• मोफत/सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी.. साथी हेल्पलाईन 94 22 32 85 78

कोव्हिड-१९ काळात मानसिक आरोग्याचे आव्हान

कोव्हिड-१९ आल्यापासून भीती-चिंता-निराशा, निद्रानाश, आरोग्याची अति काळजी, भूक मंदावणे, थकवा, वैफल्यग्रस्तता, कोरोना होईल अशी काळजी, आत्महत्येचे विचार येणे अशा मानसिक त्रासांची लक्षणे वाढलीयत. व्यसन व झोपेच्या गोळ्यांचा वापरदेखील नेहमीच्या तुलनेत अधिक होतोय. या समस्यांचा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कौस्तुभ जोग यांनी घेतलेला आढावा व सुचवलेले …

कोव्हिड महामारीचा मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम जाणून घेण्याआधी भारतातील मानसिक स्वास्थ्याची सद्य:स्थिती जाणून घेऊ. राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मेंदूविषयक संस्था, बेंगलोर (२०१६)च्या रिपोर्टनुसार भारतामध्ये कमीत कमी १५ करोड लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे सामान्य किंवा गंभीर मानसिक त्रास किंवा आजार आहेत. कोव्हिड महामारीने यामध्ये भर टाकली आहे, हे निश्चित! याच रिपोर्टनुसार ८० ते ८५ टक्के लोकांना कोणतेही मानसिक उपचार (गोळ्या किंवा औषधे) मिळत नाहीत. परंतु मानसिक आजार किंवा त्रास यातून बरे होण्यासाठी फक्त गोळ्या घेऊन उपयोग नाही तर त्यासाठी मनोसामाजिक उपचारांची नितांत गरज असते. या अनुषंगाने कदाचित ८५ टक्के पेक्षा जास्त लोकांना जरुरी असलेले मनोसामाजिक उपचार किंवा आधार मिळत नाहीत असे मानले तरी गैर ठरणार नाही. हे वास्तव गंभीर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ‘उपचारामधील असलेली दरी’साठी पुढील गोष्टी कारणीभूत आहेत –

समाजात असणारी मानसिक आजाराबद्दलची भीती, कलंकित भावना आणि या अनुषंगाने होणारा भेदभाव; जनजागृतीचा अभाव; मानसिक कौशल्ये असलेले अपुरे मनुष्यबळ; सरकारी पातळीवर असणारी उदासीनता आणि मानसिक स्वास्थ्यासाठी असणारे तोटके बजेट.

अजून एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे- मानसिक त्रास किंवा आजार हा बहुतांशी वेळा विविध कौटुंबिक, सामाजिक तणाव आणि आर्थिक अस्थिरता तसेच गरिबी, भेदभाव या कारणांमुळे होतो. मानसिक त्रास असलेल्या व्यक्तीस सामाजिक, कौटुंबिक आधाराची, कामाची आणि आर्थिक स्थिरतेची आवश्यकता असते, नुसत्या गोळ्या घेऊन मानसिक आजार बरा होत नाही.

मार्च २०२० पासून भारतभर पसरत गेलेली कोव्हिड-१९ ची महामारी आणि घालण्यात आलेले निर्बंध, त्यामुळे विस्कटलेली आर्थिक आणि सामाजिक घडी या सगळ्याचाच मानसिक स्वास्थ्यावर गंभीर आणि खोलवर परिणाम झाला आहे आणि होत राहणार आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपापल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या परिस्थितीमुळे मानसिक स्वास्थ्यावर काय परिणाम होत आहेत, कोणत्या व्यक्ती किंवा गट जास्त ताणतणावाखाली आहेत, कोरोनाबाधित व्यक्तींना काही मानसिक त्रास होत आहेत आणि यासाठी वैयक्तिक आणि सरकारी पातळीवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याचा आढावा घेऊ. 

या महामारीमुळे भीती, निराशा, हतबलता, अनिश्चितता, अविश्वास अशा सर्वच भावना वाढल्या आहेत. त्यातूनच प्रसारमाध्यमातून मिळणारी अतिमाहिती, गैरमाहिती, अफवा यामुळे मानसिक ताणतणाव अधिकच वाढत चालले आहेत. गेल्या ७ ते ८ महिन्यात- भीती, चिंता, निराशा, झोप न येणे, आरोग्याची अति काळजी वाटणे, भूक कमी होणे, थकवा येणे, वैफल्यग्रस्त वाटणे, कोरोना होईल अशी काळजी वाटत राहणे, आणि आत्महत्येचे विचार येणे अशा प्रकारची मानसिक त्रासाची लक्षणे दिसत आहेत. दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे, झोपेच्या गोळ्या अधिक प्रमाणात घेतल्या जात आहेत. अनेकांनी या काळात आत्महत्येमुळे जीव गमावले आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सेस, पोलीस, स्वच्छताकर्मी, सरकारी अधिकारी हे गट सर्वात जास्त मानसिक ताण तणावाखालून गेले आहेत. माझा एक कोरोना ड्युटी करणारा डॉक्टर मित्र म्हणाला की, “२ ते ३ वर्षांनी वय वाढलं असं वाटतंय.” याबरोबरच वृध्द व्यक्ती, गंभीर शारीरिक आजार असणाऱ्या व्यक्ती, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती हे गट देखील अति तणावाखाली आहेत. वृद्ध माणसामध्ये बेचैनी, चिंता आणि झोप न येणे अशी लक्षणे भरपूर वाढली आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीलाही नैराश्य आणि भीती/बेचैनीचा त्रास होत आहे, क्वारंटाईन राहिल्यामुळे किंवा राहायला लागेल या भीतीने देखील मानसिक त्रास वाढलेले दिसत आहेत.  

