• मोफत/सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी.. साथी हेल्पलाईन 94 22 32 85 78

कोव्हिड टेस्ट आणि विलगीकरण समज – गैरसमज

‘करोना’ची म्हणजेच ‘कोव्हिड’ची लागण झाली आहे का हे पाहण्यासाठी आता काही वस्त्यांमध्ये आरोग्य खात्याचे कर्मचारी येऊन कोव्हिड-टेस्ट करत आहेत. रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांना त्यांच्या घरीच वेगळ्या खोलीत अलग राहायला ते सांगतात. हे शक्य नसलेल्यांना सरकारच्या ‘कोव्हिड केअर सेंटर’ मध्ये १४ दिवस दाखल करतात. असे दाखल करायला काही ठिकाणी गैरसमजापोटी विरोध होतो आहे. काही ठिकाणी या विरोधी अफवाही पसरल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या चाचण्या करणं आणि ‘कोव्हिड केअर सेंटर’ मध्ये काही जणांना दाखल करणं याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे ते थोडक्यात समजावून घेऊयात.

कोव्हिडची लागण झालेल्यांचे लवकरात लवकर निदान होण्याची फार गरज असते. एक तर कोव्हिडची लागण झालेल्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून त्यांच्यापैकी कोणामध्ये काही गंभीर गुंतागुंत झाली तर ती वेळेवर ओळखून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येते. दुसरे म्हणजे कोव्हिडची लागण झालेल्यांना इतरांपासून वेगळे ठेवले म्हणजे विलगीकरण केले तर इतरांचा लागणीपासून बचाव होतो. जेव्हा कोव्हिडची लागण झालेल्याला वेगळ्या खोलीत ठेवण्याइतके घर मोठे नसते तेव्हा त्याला दहा ते चौदा दिवस सरकारी कोव्हिड-केंद्रात ठेवण्याची गरज असते. थोडक्यात ही चाचणी करणे आणि गरज असल्यास लागण झालेल्याला सरकारी कोव्हिड-केंद्रात भरती करणे हे नागरिकांच्या हिताचे आहे.

टेस्ट करतात म्हणजे काय करतात?

तर कापूस गुंडाळलेल्या निर्जंतुक काडीने नाक आणि घशातील स्रावाचा नमुना (स्वाब) घेतात आणि त्यावर टेस्ट करून रिपोर्ट देतात. कुटुंबाच्या आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण करायला हवे. या टेस्टविषयी असा गैरसमज पसरला आहे की कोव्हिडची लागण न झालेल्या माणसाला तो कोव्हिड-पॉझिटिव्ह आहे असे खोटे सांगून त्याला विनाकारण कोव्हिड-सेंटरमध्ये दाखल करतात. यामागे कोव्हिड-सेंटरचे कॉन्ट्रॅक्टर, भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे कारस्थान आहे असा आरोप केला जातो. खरी परिस्थिती अशी आहे की कोव्हिड बाबतचे खोटे रिपोर्ट दिले जात नाहीत. मात्र आरोग्य-खात्याने केवळ तोंडी नव्हे तर लेखी रिपोर्ट द्यायला हवा. नाहीतर ‘खोटे रिपोर्ट’चे आरोप होतच राहतील.

या टेस्ट बाबत दुसरी तक्रार म्हणजे पहिल्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर दुसरी ‘पीसीआर’ नावाची टेस्ट करायला सांगतात आणि ती मात्र अनेकदा पॉझिटिव्ह येते. त्यामुळे या टेस्ट करण्याबाबत काहीतरी गडबड आहे असे अनेकांना वाटते. हा गैरसमज का आहे हे थोडक्यात समजावून घेऊयात.

वस्त्यांमध्ये जाऊन आरोग्य-कर्मचारी करत असलेल्या टेस्टला ‘रॅपिड अँटीजेन-टेस्ट’ म्हणजे ‘जलद-टेस्ट’ असे म्हणतात. तिचा फायदा असा की तिचा रिपोर्ट लगेच, अर्ध्या तासात मिळतो. पण तिची मर्यादा अशी की कोव्हिड-लागण असूनही टेस्ट झालेल्यांपैकी अर्ध्या लोकांच्या बाबतीत रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोव्हिड-लागण झाली असण्याची शक्यता खूप आहे आणि त्याचे निदान ताबडतोब करायची गरज आहे अशा वेळी ही जलद टेस्ट केली जाते. उदा. समजा एखाद्यामध्ये दम लागण्यासारखी गंभीर कोव्हिड-आजाराची लक्षणे आहेत पण पीसीआर टेस्ट केलेली नाही. या पेशंटला कोव्हिड-वॉर्डमध्ये दाखल करण्याआधी ही जलद-टेस्ट करतात. किंवा समजा एखाद्या वस्तीत करोनाच्या खूप केसेस सापडल्या आहेत. अशावेळी त्या वस्तीतल्या आणखी ज्यांना लागण झाली आहे अशांना लगेच हुडकून लगेचच इतरांपासून वेगळे करण्याची गरज असते. तेव्हा अशा वस्तीतील लोकांची रॅपिड टेस्ट करतात. तसेच ती निगेटिव्ह येऊनही डॉक्टरांना वाटले की या व्यक्तीला कोव्हिडची लागण झाली आहे तर दुसरी, अधिक खात्रीलायक पीसीआर टेस्ट करतात. पण तिचा रिपोर्ट मिळायला एक-दोन दिवस लागतात. वरील सर्व बाबी लक्षात घेता जलद टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला पण दुसऱ्या पीसीआर टेस्टचा पॉझिटिव्ह आला तर त्याबाबत संशय घेऊ नये.

तिसरे म्हणजे ‘कोव्हिड केअर सेंटर’ मधून रुग्णाला घरी परत पाठवायच्या आधी आता पुन्हा टेस्ट करत नाहीत यामुळेही काही जण संशय घेतात. पण तज्ज्ञ सांगतात की, ‘लक्षणे दिसल्यापासून १० दिवसांनी बहुसंख्य रुग्णांकडून इतरांना लागण होण्याचे बंद होते’.

एकंदरित पाहता हे लक्षात घ्यायला हवे की ज्या वस्त्यांमध्ये कोव्हिडचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत तिथे शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये ही जलद टेस्ट जरूर केली पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त कोव्हिड-बाधित व्यक्तीचे लवकरात लवकर निदान होईल. त्यांना योग्य वेळेत सल्ला देणं, औषधे देणं हे करता येईल. तसेच त्यांना इतरांपासून लगेच अलग राहायला सांगून कोव्हिडच्या प्रसाराला आळा घालायला मदत होईल. हे लक्षात घेता सर्वांनी आपल्या भागा/वस्तीमध्ये येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करायला हवे.

डॉ. अनंत फडके हे ‘जन आरोग्य अभियान, महाराष्ट्रा’चे समन्वयक आहेत. लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *