• मोफत/सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी.. साथी हेल्पलाईन 94 22 32 85 78
आता कोरोनासोबतच जगायचंय ‘जे होईल ते होईल, पासून कोरोना हे एक थोतांड आहे!’ अशा धारणांमधून अलीकडे नागरिकांमध्ये कोरोनापासून बचावाबाबत एक प्रकारचा धीटपणा येतोय. हे धारिष्ट्य अंगलट येऊ शकतं. या पार्श्वभूमीवर ‘प्रयास’ संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आलेल्या ‘वागणुकीचे पॅटर्न व कोरोनाचा धोका’ याबाबतची लक्षवेधी मांडणी… कोरोना विषाणू आणि त्यामुळे …

कोरोना विषाणू आणि त्यामुळे होणाऱ्या कोव्हिड-19 आजाराशी जगाचा परिचय होऊन आता वर्ष होत आलं. जगभरात ही कोव्हिड-19 आजाराची महासाथ आजही थैमान घालते आहे. या वर्षभरात कोव्हिड-19 आजाराबद्दल काही गोष्टींची स्पष्ट माहिती समोर आली. कोरोना म्हणजे सार्स कोरोना व्हायरस-2 हा अतिशय वेगाने पसरणारा विषाणू आहे. तो मुख्यत्वे नाकातोंडातून बाहेर पडणाऱ्या तुषारांमार्फत पसरतो. संसर्ग झालेल्या अनेकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत; पण शरीरात विषाणू असल्याने अशा व्यक्ती दुसऱ्याला संसर्ग मात्र देऊ शकतात. काही रुग्णांमध्ये लक्षणे आढळतात. यातल्या बहुतेकांना सौम्य किंवा मध्यम आजार होऊन काही दिवसात ते बरे होतात. आणखी एक लहान गट आपल्याला दिसतो तो म्हणजे तीव्र लक्षणांचा. या गटातल्या रुग्णांना मात्र इस्पितळात भरती करावे लागते. काहींना कृत्रिम प्राणवायू द्यायला लागतो तर काहींना कृत्रिम श्वसनाची मदत द्यावी लागते.

सध्यातरी हा आजार बरे करणारे औषध किंवा लस उपलब्ध नाही आणि ही साथ आणखी किमान 7-8 महिने आपल्याभोवती तळ देऊन असणार आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ‘सामाजिक लस’ हाच उपाय आहे. आपल्याला संसर्ग व्हायला नको यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. सर्वांनी नाक-तोंड झाकणारा मास्क वापरणे, हात वारंवार धुणे आणि गर्दी न करणे, व्यक्ती-व्यक्तींमध्ये ‘दो गज की दूरी’ सांभाळणे अशाप्रकारे ह्या परिस्थितीत आपल्या वागणुकीत आवश्यक ते बदल करणे, म्हणजेच सामाजिक लस घेणे असे म्हणता येईल.

वागणुकीत बदल कधी घडतो, कधी घडत नाही याबद्दल बरेच अभ्यास झाले आहेत. कुठलाही आजार होऊ नये म्हणून वागणुकीत बदल करायचा असेल तर ‘मला लागण होण्याची शक्यता किती?’ आणि ‘लागण झालीच तर तीव्र आजार होण्याची शक्यता किती?’ याची प्रत्येकाची स्वतःसाठीची समज ही अत्यंत महत्त्वाची असते असं बऱ्याच अभ्यासांमधून सिद्ध झालं आहे. ही समज आणि वास्तविक आजार होण्याची शक्यता यात साम्य असेलच असं नाही. कोव्हिडचचं उदाहरण घेऊ. अगदी सुरुवातीच्या काळात संसर्ग झालेले लोक आसपास असण्याची शक्यता कमी असूनही लोकांच्या मनात भीतीचे वादळ इतकं घोंघावत असे की काही लोक नोटांनासुद्धा रोज इस्त्री करत आणि आता संसर्ग झालेल्या लोकांची म्हणजेच त्यांचा संपर्क येण्याची शक्यता वाढलेली असताना, बरेच लोक मास्क वापरणे किंवा दो गज की दूरी पाळायला नाखूश असतात. भीती वाटली की वागणुकीत त्यानुरूप बदल घडतो असे ह्यातून निदान वरवर तरी दिसते. अर्थात घाबरून केलेले बदल कधीच सातत्याने टिकत नाहीत हेही दिसते. माहितीच्या अभावामुळे असं घडत असेल असं समजणंही चुकीचं ठरेल. कोव्हिडबद्दलचे आपले माहितीज्ञान सुरुवातीच्या काळाहून निश्चित बरेच वाढलेलंही आहे. तेव्हा, एखाद्या गोष्टीतल्या धोक्याची जाणीव जेवढी तीव्रपणे होते, तितका कुठल्याही व्यक्तीचा धोका टाळण्याचा प्रयत्न असतो असं दिसतं. आपल्याला धोक्याची शक्यता जास्त वाटत असली तर आपण तो टाळण्याचे जोरदार प्रयत्न करतो. फारसा धोका वाटतच नसला तर  कुणीही सांगितले तरी आपण वागणुकीत बदल करायला जात नाही.  

