत घेतली. दोन मुलींना शिकवलं. त्यांची लग्नं लावली. चाँदभाईंचा मुलगा इंजिनियरिंग करतोय. पुढे दिवस पालटतील कधीतरी. पण अत्यंत हलाखीची परिस्थिती पाहिलेल्या चाँदभाईंना अजूनही पहाटेच रिक्षा घेऊन बाहेर पडल्याशिवाय चैन पडत नाही. या बैचेनीतूनच लॉकडाऊनकाळात ते लोकांच्या मदतीसाठी घराबाहेर पडले. ‘वेळ सर्वांवर येते.!’ अशा वेळी आपण माणूस म्हणून एकमेकांची मदत केली पाहिजे, केवळ याच भावनेने चाँदभाईंनी कोरोनाकाळात सेवा दिली.

– प्रशांत खुंटे, (लेखक मुक्त पत्रकार आहेत)

चाँद कचरू सय्यद (मो.- ७४९९४ ५२५२५)    

•••

_______________________________________________________________________________________________

लेखकाच्या मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

[pvcp_1]

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.