या परिस्थितीत स्वतःचा मानसिक ताण कमी करण्यासाठी खालील उपायांचा वापर करता येऊ शकतो.

• आपण स्वत:च आपल्यातील अति ताणतणावाची लक्षणे ओळखणे आवश्यक आहे. लक्षणे जाणवत असल्यास कोणाशी तरी बोलणे आणि मदत घेणे गरजेचे आहे.
• आपल्या जीवनशैलीला या काळात फार महत्त्व आहे. आपला आहार, काम, व्यायाम, झोप, आणि मित्रांशी व नातेवाईकांशी संपर्क ठेवणे या गोष्टी संतुलितरित्या आणि शिस्तबद्धरितीने केल्या पाहिजेत.
• आपल्या भावनांचा निचरा करण्यासाठी/सामना करण्यासाठी धूम्रपान, मद्यपान किंवा इतर औषधे वापरू नका.
• आपणास अस्वस्थ वाटत असेल, कोरोनाविषयक शंका असेल तर सरकारी माहिती आणि आरोग्य सेवा देणाऱ्या व्यक्तींवरच विश्वास ठेवा.
• गरज पडल्यास, शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी कोठे जायचे आणि मदत कशी घ्यावी याबद्दल योजना/प्लॅन तयार ठेवावा.
• आपण आणि आपल्या कुटुंबाने मीडिया कव्हरेज पाहण्यात किंवा ऐकण्यातला वेळ कमी करावा, जेणेकरून चिंता आणि अस्वस्थता कमी होईल.
• कृपया, लक्षात ठेवा आपल्यातील प्रत्येकाने भूतकाळात परिस्थितीशी जुळवून घेण्याची कौशल्ये वापरली आहेत. या कौशल्यांमुळे आपल्याला भूतकाळातील ताणतणाव हाताळण्यात मदत झाली आहे हे लक्षात ठेवा. सद्यःस्थितीत आपण अशा कौशल्यांचा वापर केला पाहिजे.
• स्वत:ची काळजी घेण्यासंबंधीचे नियोजन तयार करा. उदा. : कामकाजाचे/अ‍ॅक्टिव्हिटीचे वेळापत्रक तयार करा आणि ते अंमलात आणा.
• २ ते ३ आठवडे होऊनही ताणतणाव आणि त्याची लक्षणे कमी होत नसल्यास, झोप आणि भूक खूप बिघडली असल्यास, काही शारीरिक त्रास (डोकेदुखी) होत असल्यास, आत्महत्येचे विचार येत असल्यास आणि गंभीर मानसिक आजाराची लक्षणे (अति संशय, भास) दिसत असल्यास जवळ उपलब्ध असलेल्या मानसोपचारतज्ज्ञाकडे किंवा जनरल डॉक्टरकडे जावे.

अशावेळी सरकारी यंत्रणा महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. मानसिक स्वास्थ्याविषयी जनजागृती करणे, कोव्हिड झालेल्या व्यक्तीस समुपदेशन करणे, मानसिक समस्यासाठी हेल्पलाइन चालू करणे, गावपातळीवर आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देणे, आणि या सर्वांसाठी आर्थिक तरतूद करणे. परंतु अजूनही सरकारी अधिकारी आणि राजकारणी यामध्ये मानसिक स्वास्थ्य याविषयी आस्था आणि बदल करण्याची इच्छा दिसत नाही ही खंत आहे. कोव्हिड-१९ मुळे का होईना पण काही राज्यांनी (केरळ, तमिळनाडू) याविषयी काम करण्यास सुरुवात केली आहे. येणाऱ्या काळात असे काम सर्वच राज्यात व्हावे आणि होत राहावे हीच अपेक्षा.

डॉ. कौस्तुभ जोग मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते वैयक्तिक तसेच ‘सेंटर फॉर मेंटल हेल्थ लॉ अॅन्ड पॉलिसी/इंडियन लॉ सोसायटी, पुणे’ या संस्थेमार्फतही सार्वजनिक मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत.

Dr. Kaustubh Joag

MD (Psychiatry)

Senior Research Fellow, Centre for Mental Health Law & Policy Indian Law Society (ILS), Pune, 411004, India

+91 98817 69500

Twitter: @kaustubhjoag367

www.cmhlp.org

लेखकांच्या मताशी ‘वेध आरोग्याचा’चे संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.