आपल्याला जोखीम (रिस्क) किती आहे याची जाणीव महत्त्वाची आहेच पण वागणुकीतील बदल घडण्यासाठी तेवढंच पुरेसं नाही. सुयोग्य बदल करण्याची क्षमता आपल्यात आहे असं वाटणंही महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, मी गर्दी टाळू शकतो, मास्क वापरू शकतो असं वाटणं. जोखीम आहे पण आपण फार काही करू शकणार नाही असं वाटणारे बरेच लोक, ‘जे नशिबात असेल ते होईल’ असा विचार करताना दिसतात. जोखमीची जाणीव आणि क्षमता या दोन्ही घटकांचा विचार केला तर लोकांची चार गटांमध्ये विभागणी होते. उत्तम जाणीव आणि उत्तम क्षमता, उत्तम जाणीव आणि कमी क्षमता, कमी जाणीव आणि उत्तम क्षमता, आणि कमी जाणीव आणि कमी क्षमता. ह्यातील फक्त पहिला गट हा प्रतिबंधासाठी योग्य कृती करतो. दुसरा गट जाणीव असली तरी योग्य कृती करत नाही. तिसरा गट चुकीच्या गोष्टी करत राहतो आणि चौथा गट काहीच करत नाही आणि नशिबाच्या भरवशावर सारे सोडून देतो. ‘प्रयास’ आरोग्य संस्थेने या महासाथीच्या काळात केलेल्या एका सर्व्हेक्षणात असे आढळले की पहिल्या गटात फक्त ११%, दुसऱ्या गटात ४६%, आणि तिसऱ्या आणि चौथ्या गटात मिळून ४३% व्यक्ती होत्या. येथे हेही लक्षात घ्यायला हवे की हे साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात केलेले मुख्यतः शहरी आणि शिक्षित लोकांमधील ऑनलाईन सर्व्हेक्षण होते.      

आपली धोक्याची जाणीव आणि प्रत्यक्ष धोका यात बरीच तफावत असू शकते. आपली ही जाणीव आपल्याला त्या प्रश्नाबाबतची – धोक्याबद्दलची ही माहिती जशी कशी कळली असेल त्यावरून तयार झालेली असते. रोज अनेक लोक या कोव्हिड आजारातून बरे होत आहेत किंवा रोज संसर्ग असलेल्या किती व्यक्ती सापडत आहेत हे आपण वाचतो, टीव्हीवरच्या बातम्यात ऐकतो, त्यावरून आपण निष्कर्ष काढतो. पण प्रत्यक्ष परिस्थिती थोडी वेगळीच असते. आपल्या आसपास दिसणारी किंवा टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दिसणारी माणसे मास्क वापरताना दिसत नसली तर आपल्यालाही वाटते की आता काळजी घेण्याची फारशी गरज नसावी. पण खरंतर ती गरज आजही खूप आहे. समजा आपल्याला संसर्ग झालाच तर किती तीव्र स्वरूपाचा आजार होईल याबद्दलही आसपासच्या लोकांकडे बघून किंवा घटना ऐकून आपले काही मत बनते; आता हे मत योग्य असतेच असे नाही, पण आपल्या वागणुकीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला नेमका किती धोका वाटतो आणि खरोखर धोका किती आहे यातले अंतर कमी होणे फार फार गरजेचे आहे. तसे झाले तरच बहुसंख्यांच्या वागणुकीत आवश्यक ते बदल घडतील आणि आपल्याला या महासाथीवर संपूर्ण नियंत्रण मिळवता येईल.

डॉ. संजीवनी कुलकर्णी

‘प्रयास’संस्थेच्या संस्थापक-विश्वस्थ असून ‘प्रयास हेल्थ ग्रुप’च्या संचालक व डॉ. शिरीष दरक ‘प्रयास हेल्थ ग्रुप’मध्ये वरिष्ठ संशोधक आहेत. लेखकांच्या मताशी ‘वेध आरोग्याचा’चे संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

“कशी ही महामारी आली. झोप उडाली. भूक मेली, उदासी दाटली! भीती इतकी की घाबरून मरतो असे वाटले. या महामारीने आमच्या पाठीवर तर मारलेच मारले! पोटावरही मारले. कष्ट करणारे हात थंड पडले. गती गेली…

घरेलू कामगार अतिशय हतबल आहेत. जी बाई करोनापूर्वी सात-आठ घरी जाऊन घरकाम करायची, ती सध्या एक किंवा दोन कामे करत आहे. ती सांगते “मालकिणीकडे मे महिन्यानंतर दर पंधरा दिवसांनी गेले. कधी फोन केले. पण नकार मिळत राहतो.’’ नवे कामही मिळत नाही. तगमग होते. करणार काय?’’

बहुसंख्य घरेलू कामगारांचे काम गेले आहे. काम परत मिळेल अशी त्यांना आशा आहे. पण खात्री नाही. घर प्रपंच कसा चालवायचा ही काळजी त्यांच्या मनाला खात राहते. या काळजीने रोग लागायचा ही धास्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. ज्या वस्त्यांमध्ये घरेलू कामगार राहतात त्या सर्व वस्त्या कष्टकऱ्यांच्या आहेत. हॉटेल कामगार, बांधकाम मजूर, प्लंबर, रंगकाम करणारे पेंटर, रिक्षावाले, भाजी विकणारे, दुकानात काम करणारे, वॉचमन अशी कामे करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या वस्त्या आहेत. ते सर्वजण मार्च २२ च्या लॉकडाऊननंतर घरात बसलेली आहेत. काम केले तर कमाई होईल. त्यावर घर प्रपंच चालेल. ते सगळेच ठप्प झाले. बचत बाहेर काढा आणि ती संपवून जीवन जगवा अशी वेळ आली आहे. पण बचत छोटी होती ती वर्षभर पुरेल हे शक्य नाही.

वंदना सांगते, “तिची दोन्ही मुलं पाच वर्षांपेक्षा लहान आहेत. नवरा हॉटेल कामगार आहे. ती चार घरी घरकामाला जात होती. झोपडपट्टीत ती भाड्याच्या खोलीत राहते. एप्रिलपासून ती आणि तिचा नवरा घरात बसून आहेत. गेले सहा-सात महिने घरातच आहेत.’’ ती म्हणते, “मला खूप खजील व्हावे लागते. घरमालक ‘भाडे द्या’ असा तगादा लावतो. काय सांगू. ‘थांबा दादा देऊ देऊ!’ सांगतो, ‘कामाला गेलो की पहिलं तुमचं देऊ’ सांगतो. किराणामाल दुकानदार विचारतो, ‘किती दिवस उधारी?’ ‘देऊ देऊ’ सांगतो. ‘कामाला गेलो की फेडू उधारी’ म्हणतो. काय सांगणार? विज बिल थकलयं त्याचं टेन्शन येतं. भाज्या कधीतरी आणतो. भागवतो आहोत कसंतरी’’ वंदना सांगते, ‘‘बचत संपली. उसनंपासनं काही थोडं मिळालं. त्यावर जगलो. पण थकलेलं घरभाडं, किराणा बिल, विज बिल, टोचत राहतं. झोप लागत नाही.’’ तिच्या बोलण्यात अजिजी आहे. काम मिळेल का याची ती सतत चाचपणी करते.

राहायला भाड्याचे घर असणाऱ्या घरेलू कामगार स्त्रियांची संख्या अंदाजे 20 टक्के होईल. 50 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे परिसरात 80 हजार घरेलू कामगार असावेत ह्या अंदाजाने 16,000 घरेलू कामगार भाड्याच्या घरात राहतात. त्या सर्वांची स्थिती कमी-अधिक प्रमाणात बिकट आहे. उधारी, उसनवारी याने त्यांचा जीव मेटाकुटीस आलाय.

सुवर्णा सांगते, “गणपती नंतर नवरा कामाला जायला लागला. ती स्वतः करोनापूर्वी पाच घरी कामाला जायची. आता फक्त एका घरी जाते. नवऱ्याचा पगार त्याच्या मालकाने निम्मा केला. आता त्याला 5,000 रुपये महिना काम करावे लागते. तक्रार करायची काही सोय नाही. तिची कामे परत मिळायची वाट बघत आहे.’’ केवळ वाट पाहत राहणे हेच सुवर्णाच्या हातात राहिले आहे.’’

लताबाई म्हणाली, “आमच्या घरी दुष्काळात तेरावा महिना आला. त्या 50 वर्षाच्या आहेत. मुलगा एका कंपनीत काम करतो. नवरा वॉचमन आहे. एप्रिलनंतर दसऱ्यापर्यंत दोघेही घरात बसलेले आहेत. त्यांना पेशंट सांभाळायचे काम मिळाले होते. ते चालू राहिले. पण या सहा महिन्यात घरात आजारपणाने बेजार केले. नवरा घरात जिन्यावरून पडला. त्याच्या पायाला, कमरेला फ्रॅक्चर झाले. एप्रिलमध्ये त्यांना दवाखान्यात न्यायला ॲम्बुलन्सही मिळाली नाही. रिक्षाही मिळेना. तेव्हा कडक लॉकडाऊन होता. कशीबशी रिक्षा मिळाली. एका खाजगी हॉस्पिटलात नेले. तिथे अवाच्या सव्वा बिल आले.’’

लताबाई सांगतात, “त्याच वेळी मुलगाही आजारी पडला. त्याचे पोट दुखायचे. निदान करायला दोन-तीन डॉक्टरांकडे गेलो. माझ्या मुलाचा धीर सुटत चालला. मी, माझी सून त्याला जपायचो. आम्ही या दोघांचे औषधपाणी केले. घरातलं सगळं सोन विकून टाकलं. सुनेचं गंठण गेलं. माझ्या कानातल्या कुड्या गेल्या. गळ्यातली सोन्याच्या मण्यांची पोत गेली. काय करणार माणसं वाचवलीत हे मोठं काम केलं. करोनात या पुरुष माणसांची कमाई झिरो झाली. त्यात आजारपण मोठं. जगून निघालो जिंकलो.’’

घरातील कोणालातरी आजाराने पीडलं असं सांगणाऱ्या अनेक घरेलू कामगारांच्या डोळ्यात पाणी भरून येते. रिक्षा, बस नाही, बाहेर जाता येत नाही. मोठा आजार, मोठा खर्च. 5 टक्के किंवा 10 टक्के व्याजाने कर्ज काढावं असं सांगणाऱ्या अनेक जणी भेटल्यात. काही जणींनी असे 50 हजार रुपये तर काहींनी एक लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे. हे फेडायला कामं मिळाली तर पुढची काही वर्षे खर्ची पडतील असं त्या सांगतात.

काही जणी खाजगी किंवा इंग्लिश मीडियम शाळेत मुलांना शिकवतात. या शाळांना फी माफ नाही. शाळेत जायचे नाही, ऑनलाईन शाळा झाली. पण फी भरावी लागली. त्याचा तगादा चालू आहे. ‘अपमान वाटतो पण मजबुरी आहे!’ असे अनेक जणी सांगतात. स्मार्टफोन ज्यांच्या घरी नाही त्यांच्या मुलांची शिकण्याची संधी हुकते आहे असे वाटते.

घरात पूर्वीपासून आपसातील वादविवाद होते. या करोनाच्या लॉकडाऊनमध्ये ते इतके वाढले की हमरीतुमरीवर आले. पोलीस चौकीत कुणीच कर्मचारी नसायचे. सर्व पोलीस  बंदोबस्तासाठी गेलेले असायचे. घरात स्त्रियांना मारहाण वाढली पण तक्रार करायला ठिकाणा नाही. बेवड्यांना दारू हवी असायची. त्यासाठी ते घरात धिंगाणा करायचे. खूप जास्त पैसे देऊन दारू प्यायचे. त्यासाठी घरात चोऱ्या, हाणामारी, वस्तू गहाण ठेवणे असे सारे चालायचे. ‘कमाई झिरो बेवड्या बनला गमाईचा हिरो’ असे घडले.

या सगळ्या संकटात एप्रिलमध्ये रेशनवर गहू, तांदूळ मोफत मिळाले. नोव्हेंबरपर्यंत सर्व रेशनकार्डवर धान्य मिळाले. ही मदत उपयोगी पडली असे सर्वजणींनी सांगितले. अनेक संस्थांनी जीवनावश्यक किराणामालांची किट्स तयार करून वाटलीत. काही जणींना दिलासा मिळाला हेही आवर्जून सांगितले. अनेक वस्त्यांमध्ये कार्यकर्ते मदत करण्यात तत्पर होते; असे जाणवले. रोज ताप मोजणे, ऑक्सिजन पातळी मोजणे हे काम ते करायचे. आजाऱ्यांना, करोनाग्रस्तांना मदत करायचे. पुणे मनपानेही मोफत उपचार, ॲम्ब्युलन्सची मदत केली. हाही मोठा दिलासा होता. उपचार मोफत मिळाले हे महत्त्वाचे ठरले.

घरेलू कामगार महिला म्हणतात, “आमची पूर्वीची कामे परत मिळायला पाहिजे. या सहा-सात महिन्यात सर्वांनाच कर्ज काढावे लागले. ते फेडण्यासाठी सरकारने आर्थिक मदत किमान दहा हजार रुपये महिना द्यावी. घरमालकाने भाडे थकले म्हणून बाहेर काढता कामा नये असा बंदोबस्त केला पाहिजे. दिवाळीचा बोनस सर्व मालकिणींनी द्यावा. सर्वच शाळांमधील शिक्षण मोफत करा. दिवाळीसाठी रेशनवर साखर, रवा, मैदा, तूप, डाळी या वस्तूंचा पुरवठा करा.

(अनेक घरेलू कामगारांना अजूनही मदतीची नितांत गरज आहे. या गरजूंना मदतीसाठी आपण मेधा थत्ते – 9422530186 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.)

मेधा थत्ते, पुणे शहर मोलकरीण संघटना 

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

भारतात कोव्हिड-19 आटोक्यात येत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला भारतात नऊ लाख रुग्ण कोव्हिडग्रस्त होते. आता ही संख्या सहा लाखांपेक्षा कमी झाली आहे. मृत्यूचा दर १.२ टक्क्यावरून ०.४ टक्क्यावर घसरला आहे. पण जगात मात्र कोव्हिडचं प्रमाण खूप वाढत आहे.

अमेरिकेत जुलैमध्ये आलेली दुसरी लाट ऑगस्टमध्ये ओसरू लागली होती. पण ती पूर्ण ओसरायच्या आत सप्टेंबरच्या सुरुवातीला तिसरी लाट आली. ती  त्याहीपेक्षा मोठी आहे आणि अजून वाढतच आहे. दुसऱ्या लाटेत तिथं कोव्हिडच्या रोज जास्तीत जास्त ७५,००० नव्या केसेस समोर येत होत्या.  सध्या रोज ९०,००० केसेस येत आहेत. भारतात हल्ली रोज ५०,००० पेक्षाही कमी नव्या केसेस आढळून येतात. अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या पावपट आहे. हे लक्षात घेतलं तर अमेरिकेत कोव्हिडचा प्रादुर्भाव भारताच्या तुलनेत किती मोठा आहे हे लक्षात येईल.

युरोपमधली स्थिती तर आणखीनच वाईट आहे. सोबत जोडलेल्या आलेखात एक लाख लोकसंख्येमागे गेल्या चौदा दिवसात किती नव्या केसेस आल्या ते दाखवलं आहे. त्यात दिसून येईल की फ्रांसमध्ये दर लाख लोकांमागे गेल्या चौदा दिवसात जवळपास ७०० नव्या केसेस आल्या. ऑक्टोबरच्या सुरुवातीला त्या फक्त २५० होत्या. यावरून तिथं किती भयानक प्रमाणात हा रोग वाढत आहे ते समजेल. त्या खालोखाल स्पेन (४९०), अर्जेन्टिना (४४०), यु.के. (४३०) हे देश आहेत. अर्जेन्टिनामध्ये तो काहीसा स्थिरावला असला तरी बाकी देशात वेगाने वाढत आहे.

भारतात हे प्रमाण कधीच १०० च्या वर गेलं नव्हतं. आता तर ते उताराला लागून ७० च्या आसपास आलं आहे. पण आपल्याला गाफील राहून चालणार नाही. फ्रांस, यु. के. आणि स्पेनमध्ये जून-जुलैमध्ये हे प्रमाण जवळजवळ शून्यावर आलं होतं पण ते किती पटकन प्रचंड वाढलं ते पहा.

भारतात टेस्ट्स कमी होतात, त्यामुळे भारतात हा रोग उताराला लागल्यासारखा असं दिसतं, असा आक्षेप काहीजण घेतात. पण ते खरं नाही. भारतातल्या टेस्ट्सची आकडेवारी पाहिली तर टेस्ट्स कमी होत आहेत असं दिसत तरी नाही. त्यामुळे भारतात कोव्हिड कमी होत आहे यात शंका घ्यायला जागा नाही. पण त्यामुळे आनंदून जाऊन सगळे निर्बंध टाकून दिले तर पश्चात्तापाची पाळी येऊ शकेल. याचं कारण कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेची भीती तज्ज्ञांना वाटते.

त्यांना ही भीती वाटते कारण ऑक्टोबर महिन्यात युरोपमधील सर्व देशात कोव्हिडचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गेल्या आठ महिन्यात युरोपमधल्या देशात कोव्हिडने हातपाय कसे पसरले यावर एक नजर टाकली तर या भीतीमागचं कारण लक्षात येईल.

ऑस्ट्रिया- ऑस्ट्रियात मार्च-एप्रिलमध्ये एक लाट येऊन गेली होती. त्यावेळी एका दिवसात जास्तीत जास्त १००० रुग्ण आढळत असत. पुढे हे प्रमाण कमी होऊन जून-जुलैमध्ये जवळपास शून्यावर आलं होतं. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ते हळूहळू वाढत गेलं आणि ऑक्टोबरमध्ये फार झपाट्याने वाढलं. सध्या त्या देशात कोव्हिडचे दररोज सुमारे ५,५०० रुग्ण सापडत आहेत.

बेल्जियम – या देशाची स्थितीसुद्धा पुष्कळ अंशी ऑस्ट्रियासारखीच आहे, मार्च-एप्रिलमध्ये एक लाट येऊन गेली होती. त्यावेळी एका दिवसात जास्तीत जास्त १५०० रुग्ण आढळत असत. तिथंही हे प्रमाण कमी होऊन जून-जुलैमध्ये जवळपास शून्यावर आलं होतं. सप्टेंबरपासून हळूहळू वाढत गेलं आणि ऑक्टोबरमध्ये फारचं झपाट्याने वाढलं. इतकं की सध्या तिथे दररोज तब्बल २०,००० ते २५,००० रुग्ण सापडत आहेत.

डेन्मार्क –  एप्रिलमध्ये आलेल्या लाटेत डेन्मार्कमध्ये रोज जास्तीत जास्त तीन-चारशे कोव्हिड रुग्ण सापडत असत. जून-जुलैमध्ये ही संख्या शंभरपर्यंत घटली होती. पण सप्टेंबरपासून वेगाने वाढू लागली आणि ऑक्टोबरच्या उत्तरार्धात रोज हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत.

फ्रांस – मार्च-एप्रिलमध्ये आलेल्या पहिल्या लाटेत पीकवर असताना रोज चार-पाच हजार नवे रुग्ण आढळत होते. जून-जुलैमध्ये हे प्रमाण कमी होऊन जवळपास शून्यावर आलं होतं. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ते हळूहळू वाढत गेलं आणि ऑक्टोबरमध्ये फार झपाट्याने वाढलं. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या देशात कोव्हिडचे दररोज तब्बल ५०,००० रुग्ण सापडत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दहापट!

जर्मनी – जर्मनीची स्थितीसुद्धा पुष्कळ अंशी फ्रांससारखीच आहे, मार्च-एप्रिलमध्ये एक लाट येऊन गेली होती. त्यावेळी एका दिवसात सुमारे ५,००० ते ७,००० रुग्ण आढळत असत. हे प्रमाण कमी होऊन जून-जुलैमध्ये रोज हजारपेक्षा कमी झालं होतं. सप्टेंबरपासून ते वाढू लागलं आणि ऑक्टोबरमध्ये फारच झपाट्याने वाढून दररोज १५,००० ते २०,००० झालं. ऑक्टोबर अखेरीस ते थोडं कमी होऊन सध्या रोज सुमारे १२,००० रुग्ण सापडत आहेत.

इटली – इटलीत फेब्रुवारीपासूनच कोव्हिडचे रुग्ण सापडू लागले. ते झपाट्याने वाढून मार्च अखेरीस रोज ७,००० पेक्षा रुग्ण आढळू लागले. ते हळूहळू कमी होऊन जून-जुलै-ऑगस्टमध्ये नवे रुग्ण सापडायचं प्रमाण खूप कमी झालं. सप्टेंबरमध्ये ते पुन्हा वाढू लागलं आणि ऑक्टोबरमध्ये अतिशय वेगाने वाढलं. महिन्याभरात चक्क पंधरापट वाढून  २,००० वरून आता थेट ३०,००० वर गेलंय.

स्पेन, पोर्तुगाल – या देशांची कहाणीही काही वेगळी नाही. मार्च-एप्रिलमध्ये पहिली लाट,  मे-जूनमध्ये ती ओसरणं, जुलै-ऑगस्टमध्ये दुसऱ्या लाटेची सुरुवात आणि ऑक्टोबरमध्ये ती प्रचंड प्रमाणात वाढणे. ही दुसरी लाट पहिलीच्या मानाने बरीच मोठी असते. दुसऱ्या लाटेत सध्या आढळणारे रुग्ण पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट असणं हा पॅटर्न नॉर्वेमध्येही दिसतो. फक्त रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे. 

युरोपियन देशात दिसणारा हा पॅटर्न भारतात तर दिसणार नाही ना या गोष्टीची चिंता तज्ज्ञांना वाटते आहे. युरोप सोडून इतर देशांमध्ये कोव्हिड संदर्भात काय स्थिती आहे त्यावरही एक नजर टाकूयात.

अमेरिका आणि भारताखालोखाल कोव्हिडचा प्रादुर्भाव ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये पहिली लाट एप्रिलमध्ये आली. जुलै-ऑगस्टमध्ये तिनं शिखर गाठलं. रोज साठ हजार रुग्ण! मग ती लाट उताराला लागून सध्या तिथं रोज पंधरा-वीस हजार रुग्ण सापडत आहेत.

त्या खालोखाल नंबर लागतो रशियाचा. तिथं पहिली लाट मेमध्ये आली. रोज दहा हजार रुग्ण तेव्हा आढळत होते. ते कमी होऊन ऑगस्टमध्ये ही संख्या पाच हजारावर आली. पण सप्टेंबरमध्ये दुसरी लाट आली. सध्या तिथं रोज सतरा-अठरा हजार रुग्ण सापडत आहेत. आणि ही संख्या कमी व्हायची लक्षणं दिसतं नाहीयेत.

