• मोफत/सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी.. साथी हेल्पलाईन 94 22 32 85 78

आरोग्याच्या दुकाना तरुग्ण होताहेत कंगाल!

कोविड काळात खाजगी रुग्णालयाच्या कारभाराबद्दल स्वतःला आलेल्या अनुभवासोबतच, आरोग्य व्यवस्थेपुढे हतबल आणि कर्जबाजारी झालेल्या ग्रामीण कष्टकरी कुटुंबाची व्यथा सांगताहेत प्रशांत खुंटे. ‘वेध आरोग्याचा मध्ये वाचा ‘आरोग्याच्या दुकानात रुग्ण होताहेत  कंगाल’!

भिकाऱ्यानं गयावया करावी हुबेहूब तशाच अविर्भावात त्या बाई याचना करत होत्या. काष्ट्याची साडी. वय साठीच्या आसपास असावं. डोळ्यात आसवं. आर्जवं करताना त्यांचं पुटपुटणंही नीटसं कळत नव्हतं. या बाईंचं नाव मीनाताई. सोमवारी, 27 जुलैला त्यांच्या सात वर्षाच्या नातवाला पुण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं. बुधवारी या बालकाचा मृत्यू झाला. त्याचं पार्थिव मिळावं यासाठी त्या आर्जवं करत होत्या. रात्री आठचा सुमार होता. दूरच्या गावी पार्थिव नेणं, नंतर अंत्यसंस्काराचे सोपस्कार उरकणं याबद्दलची काळजी त्यांना असावी. पण रुग्णालयामधील बिलिंग काऊंटरवर यांची अडवणूक सुरू होती. कारकुनाला या मीनाताईच्या समस्येत स्वारस्य दिसत नव्हतं. संयोगाने मी तिथेच होतो. मी माझ्या पेशंटला डिस्चार्ज मिळावा यासाठी हुज्जत घालत होतो. या बाई विनवण्या करताना दिसल्या म्हणून आस्थेनं विचारपूस केली. समजलेली हकिकत खिन्न करणारी होती. ती सांगण्यापूर्वी माझ्या हुज्जतीचा मुद्दा सांगतो.

रुग्णांसाठी खाटा नसताना डिस्चार्ज लांबवणं योग्य?

कोरोना संक्रमण झाल्याने माझ्या भावावर याच खाजगी रुग्णालयात उपचार झाले. तो टाटा मोटर्सचा कर्मचारी असल्याने मेडिक्लेमचा आधार होता. किंबहुना मेडिक्लेम होता म्हणूनच या दवाखान्यात त्याला उपचार मिळू शकले. रुग्णांची रोख पैसे भरण्याची क्षमता किंवा मेडिक्लेम असेल तरच खासगी दवाखान्यात दाखल केले जातेय, हे वास्तव मी या दरम्यान जवळून अनुभवले आहे. भावाचे दहा दिवस या दवाखान्यात उपचार झाले. डॉक्टरांनी डिस्चार्जही घ्यायला सांगितला. पण ‘टाटा मोटर्सकडून मंजुरी मिळाली की पेशंटला न्या’, असं प्रशासनाचं मत होतं. आम्ही वाट पाहिली. रात्री आठ वाजले तरी डिस्चार्ज मिळेना. चौकशी केल्यावर ‘उद्या डिस्चार्ज घ्या’ असं सांगू लागले. याचा अर्थ आणखी एक दिवसाची रक्कम बिलामध्ये लावली जाणार होती. ‘डॉक्टरांनी सकाळी अकराला डिस्चार्जची परवानगी देऊनही दिवसभर मंजुरीची प्रक्रिया का झाली नाही?’ या माझ्या प्रश्नावर त्यांच्याकडे समाधानकारक उत्तर नव्हतं. उलट ‘मेडिक्लेममधून पैसे मिळत असल्याने तुम्ही पैशांची काळजी का करता?’ असं मला सांगितलं गेलं. मी म्हटलं, “मेडिक्लेममध्ये वर्षभरातील उपचारांची रक्कम निश्चित असते. माझा भाऊ डायलिसिसवर असून, सध्याचे कोरोनावरील उपचार तर झालेतच, शिवाय त्याच्या मुलावरही दुसऱ्या खासगी रुग्णालयामध्ये मेडिक्लेममधून उपचार झालेत. यापुढेही उपचारांची गरज आहे. मग आम्ही उगाचच गरज नसताना रुग्णालयाचं बिल का वाढू द्यावं?” अखेर माझी ही हुज्जत फलद्रूप झाली नि माझ्या भावाला डिस्चार्ज मिळाला. सध्या रुग्णालयामध्ये खाटा उपलब्ध नाहीत, म्हणून कोरोनापीडितांची चिंता मी अनुभवलीय नि हे लोक केवळ प्रशासकीय दिरंगाईने खाटा अडवून ठेवतायेत याचा संतापही येत होता. म्हणून मी हुज्जत घातली. परिणामी लगेचच डिस्चार्ज मिळाला. अन्य कुणी असता तर सहजच बिलाची रक्कम वाढवत, डिस्चार्ज लांबला असता. मीही हुज्जत घालत असताना ज्या मीनाताईही बिलिंग काउंटरवर विनवण्या करत होत्या, त्यांचीही अशीच अडवणूक सुरू होती.

केवळ सात दिवसात कंगाल

आता मीनाताई आणि नाहक जीव गमावलेल्या त्यांच्या नातवाची हकिकत सांगतो. हे सर्व घडत असतानाच मी मीनाताई व त्यांचा मुलगा यांच्याशीही बोलत होतो. मीनाताईंनी नंतर सांगितलं, ‘रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी त्यांनी पाच टक्के दराने खासगी सावकाराकडून कर्ज काढलंय. ते फेडण्यासाठी जमीन विकण्याशिवाय आता त्यांना गत्यंतर नाही.’ 23 ते 28 जुलै या सात दिवसात या कुटुंबावर दिवाळखोरीची वेळ आलीय. या आठवड्याभरात आपल्या वैद्यकीय व्यवस्थेनं त्यांना अक्षरश: कंगाल करून सोडलंय.

तेवीस तारखेला मीनातार्ईंच्या नातवाला छोटासा अपघात झाला. हा नातू म्हणजे सात वर्षाचा रुद्र. तो शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत होता. त्याची आई काही वर्षांपूर्वी बाळंतपणात वारली. रुद्रला आणखी एक छोटा भाऊ आहे. या भावंडांचे वडील अपंग आहेत. त्यामुळे आजीच यांचा सांभाळ करत आहे, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अण्णापूर हे त्यांचं गाव. रुद्र सकाळी अंघोळीला बसला होता. अंघोळीसाठी तापलेलं पाणी कलंडलं नि या पोराचा पार्श्वभाग भाजला. मीनाताई सांगतात, “आमच्या भागातल्या एका डॉक्टरकडे आम्ही पोराला नेलं, तीन दिवस डॉक्टरांनी पोराला पट्ट्या लावल्या आणि बिसलेरीचं पाणी जखमेवर टाकत राहिला. जखमेत पॉयझन झाल्यावर ‘केस पुण्याला घेऊन जा म्हणाला’… या डॉक्टरांनी दीड लाख रुपये घेतले.”

गावातही लूट नि शहरातही तेच

मुलाला गंभीर अवस्थेत पुण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं. या ठिकाणी पेशंटला दाखल करतानाच पन्नास हजार रुपये जमा करायला सांगितले. त्यानंतर तीस हजारांची औषधं यांनी आणून दिली. शिवाय वेळोवेळी विविध रकमा जमा केल्या. केवळ दीड दिवस हे मूल या दवाखान्यात होतं. 29 जुलैला, बुधवारी दुपारी रुद्रची प्राणज्योत मालवली. तोवर या शेतकरी कुटुंबाकडून आणखी एक लाख रुपये घेतले गेले होते. जवळपास दोन लाख रुपये खर्च झाले होते. मूल हातातून गेलं होतं. नि आणखी ‘एकतीस हजार रुपये भरल्याशिवाय पार्थिव मिळणार नाही!’ असा दबाव आणला जात होता. मीनाताई म्हणाल्या, “आमच्याकडून आधी वीस हजार रुपये घेतलेत, त्याबद्दल काहीच बोलत नाहीत, उलट आणखी पैशे मागतायत. आम्ही आणखी कुठून पैशे भरू?”

