मेळघाट, जिल्हा – अमरावती. कुपोषण व बाल-मातामृत्यूंसाठी कुप्रसिद्ध भाग. ‘महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल (महान)’च्या माध्यमातून डॉ. अशिष सातव यांची टीम या दुर्गम आदिवासी भागात कार्यरत आहे. सध्या आरोग्य सेवांची वानवा असलेल्या या भागात कोव्हिड चाचणीची सुविधा उपलब्ध व्हायलाही अक्षम्य दिरंगाई झाली त्यामुळे उद्भवलेल्या एका दुर्दैवी मृत्यूची ही हकिगत. अशा घटनांना ‘महान’ने पटलावर आणलं. परिणामी आता मेळघाटमध्ये करोना चाचणी होत आहे…
लॉकडाऊन सुरू झालं तेव्हाची ही घटना. अनिल हा मेळघाटातील एक मजूर. या भागातील अनेकांसारखाचं अनिल मोलमजुरीसाठी विस्थापन करत असे. पण काही कारणाने तो लॉकडाऊनपूर्वीच गावी परतला. परिणामी लॉकडाऊनमध्ये तो परगावी अडकला नाही किंवा गावी यायला त्याला पायपीटही करावी लागली नाही या अर्थाने तो सुदैवी. पण तो मेळघाटात होता म्हणूनच केवळ दुर्दैवी ठरला.
अनिल अचानक आजारी पडला. त्याला ताप, सर्दी व छातीत दुखी असा त्रास जाणवू लागला. अनिलच्या भावाने त्याला धारणीमधील खासगी डॉक्टरांकडे नेलं. या डॉक्टरांनी अनिलला वेदनाशामक औषधं दिली नि सलाईन चढवलं. आराम वाटल्याने अनिल घरी आला.
पण दुसर्याच दिवशी अनिलला रक्तस्राव, थंडी नि ताप जाणवू लागला. श्वास घेणंही कठीण झालं. त्याच दिवशी जनता कर्फ्यू जाहीर झालेला. बातम्यांमध्ये सातत्याने करोनाबद्दल बोललं जात होतं. त्यामुळे अनिलच्या भावाला ही करोनाचीच लक्षणं वाटली. त्याने अनिलला धारणीतील उपजिल्हा रुग्णालयात नेलं. येथील डॉक्टरांनाही करोनाचीच शंका आली. कारण अनिलला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याची ऑक्सिजन लेव्हलही (SPO2) पन्नास टक्क्यांवर आलेली. त्यामुळे अनिलला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवणं डॉक्टरांना आवश्यक वाटलं. पण अमरावतीच्या शासकीय दवाखान्यात पेशंटला पाठवायचं तर हे अंतर धारणीपासून किमान चार तासांचं. अनिलची अवस्था तर नाजूक होती. त्यामुळे अनिलला आमच्या ‘महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल’मध्ये आणलं गेलं.
अनिल करोनाचा संशयित रुग्ण होता. असा पेशंट आणला जाणार असल्याची सूचना मिळाल्याने आम्ही पूर्वतयारी केली. हा अगदीच सुरुवातीचा काळ असल्याने कोव्हिड रुग्णांसाठीच्या मूलभूत सुविधांचे निकषही ग्रामीण भागातील रुग्णालयांपर्यंत पोहोचले नव्हते. पण आमच्याकडे व्हेंटिलेटरची सुविधा आहे. त्यामुळे आम्ही किमान तयारीत होतो.
पेशंटला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, प्राथमिक केस हिस्टरीवरून आम्हालाही करोनाचीच शंका आली. सुदैवाने आमच्याकडे पीपीई कीट होते. डॉक्टर्स व स्टाफची सुरक्षितता महत्त्वाची होती. आम्ही पीपीई कीट अंगावर चढवला. पेशंटला लागलीच ऑक्सिजन सपोर्ट दिला. त्यामुळे त्याच्यात सकारात्मक बदल दिसू लागले. अनिलची ऑक्सिजन लेव्हल वाढली पण त्याला श्वास घ्यायला फारच त्रास होत होता. पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंतच्या अवस्थेचा आम्ही आढावा घेतला. त्याची लक्षणे व श्वास घेण्यातील आत्यंतिक अडचणी पाहता आम्ही प्राथमिक इलाज तर केलेले पण अशा रुग्णांना तातडीने अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचे शासकीय आदेश होते. आमच्यासमोर पर्यायच नव्हता.
आम्ही अनिलला व्हेंटिलेटर लावलेला. त्यामुळे त्याची ऑक्सिजन लेव्हल चांगलीच सुधारली. ती आता 92% झालेली. डॉ. अशिष सातवही सातत्याने पेशंटकडे लक्ष ठेवून होते. अनिल अधिक स्थिर झाला. मग आम्ही त्याचा ईसीजी घेतला. या चाचणीतून त्याला हृदयाशी निगडित आजार जाणवला. अनिलला आतापर्यंत सलाईनही भरपूर दिलं गेलं होतं त्यामुळेही त्याच्या फुफ्फुसात सूज असावी असाही आमचा अंदाज होता. आम्ही केलेल्या चाचण्या व काढलेल्या निष्कर्षांना येथे विस्ताराने लिहित नाही.
अनिलची ऑक्सिजन लेव्हल सुधारत होती नि आवश्यक चाचण्यांवरून आमच्याकडेच त्याच्यावर उपचार शक्य होते इतपत नोंदवणे सर्वसामान्य वाचकांसाठी पुरेसं आहे. पण लक्षणांवरून त्याची करोना चाचणी आवश्यक होती. ती सुविधा मेळघाटमध्ये कुठेही नव्हती. त्यासाठी पेशंटला अमरावतीलाच न्यावं लागणार होतं. आम्ही 108 नंबरला फोन करून रुग्णवाहिका मागवली. या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर होता. त्यामुळे अनिल अमरावतीला पोहोचेपर्यंत स्थिर राहील याची शाश्वती वाटली. पण रुग्णवाहिकेसोबत आलेल्या डॉक्टरांना पेशंटला व्हेंटिलेटर सपोर्ट कसा द्यायचा याची माहिती नव्हती. आम्ही त्या नवशिक्या डॉक्टरांना आवश्यक ती माहिती दिली. आता पेशंट सुरक्षित होता. आम्ही निर्धास्त झालो.
पेशंटची रवानगी जिल्हा रुग्णालयात झाली नि आमच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. आम्ही भानावर आलो. मेळघाटमध्ये ‘रेस्परेटरी डिस्ट्रेस केसेस’ हाताळण्याची अगदीच तुटपुंजी सुविधा आहे! या विचाराने आम्ही अस्वस्थ झालो. अशी अस्वस्थता मेळघाटमध्ये आम्हाला नेहमीच घेरते. यावेळी तिला करोनाची पार्श्वभूमी होती.
अनिल अमरावती जिल्हा रुग्णालयापर्यंत व्यवस्थित पोहोचला. त्याला तिथे विलगीकरण कक्षात ठेवलं गेलं. आमच्या जिवात जीव आला. पण दुसर्याच दिवशी अनिल गेल्याची वाईट बातमी आली. त्याची करोना चाचणी निगेटिव्ह आलेली. अनिलची करोना चाचणी मेळघाटमध्येच झाली असती तर तो नक्की वाचला असता. त्याला आयसीयू केअरमध्ये ठेवून सहज वाचवता आलं असतं. पण कोव्हिड चाचणीची सुविधाचं नव्हती त्यामुळे त्याच्यावर उपचार करता आले नाहीत. ही बाब आमच्यासाठी शरमेची व खेदाची होती. त्याचं कुटुंब, गाव-समाज नि देशानं एका जिवाला नाहक गमावलं. आम्ही हतबल होतो.
अनेक प्रश्न फेर धरून नाचू लागले. मेळघाटातील अनेक मजूर मोठमोठ्या शहरांमध्ये पोटासाठी जातात. करोनामुळे हे गरीब लोक अनेक यातायात करून गावी परतलेत. यांना केवळ करोना चाचणीची सुविधा नाही म्हणून पुन्हा शहराठिकाणी पाठवणं योग्य आहे का? मेळघाटमध्ये वाहतुकीच्या सुविधा नाहीत, डोंगरदर्यातून हॉस्पिटलपर्यंत पोहचतानाच अनेक गंभीर रुग्णांचा मृत्यू होतो. आम्हाला हेही अजून माहीत नव्हतं की लॉकडाऊनमुळे अशा किती रुग्णांची गैरसोय झालेली? कित्येकांनी रुग्णालयांच्या वाटेवर प्राण सोडले? मेळघाटमध्ये करोना चाचणी कधी सुरू होणार? या प्रश्नांनी आम्ही बैचेन झालो.
मेळघाटात प्रतिकूल परिस्थिती आहे पण तरीही येथे रुग्णसेवेला आम्ही डॉक्टर मंडळी तयार आहोत. पण इथे मनुष्यबळाचा प्रश्न फारच तीव्र आहे. मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण आमच्याकडे येऊ लागले तर त्यांना अमरावतीला पाठवण्यासाठी पुरेशी वाहन सुविधाही नाही. अपुर्या संसाधनांमुळे आम्ही डॉक्टरही रुग्णांना सेवा देताना धास्तावलो आहोत! डॉक्टरही ‘हाय रिस्क’वर आहेत!! मग गरीब रुग्णांना जिल्ह्याच्या दवाखान्यातच पाठवायचं का? अमरावतीला पाठवलेल्या कुपोषित बाळाचं प्रेत पुन्हा गावी आणण्याइतकेही पैसे या भागातील लोकांकडे नसतात. प्रेताला गावी आणण्यासाठी शववाहिनीचं भाडं परवडत नाही, केवळ म्हणून या भागातील लोक जिल्ह्याच्या रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. ‘खिशात केवळ दहा रुपये आहेत, आपल्या प्रियजनाचं पार्थिव गावी कसं न्यावं?’ अशा जीवघेण्या विवंचनेतील लोक आम्ही पाहिलेत.
या पार्श्वभूमीवर ‘करोना चाचणी मेळघाटमध्ये व्हायलाच हवी’ या विचाराने आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. ‘महान’च्या टीमने सातत्याने तीन महिने पाठपुरावा केला. परिणामी आता मेळघाटमध्ये करोना चाचणी सुरू झाली आहे. आशा आहे आता अनिल सारख्या दुर्दैवी जीवांना आपले प्राण गमवावे लागणार नाहीत.
डॉ. विपिन खडसे हे अमरावती जिल्ह्यातील ‘महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल (महान)’ येथे डॉक्टर म्हणून काम करतात.
लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.