युरोपमधले देश सोडले तर मग नंबर येतो अर्जेन्टिनाचा. तिथं मेपासून कोव्हिडचे रुग्ण सापडायला लागले आणि ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येने शिखर गाठलं. रोज पंधरा-वीस हजार रुग्ण. गेल्या दोन आठवड्यात मात्र तिथं हा रोग झपाट्यानं उताराला लागून सध्या रोज दहा हजारापेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत.

अर्जेन्टिनापाठोपाठ नंबर लागतो कोलंबियाचा. तिथंही सुरुवात मेमध्ये झाली आणि ऑगस्टमध्ये शिखर गाठलं. रोज बारा-तेरा हजार रुग्ण. मग काहीसा उताराला लागला पण ऑक्टोबरमध्ये पुन्हा वाढू लागला. सध्या पुन्हा रोज दहा हजार रुग्ण मिळताहेत. दुसऱ्या लाटेचं शिखर पहिल्या लाटेच्या वर जातं आहे की आता तिथं रोगाची साथ उताराला लागते ते पाहायचं. मग येतो मॅक्सीको. तिथं गेले सहा महिने रोज चार ते आठ हजार रुग्ण सापडत आहेत. फार वाढतही नाहीत आणि कमीही होत नाहीत.

साउथ आफ्रिकेमध्ये मात्र दुसरी लाट आली नाही (निदान आजपर्यंत!). जून-जुलैमध्ये आलेली पहिली लाट उताराला लागून गेले दोन महिने रुग्णसंख्या दोन हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. इराणमध्ये पहिली लाट एप्रिलमध्ये आली. त्यावेळी तीन हजाराचं शिखर गाठल्यावर रोग उताराला लागला. पण मेमध्ये पुन्हा वाढून रोज दोन-अडीच हजार रुग्ण आढळू लागले. ही पातळी सप्टेंबरपर्यंत स्थिर राहिली पण ऑक्टोबरमध्ये पुन्हा झपाट्याने वाढून सध्या रोज आठ हजार रुग्ण सापडत आहेत. इराकमध्ये गेले चार-पाच महिने रोज तीन ते पाच हजार रुग्ण सापडत आहेत. तिथंही रोग फार झपाट्याने वाढत नसला तरी उतारालाही लागलेला नाही.

भारताच्या पूर्वेकडचे देश बघितले तर इंडोनेशियात कोव्हिड एप्रिलपासून हळूहळू वाढत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्यानं चार हजाराची पातळी गाठली. गेल्या आठवड्यात मात्र तो थोडा कमी होऊ लागलाय. सध्या रुग्णसंख्या अडीच हजार. मलेशियाचा आलेख मात्र हुबेहूब युरोपियन देशांसारखा आहे. मार्च-एप्रिलमध्ये पहिली लाट. मग दोन-तीन महिने नगण्य रुग्णसंख्या. सप्टेंबरपासून अचानक उसळी घेऊन दुसरी लाट. ऑक्टोबरमध्ये बाराशेची पातळी. तोच पॅटर्न. मॅनमारची वेगळीच तऱ्हा. जूनपर्यंत तिथं कोव्हिड अजिबात नव्हतं. पण ऑगस्टपासून हळूहळू वाढत जाऊन ऑक्टोबरच्या मध्याला दोन हजारचे शिखर गाठलं. मात्र आता काहीसा उताराला लागून हा रोग हजाराच्या आसपास स्थिरावला आहे. बांगलादेशची स्थिती तुलनेनं बरी म्हणावी लागेल. जूनमध्ये चार हजारची पातळी गाठल्यावर गेले दोन महिने रोज हजार-दीड हजारवर रुग्णसंख्या स्थिरावली आहे.

पश्चिमेकडे सौदी अरेबियाची स्थितीही इतकी वाईट नाही. जूनमध्ये पाच हजाराचं शिखर गाठल्यावर रोग हळूहळू उताराला लागला आणि सध्या रोज दोन-अडीचशे रुग्ण आढळत आहेत. नेमका हाच पॅटर्न पाकिस्तानमध्येही दिसतो आहे. जूनमध्ये सहा हजाराचं शिखर, मग पुढील दोन महिन्यात उताराला लागून सध्या हजाराच्या आतबाहेर रुग्णसंख्या. 

थोडक्यात, या रोगाच्या प्रादुर्भावाबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही. कुठे खूप जास्त कुठे कमी. पण कमी झाला तरी पूर्णपणे कुठं नाहीसा झालेला नाही. अमेरिकेत तिसरी लाट आली आहे आणि ती पहिलीच्या तिप्पट आणि दुसरीच्या दीडपट मोठी आहे. युरोपमध्ये, रशियात आणि मलेशियात पहिली लाट ओसरल्यावर दोन तीन महिन्यांनी दुसरी आली आहे. आणि ती पहिल्यापेक्षा खूपच जास्त तीव्र आहे. ब्राझील, अर्जेन्टिना आणि साउथ आफ्रिकेत मात्र एक लाट उताराला लागली. दुसरी आली नाही. बांगलादेश, सौदी अरेबिया, पाकिस्तानमध्येही जवळपास हाच पॅटर्न दिसतोय.

भारत कुठला पॅटर्न फॉलो करेल? आशा करूया की आपण युरोप-अमेरिकेच्या रस्त्यानं जाणार नाही. दुसरी लाट येणार नाही.

दुसरी लाट टाळता येऊ शकेल. पुरेशी काळजी घेतली तर ते अशक्य नाही. मात्र खूप सावधगिरी मात्र बाळगावी लागेल. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सतत हात धूत राहणे इत्यादी नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. अजून काही दिवस तरी अत्यावश्यक असल्याशिवाय बाहेर न पडणे, गर्दी न करणे हे पथ्य कटाक्षाने पाळावं लागेल.

जमेल हे आपल्याला? जमावावेच लागेल.

सुबोध जावडेकर हे सुप्रसिद्ध लेखक असून त्यांच्या विज्ञानकथा व विज्ञानविषयक लेखन लोकप्रिय आहे.

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

मेळघाट, जिल्हा – अमरावती. कुपोषण व बाल-मातामृत्यूंसाठी कुप्रसिद्ध भाग. ‘महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल (महान)’च्या माध्यमातून डॉ. अशिष सातव यांची टीम या दुर्गम आदिवासी भागात कार्यरत आहे. सध्या आरोग्य सेवांची वानवा असलेल्या या भागात कोव्हिड चाचणीची सुविधा उपलब्ध व्हायलाही अक्षम्य दिरंगाई झाली त्यामुळे उद्भवलेल्या एका दुर्दैवी मृत्यूची ही हकिगत. अशा घटनांना ‘महान’ने पटलावर आणलं. परिणामी आता मेळघाटमध्ये करोना चाचणी होत आहे…

लॉकडाऊन सुरू झालं तेव्हाची ही घटना. अनिल हा मेळघाटातील एक मजूर. या भागातील अनेकांसारखाचं अनिल मोलमजुरीसाठी विस्थापन करत असे. पण काही कारणाने तो लॉकडाऊनपूर्वीच गावी परतला. परिणामी लॉकडाऊनमध्ये तो परगावी अडकला नाही किंवा गावी यायला त्याला पायपीटही करावी लागली नाही या अर्थाने तो सुदैवी. पण तो मेळघाटात होता म्हणूनच केवळ दुर्दैवी ठरला.

अनिल अचानक आजारी पडला. त्याला ताप, सर्दी व छातीत दुखी असा त्रास जाणवू लागला. अनिलच्या भावाने त्याला धारणीमधील खासगी डॉक्टरांकडे नेलं. या डॉक्टरांनी अनिलला वेदनाशामक औषधं दिली नि सलाईन चढवलं. आराम वाटल्याने अनिल घरी आला.

पण दुसर्‍याच दिवशी अनिलला रक्तस्राव, थंडी नि ताप जाणवू लागला. श्वास घेणंही कठीण झालं. त्याच दिवशी जनता कर्फ्यू जाहीर झालेला. बातम्यांमध्ये सातत्याने करोनाबद्दल बोललं जात होतं. त्यामुळे अनिलच्या भावाला ही करोनाचीच लक्षणं वाटली. त्याने अनिलला धारणीतील उपजिल्हा रुग्णालयात नेलं. येथील डॉक्टरांनाही करोनाचीच शंका आली. कारण अनिलला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याची ऑक्सिजन लेव्हलही (SPO2) पन्नास टक्क्यांवर आलेली. त्यामुळे अनिलला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवणं डॉक्टरांना आवश्यक वाटलं. पण अमरावतीच्या शासकीय दवाखान्यात पेशंटला पाठवायचं तर हे अंतर धारणीपासून किमान चार तासांचं. अनिलची अवस्था तर नाजूक होती. त्यामुळे अनिलला आमच्या ‘महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल’मध्ये आणलं गेलं.

अनिल करोनाचा संशयित रुग्ण होता. असा पेशंट आणला जाणार असल्याची सूचना मिळाल्याने आम्ही पूर्वतयारी केली. हा अगदीच सुरुवातीचा काळ असल्याने कोव्हिड रुग्णांसाठीच्या मूलभूत सुविधांचे निकषही ग्रामीण भागातील रुग्णालयांपर्यंत पोहोचले नव्हते. पण आमच्याकडे व्हेंटिलेटरची सुविधा आहे. त्यामुळे आम्ही किमान तयारीत होतो.

पेशंटला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, प्राथमिक केस हिस्टरीवरून आम्हालाही करोनाचीच शंका आली. सुदैवाने आमच्याकडे पीपीई कीट होते. डॉक्टर्स व स्टाफची सुरक्षितता महत्त्वाची होती. आम्ही पीपीई कीट अंगावर चढवला. पेशंटला लागलीच ऑक्सिजन सपोर्ट दिला. त्यामुळे त्याच्यात सकारात्मक बदल दिसू लागले. अनिलची ऑक्सिजन लेव्हल वाढली पण त्याला श्वास घ्यायला फारच त्रास होत होता. पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंतच्या अवस्थेचा आम्ही आढावा घेतला. त्याची लक्षणे व श्वास घेण्यातील आत्यंतिक अडचणी पाहता आम्ही प्राथमिक इलाज तर केलेले पण अशा रुग्णांना तातडीने अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचे शासकीय आदेश होते. आमच्यासमोर पर्यायच नव्हता.

आम्ही अनिलला व्हेंटिलेटर लावलेला. त्यामुळे त्याची ऑक्सिजन लेव्हल चांगलीच सुधारली. ती  आता 92% झालेली. डॉ. अशिष सातवही सातत्याने पेशंटकडे लक्ष ठेवून होते. अनिल अधिक स्थिर झाला. मग आम्ही त्याचा ईसीजी घेतला. या चाचणीतून त्याला हृदयाशी निगडित आजार जाणवला. अनिलला आतापर्यंत सलाईनही भरपूर दिलं गेलं होतं त्यामुळेही त्याच्या फुफ्फुसात सूज असावी असाही आमचा अंदाज होता. आम्ही केलेल्या चाचण्या व काढलेल्या निष्कर्षांना येथे विस्ताराने लिहित नाही.

अनिलची ऑक्सिजन लेव्हल सुधारत होती नि आवश्यक चाचण्यांवरून आमच्याकडेच त्याच्यावर उपचार शक्य होते इतपत नोंदवणे सर्वसामान्य वाचकांसाठी पुरेसं आहे. पण लक्षणांवरून त्याची करोना चाचणी आवश्यक होती. ती सुविधा मेळघाटमध्ये कुठेही नव्हती. त्यासाठी पेशंटला अमरावतीलाच न्यावं लागणार होतं. आम्ही 108 नंबरला फोन करून रुग्णवाहिका मागवली. या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर होता. त्यामुळे अनिल अमरावतीला पोहोचेपर्यंत स्थिर राहील याची शाश्वती वाटली. पण रुग्णवाहिकेसोबत आलेल्या डॉक्टरांना पेशंटला व्हेंटिलेटर सपोर्ट कसा द्यायचा याची माहिती नव्हती. आम्ही त्या नवशिक्या डॉक्टरांना आवश्यक ती माहिती दिली. आता पेशंट सुरक्षित होता. आम्ही निर्धास्त झालो.

पेशंटची रवानगी जिल्हा रुग्णालयात झाली नि आमच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. आम्ही भानावर आलो. मेळघाटमध्ये ‘रेस्परेटरी डिस्ट्रेस केसेस’ हाताळण्याची अगदीच तुटपुंजी सुविधा आहे! या विचाराने आम्ही अस्वस्थ झालो. अशी अस्वस्थता मेळघाटमध्ये आम्हाला नेहमीच घेरते. यावेळी तिला करोनाची पार्श्वभूमी होती.

अनिल अमरावती जिल्हा रुग्णालयापर्यंत व्यवस्थित पोहोचला. त्याला तिथे विलगीकरण कक्षात ठेवलं गेलं. आमच्या जिवात जीव आला. पण दुसर्‍याच दिवशी अनिल गेल्याची वाईट बातमी आली. त्याची करोना चाचणी निगेटिव्ह आलेली. अनिलची करोना चाचणी मेळघाटमध्येच झाली असती तर तो नक्की वाचला असता. त्याला आयसीयू केअरमध्ये ठेवून सहज वाचवता आलं असतं. पण कोव्हिड चाचणीची सुविधाचं नव्हती त्यामुळे त्याच्यावर उपचार करता आले नाहीत. ही बाब आमच्यासाठी शरमेची व खेदाची होती. त्याचं कुटुंब, गाव-समाज नि देशानं एका जिवाला नाहक गमावलं. आम्ही हतबल होतो.

अनेक प्रश्न फेर धरून नाचू लागले. मेळघाटातील अनेक मजूर मोठमोठ्या शहरांमध्ये पोटासाठी जातात. करोनामुळे हे गरीब लोक अनेक यातायात करून गावी परतलेत. यांना केवळ करोना चाचणीची सुविधा नाही म्हणून पुन्हा शहराठिकाणी पाठवणं योग्य आहे का? मेळघाटमध्ये वाहतुकीच्या सुविधा नाहीत, डोंगरदर्‍यातून हॉस्पिटलपर्यंत पोहचतानाच अनेक गंभीर रुग्णांचा मृत्यू होतो. आम्हाला हेही अजून माहीत नव्हतं की लॉकडाऊनमुळे अशा किती रुग्णांची गैरसोय झालेली? कित्येकांनी रुग्णालयांच्या वाटेवर प्राण सोडले? मेळघाटमध्ये करोना चाचणी कधी सुरू होणार? या प्रश्नांनी आम्ही बैचेन झालो. 

मेळघाटात प्रतिकूल परिस्थिती आहे पण तरीही येथे रुग्णसेवेला आम्ही डॉक्टर मंडळी तयार आहोत. पण इथे मनुष्यबळाचा प्रश्न फारच तीव्र आहे. मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण आमच्याकडे येऊ लागले तर त्यांना अमरावतीला पाठवण्यासाठी पुरेशी वाहन सुविधाही नाही. अपुर्‍या संसाधनांमुळे आम्ही डॉक्टरही रुग्णांना सेवा देताना धास्तावलो आहोत! डॉक्टरही ‘हाय रिस्क’वर आहेत!! मग गरीब रुग्णांना जिल्ह्याच्या दवाखान्यातच पाठवायचं का? अमरावतीला पाठवलेल्या कुपोषित बाळाचं प्रेत पुन्हा गावी आणण्याइतकेही पैसे या भागातील लोकांकडे नसतात. प्रेताला गावी आणण्यासाठी शववाहिनीचं भाडं परवडत नाही, केवळ म्हणून या भागातील लोक जिल्ह्याच्या रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. ‘खिशात केवळ दहा रुपये आहेत, आपल्या प्रियजनाचं पार्थिव गावी कसं न्यावं?’ अशा जीवघेण्या विवंचनेतील लोक आम्ही पाहिलेत.

या पार्श्वभूमीवर ‘करोना चाचणी मेळघाटमध्ये व्हायलाच हवी’ या विचाराने आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. ‘महान’च्या टीमने सातत्याने तीन महिने पाठपुरावा केला. परिणामी आता मेळघाटमध्ये करोना चाचणी सुरू झाली आहे. आशा आहे आता अनिल सारख्या दुर्दैवी जीवांना आपले प्राण गमवावे लागणार नाहीत. 

डॉ. विपिन खडसे हे अमरावती जिल्ह्यातील ‘महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल (महान)’ येथे डॉक्टर म्हणून काम करतात.

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.