राष्ट्रीय पोषण सप्ताह : 1 ते 7 सप्टेंबर

कॅलरी V/s सॅलरी
शरीराला लागतं पोषण म्हणजेच एनर्जी. ती येते कॅलरीतून. शरीरात गेलेलं अन्न कॅलरीत रूपांतरीत होतं. त्यामुळं अर्थातच आपण काय व किती अन्न घेवू शकतो, त्यानुसार आपल्या जगण्याचा दर्जा ठरतो. म्हणूनच तर आपला पगार आपला दर्जा ठरवतो. आपण किती सकस अन्न खातो, हे अखेर आपलं उत्पन्नच ठरवतं नाॽ

Institute of Competitiveness’ या संस्थेनं State of inequality in India हा रिपोर्ट प्रसिद्ध केलाय. त्यानुसार तुम्ही दरमहा 25 हजारांहून अधिक कमवत असाल, तर भारतातील टॉप 10% उत्पन्न गटात आहात. म्हणजे 90% भारतीयांचं उत्पन्न महिन्याकाठी 25 हजाराहून कमीय. दुसरीकडे केवळ 3% भारतीय वर्षाला 25 लाख कमवतात. गरीब-श्रीमंतात दरी वाढतेय. ही खायी आपल्या आहारावर नि जगण्यावरही प्रभाव टाकतेय.

एका नेत्यानं ‘तुमच्याकडे 10 लाखाची कार असेल, तर थोड्या भाज्या महागल्या तर ओरड का करताॽ’ अशा आशयाचं वक्तव्य नुकतंच केलं. या शेऱ्यात तथ्य वाटूही शकतं. पण ही धुळफेक आहे. नव्हे संवेदनहीनतेचा नमुनाच.

2011-12 ला भारतात अखेरचं राष्ट्रीय लोकसंख्या सर्व्हेक्षण झालं. त्या सरर्व्हेक्षणानुसार म्हणजे 10 वर्षांपुर्वीही गरीब व श्रीमंत वर्गाच्या आहारात मोठी तफावत आढळली होती. त्याकाळी भारतातील 5% शहरी वर्ग दरमहा 2,859 रूपये खाद्यपदार्थांवर खर्च करत होता. हा खर्चाचा आकडा लोकसंख्येतील सर्वात गरीब 5% लोकसंख्येच्या नऊ पट होता. तुम्हीच विचार करा, आजरोजी वाणसामानाचं बिल किती होतंॽ एकुण उत्पन्नाचा किती वाटा खाद्यपदार्थांवर खर्च होतोॽ गरीब वर्गाचं काय होत असेलॽ

अलीकडे टोमॅटोंच्या दरवाढीनं हेडलाईन्स केल्या, त्यापूर्वी लिंबूची दरवाढ झालेली. अलीकडे तांदूळ व गव्हाचे दर वाढले. दुधाचे दरही वाढताहेत. मसाल्यांच्या पदार्थांतही न भूतो दरवाढ झालीय. डाळींचे दर दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढताहेत. आलं, मिरची कुठलाही खाद्यपदार्थ घ्या भाववाढ होतेय.

India’s Citizen Environment & Consumer Economy’ च्या सर्व्हेक्षणानुसार भारतात 60% कुटुंबात केवळ एकच व्यक्ती कमावती आहे. एका पगारावर कसं भागणारॽ पोषक आहार महिला, बालकं व वृद्धांना मिळणारॽ आपला पगार नि आहार यावर व्यक्त व्हा!

शेतमालांच्या किंमती वाढल्या की शेतकरी विरूद्ध अन्य असं करू नये, कॅलरी सर्वांना लागते, भाववाढ सर्वांनाच छळते!

Prashanat khunte