पुण्यात ‘रुग्ण हक्क परिषद’ ही संघटना गरीब रुग्णांना मदत करते. हे मला माहीत होतं. मी या संघटनेचा संपर्क त्यांना दिला. पण तिथे फोन उचलला गेला नाही. ही घडामोड घडत असतानाच माझी हुज्जतही सुरू होती. परिणामी माझ्या भावाला डिस्चार्ज मिळाला. त्याचवेळी मीनाताईही तिथे होत्या. त्यांनाही अधिक पैसे न घेता पार्थिव देण्यात आलं.

मीनाताईंची दोन्ही मुलं मोलमजुरीवर गुजराण करतात. त्यांचे यजमान वृद्ध आहेत. या कुटुंबावर आलेल्या आपत्तीने तीन लाखांचं कर्ज झालं आहे. मीनाताई म्हणतात, “माझ्याकडं एक एकर जमिनीचा तुकडा आहे. तो इकूनबी कर्ज फिटणार नाही. आता तुम्हीच आम्हाला काहीतरी मदत करा…”

सामान्य रुग्णाची हतबलता

एकीकडे कोविडच्या युद्धात वैद्यकीय यंत्रणा झटत असल्याने जनमानसात डॉक्टर व हॉस्पिटल्सबद्दल नितांत आदर आहे. दुसरीकडे मीनातार्ईंसारखे गरीब अक्षरश: देशोधडीला लागताहेत. त्यांच्या मदतीला कुणीही नाही. महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’तून मीनाताईंच्या नातवावर कदाचित उपचार होऊ शकले असते. ही योजना कोणकोणत्या दवाखान्यांमध्ये राबवली जातेय, योजनेंतर्गत हेल्पलाईनचा नंबर, आरोग्य मित्रांची उपलब्धता याची सूतरामही कल्पना मीनातार्ईंना नाही.

शासनाच्या काही योजना आहेत पण त्या लोकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोचलेल्या नाहीत. गावागावात विनापदवी डॉक्टरकी करणारे फोफावले आहेतच. शहरात अनेक खर्चांना तोंड द्यावे लागते. खासगी रुग्णालयांची वाढीव बिले, रुग्णांची लूटमार, हे मुद्दे नवे नाहीत. पण त्या विरोधात दाद मागायची धड यंत्रणा उभी नाही. योजनांचीच माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही तिथे दाद कुठे मागायची.

मीनाताई, मी घातली तशी हुज्जतही घालू शकल्या नाहीत. त्या केवळ आपल्या नातवाचे पार्थिव मिळावं यासाठी गयावया करत राहिल्या. आपली एकमेव पुंजी फुकाच्या भावात विकून त्या गप्प बसल्या… माझ्या मनात एक दुष्ट विचार आला, ‘आता दवाखान्यांच्या चकरा मारताना यांना कोरोनाची लागण झाली तर काय परिस्थिती ओढवेल?’  

प्रशांत खुंटे हे आरोग्य कार्यकर्ते असून सदर लेखन ‘ठाकूर फाउंडेशन’, यु.एस.ए.कडून ‘इनव्हेस्टिगेटिंग रिपोर्टिंग इन पब्लिक हेल्थ’ या शिष्यवृत्ती अंतर्गत केलेल्या कामावर आधारित आहे (वरील लेखात डॉक्टरांचे नाव गोपनीय ठेवले असून रुग्णाच्या नातेवाईकाचे नाव बदलण्यात आले आहे.)