• मोफत/सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी.. साथी हेल्पलाईन 94 22 32 85 78

कोविडच्या रिंगणात आरोग्य कर्मचारी

कोविड-19च्या काळात सर्व स्तरातील आरोग्य कर्मचारी जोखीम स्वीकारून अविरतपणे सेवा देत आहेत. सुरक्षेची साधने पुरेशी मिळत नसतानादेखील बारा-बारा तास काम करतायेत…

कोविड-19च्या काळात सर्व स्तरातील आरोग्य कर्मचारी जोखीम स्वीकारून अविरतपणे सेवा देत आहेत. सुरक्षेची साधने पुरेशी मिळत नसतानादेखील बारा-बारा तास काम करतायेत. एका बाजूला आरोग्य कर्मचाऱ्यांचे खरे हिरो/हिरोइन्स म्हणून कौतुक केले जातेय. पण त्यांची सध्याची कामाची स्थिती चिंताजनक व तणावपूर्ण आहे. त्यातच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेल्या कंत्राटीकरणामुळे परिस्थिती आणखीन बिकट होत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी अनेक मुद्द्यांना घेऊन आंदोलने केली जात आहेत. केवळ टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याने त्यांची कामाची स्थिती सुधारणार नाही तर त्यासाठी ठोसपणे आणि तातडीने काही धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांमधील असंतोष

कोविड-19 च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी गेले चार महिने आरोग्य सेवेतील कर्मचारी जोखीम उचलून अहोरात्र काम करत आहेत. आरोग्य कर्मचारी हा आरोग्य व्यवस्थेचा पाया आहे आणि त्यांनी दिलेल्या सेवेवर आरोग्य व्यवस्था अवलंबून आहे. परंतु गेली अनेक वर्षे अपुऱ्या मनुष्यबळावर व संसाधनावर चालत आलेल्या आरोग्य व्यवस्थेचे आजारपण आज कोविडच्या संकटाचा सामना करताना प्रकर्षाने जाणवत आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची स्थिती, अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांच्यावर पडणारा कामाचा बोजा, अपुऱ्या सोयी-सुविधा, संरक्षणात्मक साधनांची कमतरता आणि याबाबत प्रशासनाची औदासीन्यता यामुळे प्रभावीरित्या रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येतात. याचे पडसाद हे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनांमधून दिसून येत आहे. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमधील एम्स रुग्णालयातील ‘नर्सेस युनियन’ने जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या कामाच्या चिंताजनक परिस्थितीमुळे नऊ दिवस आंदोलन केले1. दिल्लीतील जवळपास तिनशेहून अधिक डॉक्टरांनी गेले तीन महिन्यांचा थकबाकी पगार न मिळाल्यामुळे राजीनामा देण्याची धमकी दिली2. याबरोबरच हैद्राबादमध्ये डॉक्टरांवर कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व मनुष्यबळ अभावामुळे कामावर येणारा तणाव या विरोधात आंदोलन केले.

आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोविडची लागण

कोविड रुग्णांची जशी दिवसेंदिवस वाढ होत आहे तशी त्यांच्या सेवेस उपलब्ध असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही कोविडची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. ‘एम्स’ रुग्णालयातील एकूण 329 कर्मचारी हे कोरोना बाधित झाले असून त्यापैकी 47 नर्सेसना कोविड-19 ची बाधा झाली. ‘न्यूज 18 डॉट कॉम’ने मिळविलेल्या माहितीनुसार दिल्लीतील केंद्र व राज्य सरकार अंतर्गत येणाऱ्या नऊ प्रमुख कोविडयुक्त रुग्णालयांमध्ये 1207 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना (नर्स व डॉक्टर) कोविड-19 ची बाधा झाली आहे, इतर कर्मचारी पकडता ही संख्या 2000 इतकी आहे. हा आकडा याहून जास्त असण्याची शक्यता आहे कारण याबाबतची माहिती अनेकदा मागणी करूनही सरकारकडून पुरवण्यात आलेली नाही4. तसेच मुंबईतील ‘वोकार्ड’ रुग्णालयातील एकूण 80 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाली ज्यामध्ये नर्सेसची संख्या जास्त आहे. हे रुग्णालय कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले5.

या वाढणाऱ्या आकड्यांवरून असे लक्षात येते की कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी घेण्यात व संरक्षणात्मक सोयी-सुविधा पुरविण्याबाबत कमतरता आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह ईक्विपमेंटस (पीपीई) ज्यामध्ये सॅनिटायझर्स, मास्क, हातमोजे, गाऊन आणि पोशाख ह्या सगळ्या घटकांची कमतरता आहे. सावित्री, श्रीनिधी आणि सुभश्री या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील संशोधकांनी मिळून नुकताच एक अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला6, त्यातून समोर आलेले काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे,

 • अनेक आरोग्य संस्थांमध्ये (सरकारी व खाजगी) पीपीईच्या सर्व घटकांची कमतरता सातत्याने दिसून आली तर काही ठिकाणी त्याचा पूर्णपणे अभाव आहे.
 • एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना (37.5) पीपीईचा पुनर्वापर करावा लागला, इतकेच नव्हे तर अनेकदा हा पुनर्वापर निर्जंतुकीकरणाची पुरेशी प्रक्रिया न करता केला.
 • 88 कर्मचाऱ्यांना पीपीईच्या योग्य वापराबाबतची पूर्ण माहिती नाही आणि निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना पीपीईच्या वापराबाबत कोणतेही अधिकृत प्रशिक्षण मिळालेले नाही.
 • काही (14) कर्मचाऱ्यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पीपीईची साधने विकत घ्यावी लागली.
 • जवळपास अर्ध्या (45) कर्मचाऱ्यांना पीपीई घातल्यानंतर येणाऱ्या अडचणी यात गरमीचा त्रास, घाम येणे, दमन होणे, कोरड पडणे यामुळे रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

तसेच आरोग्य व्यवस्थेच्या उतरंडीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना ही संरक्षणात्मक साधने तुटपुंज्या प्रमाणावर उपलब्ध आहेत7.

कोविड-19 ची ड्युटी सलग सहा तास करणे जी की बऱ्याचदा सात ते आठ तासांवर जाते. पीपीई कीटचा शरीरावर विपरित परिणाम होतो. विशेषतः महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना याचा जास्त त्रास होतो. पीपीई कीट घालणे आणि काढणे ही एक मोठी प्रक्रिया आहे, ते सहजपणे काढता येत नाही आणि या प्रक्रियेत कोविडची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान पीपीई कीट घातल्यानंतर सॅनिटरी पॅड बदलता येत नाही किंवा वॉशरूमलाही जाता येत नाही. या सहा-सात तासांमध्ये जेवण आणि पाणीही पिता येत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिदृष्ट्या थकवा येऊन कार्यक्षमता कमी होते. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊन जलद संसर्ग होण्याची शक्यता वाढते8.

महाराष्ट्र : आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण

कोविड-19 चा सामना करत असताना अधोरेखित झालेला आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले कंत्राटीकरण. महाराष्ट्रात या कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या 28,000 च्या घरात आहे, ज्यामध्ये जवळजवळ 12,000 परिचारिका आणि 4000 वैद्यकीय अधिकारी आहेत9 ज्यांचा आरोग्य सेवा देण्यात महत्त्वाचा वाटा आहे. अनेक वर्षांपासूनच्या या कंत्राटीकरण पद्धतीमुळे आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये एक उतरंड व विषमता तयार झाली आहे. ज्यामध्ये एका बाजूला नियमित कर्मचारी आहे ज्याला नियमित वेतनासहित शासनाच्या इतर सर्व सोयी-सुविधा मिळतात तर दुसऱ्या बाजूला कंत्राटी कर्मचारी आहे ज्याला त्याच कामासाठी तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते शिवाय इतर सर्व सोयी-सुविधा मिळत नाहीत आणि सतत नोकरी गमावण्याच्या असुरक्षितेत जगावे लागते. कोविड-19 चा सामना करताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करावे लागत आहे, किंबहुना नोकरी जाण्याची भीती दाखवून जास्त काम करून घेतले जात आहे.

कामातील तणाव, कामावरून काढून टाकण्याची धमकी, कामाचे जास्तीचे तास, रजा न मिळणे, अपमानास्पद वागणूक, वेतनातील असमानता, पुरेशा सुविधा व संरक्षणाचा अभाव याबरोबरच शासनाची अनेक वर्षांपासून याबाबत असणारी औदासीन्यता अशा अनेक कारणांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमधील असंतोष वाढत जाऊन त्याचे रूपांतर आंदोलनात होत आहे.

धोरणात्मक बदलांच्या दिशेने

सध्याच्या बिकट परिस्थितीत आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे संरक्षण व त्यांना योग्य सोयी-सुविधा वेळेवर, मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना व आरोग्य संस्थांना पुरेशी पीपीईची साधने सातत्याने मिळतायेत की नाही याची खात्री करणे व त्याच्या वापराबाबतचे अधिकृत प्रशिक्षण मिळणेही आवश्यक आहे. तसेच या पीपीई कीटची गुणवत्ता तपासून पाहणे गरजेचे आहे कारण पीपीईच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह आहेत10. कोविडची ड्युटी करताना कामाचे तास कमी करणे तसेच विलगीकरण काळात कर्मचाऱ्यांना योग्य सोयी-सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड-19 मुळे कर्मचाऱ्यांवर अतिशय ताण व थकवा आला आहे. महाराष्ट्रात आज जवळपास आरोग्य व्यवस्थेमध्ये 17,000 पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवेतील मनुष्यबळाची ही कमतरता त्वरित भरून काढली पाहिजे. केरळमध्ये मनुष्यबळाची तूट भरून काढण्यासाठी तेथील सरकारने तातडीने 276 डॉक्टरांची भरती अगदी काही दिवसात केली11. याच पद्धतीने महाराष्ट्रातही त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे. आरोग्य सेवेतील अनेक कर्मचारी जे कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत त्यांना नियमित करणे व ‘समान काम समान वेतन’ या धर्तीवर त्यांना रुजू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच वेतन कपात न करता सर्वांना वेळेवर योग्य वेतन मिळाले पाहिजे. कर्मचाऱ्यांवर (डॉक्टर व नर्सेस) होणारे हल्ले टाळण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

हे धोरणात्मक बदल तातडीने अंमलात आणले पाहिजेत. अन्यथा कोरोना काळात हे कर्मचारी काही दिवस जरी आंदोलनावर गेले तर त्याची मोठी किंमत जनसामान्यांना मोजावी लागेल.

लेखिका सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील संशोधन कार्यकर्ती असून ‘साथी’ संस्थेत संशोधनाचे काम करतात.

References-

 • https://www.deccanherald.com/national/north-and-central/aiims-nurses-union-protests-over-working-conditions-329-workers-contracted-covid-19-so-far-845367.html
 • https://theprint.in/judiciary/doctors-at-delhi-hospitals-threaten-to-resign-over-no-salaries-hc-orders-ndmc-to-pay-up/440581
 • https://indianexpress.com/article/cities/hyderabad/doctors-protest-after-assault-by-relatives-of-dead-covid-19-patient-at-nodal-hyderabad-hospital-6451682
 • https://www.news18.com/news/india/since-march-over-1200-doctors-and-nurses-have-tested-positive-for-covid-19-in-delhis-major-hospitals-2678071.html
 • https://www.thehindu.com/news/cities/mumbai/26-more-test-positive-at-wockhardt-hospital/article31379132.ece
 • Savithri Devi, ShrinidhiDatar, Subha Sri B (2020 June 22) Availability of PPE during the COVID-19 pandemicReport of an online survey among health care workers in India
 • अनंत फडके (2020) कोरोना आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था. कोविड-१९-कोरोना विशेषांक, पुरोगामी जनगर्जना अंक ५.
 • https://www.deccanherald.com/national/north-and-central/aiims-nurses-union-protests-over-working-conditions-329-workers-contracted-covid-19-so-far-845367.html
 • https://www.lokmat.com/ahmadnagar/contractual-personnel-carry-health-responsibility
 • https://punemirror.indiatimes.com/pune/civic/docs-question-ppe-kits-quality-decry-abe4rrant-pricing/articleshow/75562928.cms
 • https://newsable.asianetnews.com/india/coronavirus-kerala-increases-medical-staff-276-more-doctors-recruited-to-fight-covid-19-q7oun8

भाष्य- डॉ. अर्चना दिवटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *