• मोफत/सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी.. साथी हेल्पलाईन 94 22 32 85 78

टाळेबंदीत एचआयव्हीबाधित रुग्णांना गोपनीयता पाळून घरपोच पुरवलीत औषधी आणि आहार…

टाळेबंदीत कुठेही जायचे तर कोरोना दक्षता समितीची परवानगी हवी. परंतु त्यासाठी एचआयव्हीबाधित रुग्णांनी जर या आजाराचं नाव समितीस सांगितलं तर गोपनीयता संपुष्टात येऊन गावकरी कसे वागवत याचा रुग्णावर मानसिक दबाव. हे लक्षात येऊन भुदरगडमधील कार्यकर्त्यांनी हा पेच कशाप्रकारे सोडविला हे वेध आरोग्याचामध्ये सांगताहेत रवी देसाई- टाळेबंदीत एचआयव्हीबाधित रुग्णांना गोपनीयता पाळून घरपोच पुरवलीत औषधी आणि आहार…

सन 2020 मधील मार्च महिना जणू काही कोरोनासोबतच भीती, संभ्रम आणि माणसाला माणसापासून दूर करण्यासाठीच उजाडला. या विषाणूबाबत संपूर्ण जगभर सगळे गैरसमज पसरत होते. इतर देशांप्रमाणे भारतातही कर्फ्यू आणि लॉकडाऊन नावाने जनतेस बंदिस्त करण्याचा निर्णय घ्यायला सुरुवात केली. शहरांबरोबर गावातील आणि वस्त्यांवरील जनतासुद्धा घराच्या आत बंदिस्त राहावी म्हणून अनेक बंदी आदेा लागू झालेत. या आदेशाचं पालन जनतेनं करावं असं आवाहन करताना स्थानिक प्रशासनावर ही बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दिली. मग काय रस्त्यावर पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य संस्थेत डॉक्टर यांच्यावर देखरेखीसाठी महसूल खात सज्ज झालं. मग यातून लॉकडाऊन यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू झाला पण जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू लागले. त्यामुळे लोक वेगवेगळ्या कारणांनी रस्त्यावर येताहेत हे सरकारच्या लक्षात आल्यावर गावपातळीवर ‘कोरोना दक्षता समित्या’ स्थापन करण्याचे स्वतंत्र आदेश निघाले व त्या समित्यांना जबाबदाऱ्या व अधिकार निश्चित करून दिलेत. त्यात गावातील जनतेला जर आवयक सेवेसाठी घराबाहेर किंवा गावाबाहेर जावं लागत असेल तर या गावातील दक्षता समितीची परवानगी घ्यावी असं सांगितलं. त्यानुसार लोक या समित्यांच्या समोर जाऊन आपलं घराबाहेर, गावाबाहेर जाण्याचं कारण सांगून त्यांचं पत्र मिळवून घेत होते.

या दरम्यानच्या काळात अनेक सामाजिक काम करणारे लोकं, संस्था-संघटना विविध स्वरूपात लोकांना मदत पोहचवत होते. त्याप्रमाणे आम्ही ‘संवाद’ संस्थेच्या माध्यमातून, मोलमजुरीसाठी आलेल्या पण टाळेबंदीमुळे अडकून राहिलेल्या कुटुंबांना, लोकांना अन्नधान्य व जीवनावयक वस्तू पुरवत होतो. लोकांमध्ये कोरोना व कोविड – 19 बाबत जागृती व्हावी, गैरसमज दूर व्हावेत म्हणून सरकारी आरोग्य संस्थेत माहिती व मदत केंद्र उभारून लोकांना माहिती देत होतो, त्यांच्या अडचणी समजून घेत होतो.

त्यावेळी ग्रामीण रुग्णालयात एक व्यक्ती इतरांपासून स्वतःला लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत इतरांच्या नजरा चुकवत बावरलेली दिसली. त्या व्यक्तीला भेटून त्याची अडचण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीने आम्हास टाळण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना विश्वास दिला की, ‘तुमची अडचण सांगा, आम्ही ती दूर करण्याचा प्रयत्न करू व सर्व माहिती गुप्त ठेवू’. त्याचवेळी या रुग्णालयातील समुपदेशकांनी आमच्याकडे पाहिले व जवळ येऊन त्यांनी आम्हाला सांगितले की, ‘ही व्यक्ती अँटी रेट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) अर्थात एड्सवरील उपचार घेणारी आहे. आणि त्यांना उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जावे लागणार आहे.’ यातून झालेल्या चर्चेतून लक्षात आले की यासाठी या कोरोना दक्षता समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे व ती घेण्यासाठी आजाराचं नाव व कोठे उपचार घेणार हे सांगावं लागतं आणि जर या आजाराच नाव समितीस सांगितलं तर गोपनीयता संपुष्टात येऊन गावकरी रुग्णाला कशी वागणूक देतील आणि त्यामुळे पुन्हा रुग्ण मानसिक दबावाखाली जाऊन आजारी होऊ शकतो हे आमच्या लक्षात आले.

ए आर टी केंद्रामधून समजले की तालुक्यात तब्बल 100 ते 120 रुग्ण अशा प्रकारचे आहेत, त्या सर्वांची ही अडचण आहे. आम्ही हेही समजून घेतले की या व्यक्तींना जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन संबंधित तज्ज्ञाकडून उपचार घ्यावे लागतात. यावेळी आम्ही ही गोष्ट जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य विभाग कार्यालयाच्या निर्दशनास आणून दिली व समुपदेशक यांना ही बाब त्यांच्या वरिष्ठ स्तरावर निर्दशनास आणून देण्याची विनंती केली. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य विभाग यांच्यासोबतच्या पाठपुराव्यातून काय करू शकतो याबाबत चर्चा करण्यात आली आणि संबधित अधिकाऱ्यांनी लगेचच निर्णय घेतला. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णांची माहिती घेऊन तालुक्यातील जवळपास 40 रुग्णांना येथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून उपचाराचे संच (कीट) दिले व त्यांच्या सहकार्याने त्या लोकांच्या घरात किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचार उपलब्ध झाले.

याचवेळी असे उपचार घेणाऱ्या रुग्णांना पोषण आहार मिळणे आवश्यक आहे ही गोष्ट देखील समोर आली. त्यावेळी सरकारने मोफत रेशन दिले आहे, सामाजिक संस्था सुद्धा गरजू लोकांना अन्न धान्य पुरवत आहेत हे ही समजले. पण याच्यापेक्षा वेगळा आहार यांना गरजेचा आहे आणि तो आहार यातील काही व्यक्तींना मिळणे कठीण आहे हे लक्षात आल्यावर असा आहार आपण पुरवला पाहिजे असा विचार आला. आणि लगेच समुपदेशक, तंत्रज्ञ व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी होकार दिला व स्वतःच्या खिशातून पाचशे-हजार रुपये जमवून अशा रुग्णांना अतिरिक्त पोषण आहार पुरविला ही बाब खूपच महत्त्वाची होती. यातून ज्या एचआयव्हीबाधित लोकांना हा विशेष आहार व साहित्य मिळाले त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान खूप मोठे होते. 

रवी देसाई हे ‘संवाद’ संस्था, गारगोटी, भुदरगड, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत, ‘सार्वजनिक आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रिया’ राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे व ‘जन आरोग्य अभियान’, महाराष्ट्राचे कार्यकर्ते आहेत. लेखन समन्वय – भाऊसाहेब आहेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *