भारतात कोव्हिड-19 आटोक्यात येत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला भारतात नऊ लाख रुग्ण कोव्हिडग्रस्त होते. आता ही संख्या सहा लाखांपेक्षा कमी झाली आहे. मृत्यूचा दर १.२ टक्क्यावरून ०.४ टक्क्यावर घसरला आहे. पण जगात मात्र कोव्हिडचं प्रमाण खूप वाढत आहे.
अमेरिकेत जुलैमध्ये आलेली दुसरी लाट ऑगस्टमध्ये ओसरू लागली होती. पण ती पूर्ण ओसरायच्या आत सप्टेंबरच्या सुरुवातीला तिसरी लाट आली. ती त्याहीपेक्षा मोठी आहे आणि अजून वाढतच आहे. दुसऱ्या लाटेत तिथं कोव्हिडच्या रोज जास्तीत जास्त ७५,००० नव्या केसेस समोर येत होत्या. सध्या रोज ९०,००० केसेस येत आहेत. भारतात हल्ली रोज ५०,००० पेक्षाही कमी नव्या केसेस आढळून येतात. अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या पावपट आहे. हे लक्षात घेतलं तर अमेरिकेत कोव्हिडचा प्रादुर्भाव भारताच्या तुलनेत किती मोठा आहे हे लक्षात येईल.
युरोपमधली स्थिती तर आणखीनच वाईट आहे. सोबत जोडलेल्या आलेखात एक लाख लोकसंख्येमागे गेल्या चौदा दिवसात किती नव्या केसेस आल्या ते दाखवलं आहे. त्यात दिसून येईल की फ्रांसमध्ये दर लाख लोकांमागे गेल्या चौदा दिवसात जवळपास ७०० नव्या केसेस आल्या. ऑक्टोबरच्या सुरुवातीला त्या फक्त २५० होत्या. यावरून तिथं किती भयानक प्रमाणात हा रोग वाढत आहे ते समजेल. त्या खालोखाल स्पेन (४९०), अर्जेन्टिना (४४०), यु.के. (४३०) हे देश आहेत. अर्जेन्टिनामध्ये तो काहीसा स्थिरावला असला तरी बाकी देशात वेगाने वाढत आहे.
भारतात हे प्रमाण कधीच १०० च्या वर गेलं नव्हतं. आता तर ते उताराला लागून ७० च्या आसपास आलं आहे. पण आपल्याला गाफील राहून चालणार नाही. फ्रांस, यु. के. आणि स्पेनमध्ये जून-जुलैमध्ये हे प्रमाण जवळजवळ शून्यावर आलं होतं पण ते किती पटकन प्रचंड वाढलं ते पहा.
भारतात टेस्ट्स कमी होतात, त्यामुळे भारतात हा रोग उताराला लागल्यासारखा असं दिसतं, असा आक्षेप काहीजण घेतात. पण ते खरं नाही. भारतातल्या टेस्ट्सची आकडेवारी पाहिली तर टेस्ट्स कमी होत आहेत असं दिसत तरी नाही. त्यामुळे भारतात कोव्हिड कमी होत आहे यात शंका घ्यायला जागा नाही. पण त्यामुळे आनंदून जाऊन सगळे निर्बंध टाकून दिले तर पश्चात्तापाची पाळी येऊ शकेल. याचं कारण कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेची भीती तज्ज्ञांना वाटते.
त्यांना ही भीती वाटते कारण ऑक्टोबर महिन्यात युरोपमधील सर्व देशात कोव्हिडचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गेल्या आठ महिन्यात युरोपमधल्या देशात कोव्हिडने हातपाय कसे पसरले यावर एक नजर टाकली तर या भीतीमागचं कारण लक्षात येईल.
ऑस्ट्रिया- ऑस्ट्रियात मार्च-एप्रिलमध्ये एक लाट येऊन गेली होती. त्यावेळी एका दिवसात जास्तीत जास्त १००० रुग्ण आढळत असत. पुढे हे प्रमाण कमी होऊन जून-जुलैमध्ये जवळपास शून्यावर आलं होतं. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ते हळूहळू वाढत गेलं आणि ऑक्टोबरमध्ये फार झपाट्याने वाढलं. सध्या त्या देशात कोव्हिडचे दररोज सुमारे ५,५०० रुग्ण सापडत आहेत.
बेल्जियम – या देशाची स्थितीसुद्धा पुष्कळ अंशी ऑस्ट्रियासारखीच आहे, मार्च-एप्रिलमध्ये एक लाट येऊन गेली होती. त्यावेळी एका दिवसात जास्तीत जास्त १५०० रुग्ण आढळत असत. तिथंही हे प्रमाण कमी होऊन जून-जुलैमध्ये जवळपास शून्यावर आलं होतं. सप्टेंबरपासून हळूहळू वाढत गेलं आणि ऑक्टोबरमध्ये फारचं झपाट्याने वाढलं. इतकं की सध्या तिथे दररोज तब्बल २०,००० ते २५,००० रुग्ण सापडत आहेत.
डेन्मार्क – एप्रिलमध्ये आलेल्या लाटेत डेन्मार्कमध्ये रोज जास्तीत जास्त तीन-चारशे कोव्हिड रुग्ण सापडत असत. जून-जुलैमध्ये ही संख्या शंभरपर्यंत घटली होती. पण सप्टेंबरपासून वेगाने वाढू लागली आणि ऑक्टोबरच्या उत्तरार्धात रोज हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत.
फ्रांस – मार्च-एप्रिलमध्ये आलेल्या पहिल्या लाटेत पीकवर असताना रोज चार-पाच हजार नवे रुग्ण आढळत होते. जून-जुलैमध्ये हे प्रमाण कमी होऊन जवळपास शून्यावर आलं होतं. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ते हळूहळू वाढत गेलं आणि ऑक्टोबरमध्ये फार झपाट्याने वाढलं. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या देशात कोव्हिडचे दररोज तब्बल ५०,००० रुग्ण सापडत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दहापट!
जर्मनी – जर्मनीची स्थितीसुद्धा पुष्कळ अंशी फ्रांससारखीच आहे, मार्च-एप्रिलमध्ये एक लाट येऊन गेली होती. त्यावेळी एका दिवसात सुमारे ५,००० ते ७,००० रुग्ण आढळत असत. हे प्रमाण कमी होऊन जून-जुलैमध्ये रोज हजारपेक्षा कमी झालं होतं. सप्टेंबरपासून ते वाढू लागलं आणि ऑक्टोबरमध्ये फारच झपाट्याने वाढून दररोज १५,००० ते २०,००० झालं. ऑक्टोबर अखेरीस ते थोडं कमी होऊन सध्या रोज सुमारे १२,००० रुग्ण सापडत आहेत.
इटली – इटलीत फेब्रुवारीपासूनच कोव्हिडचे रुग्ण सापडू लागले. ते झपाट्याने वाढून मार्च अखेरीस रोज ७,००० पेक्षा रुग्ण आढळू लागले. ते हळूहळू कमी होऊन जून-जुलै-ऑगस्टमध्ये नवे रुग्ण सापडायचं प्रमाण खूप कमी झालं. सप्टेंबरमध्ये ते पुन्हा वाढू लागलं आणि ऑक्टोबरमध्ये अतिशय वेगाने वाढलं. महिन्याभरात चक्क पंधरापट वाढून २,००० वरून आता थेट ३०,००० वर गेलंय.
स्पेन, पोर्तुगाल – या देशांची कहाणीही काही वेगळी नाही. मार्च-एप्रिलमध्ये पहिली लाट, मे-जूनमध्ये ती ओसरणं, जुलै-ऑगस्टमध्ये दुसऱ्या लाटेची सुरुवात आणि ऑक्टोबरमध्ये ती प्रचंड प्रमाणात वाढणे. ही दुसरी लाट पहिलीच्या मानाने बरीच मोठी असते. दुसऱ्या लाटेत सध्या आढळणारे रुग्ण पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट असणं हा पॅटर्न नॉर्वेमध्येही दिसतो. फक्त रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे.
युरोपियन देशात दिसणारा हा पॅटर्न भारतात तर दिसणार नाही ना या गोष्टीची चिंता तज्ज्ञांना वाटते आहे. युरोप सोडून इतर देशांमध्ये कोव्हिड संदर्भात काय स्थिती आहे त्यावरही एक नजर टाकूयात.
अमेरिका आणि भारताखालोखाल कोव्हिडचा प्रादुर्भाव ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये पहिली लाट एप्रिलमध्ये आली. जुलै-ऑगस्टमध्ये तिनं शिखर गाठलं. रोज साठ हजार रुग्ण! मग ती लाट उताराला लागून सध्या तिथं रोज पंधरा-वीस हजार रुग्ण सापडत आहेत.
त्या खालोखाल नंबर लागतो रशियाचा. तिथं पहिली लाट मेमध्ये आली. रोज दहा हजार रुग्ण तेव्हा आढळत होते. ते कमी होऊन ऑगस्टमध्ये ही संख्या पाच हजारावर आली. पण सप्टेंबरमध्ये दुसरी लाट आली. सध्या तिथं रोज सतरा-अठरा हजार रुग्ण सापडत आहेत. आणि ही संख्या कमी व्हायची लक्षणं दिसतं नाहीयेत.
युरोपमधले देश सोडले तर मग नंबर येतो अर्जेन्टिनाचा. तिथं मेपासून कोव्हिडचे रुग्ण सापडायला लागले आणि ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येने शिखर गाठलं. रोज पंधरा-वीस हजार रुग्ण. गेल्या दोन आठवड्यात मात्र तिथं हा रोग झपाट्यानं उताराला लागून सध्या रोज दहा हजारापेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत.
अर्जेन्टिनापाठोपाठ नंबर लागतो कोलंबियाचा. तिथंही सुरुवात मेमध्ये झाली आणि ऑगस्टमध्ये शिखर गाठलं. रोज बारा-तेरा हजार रुग्ण. मग काहीसा उताराला लागला पण ऑक्टोबरमध्ये पुन्हा वाढू लागला. सध्या पुन्हा रोज दहा हजार रुग्ण मिळताहेत. दुसऱ्या लाटेचं शिखर पहिल्या लाटेच्या वर जातं आहे की आता तिथं रोगाची साथ उताराला लागते ते पाहायचं. मग येतो मॅक्सीको. तिथं गेले सहा महिने रोज चार ते आठ हजार रुग्ण सापडत आहेत. फार वाढतही नाहीत आणि कमीही होत नाहीत.
साउथ आफ्रिकेमध्ये मात्र दुसरी लाट आली नाही (निदान आजपर्यंत!). जून-जुलैमध्ये आलेली पहिली लाट उताराला लागून गेले दोन महिने रुग्णसंख्या दोन हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. इराणमध्ये पहिली लाट एप्रिलमध्ये आली. त्यावेळी तीन हजाराचं शिखर गाठल्यावर रोग उताराला लागला. पण मेमध्ये पुन्हा वाढून रोज दोन-अडीच हजार रुग्ण आढळू लागले. ही पातळी सप्टेंबरपर्यंत स्थिर राहिली पण ऑक्टोबरमध्ये पुन्हा झपाट्याने वाढून सध्या रोज आठ हजार रुग्ण सापडत आहेत. इराकमध्ये गेले चार-पाच महिने रोज तीन ते पाच हजार रुग्ण सापडत आहेत. तिथंही रोग फार झपाट्याने वाढत नसला तरी उतारालाही लागलेला नाही.
भारताच्या पूर्वेकडचे देश बघितले तर इंडोनेशियात कोव्हिड एप्रिलपासून हळूहळू वाढत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्यानं चार हजाराची पातळी गाठली. गेल्या आठवड्यात मात्र तो थोडा कमी होऊ लागलाय. सध्या रुग्णसंख्या अडीच हजार. मलेशियाचा आलेख मात्र हुबेहूब युरोपियन देशांसारखा आहे. मार्च-एप्रिलमध्ये पहिली लाट. मग दोन-तीन महिने नगण्य रुग्णसंख्या. सप्टेंबरपासून अचानक उसळी घेऊन दुसरी लाट. ऑक्टोबरमध्ये बाराशेची पातळी. तोच पॅटर्न. मॅनमारची वेगळीच तऱ्हा. जूनपर्यंत तिथं कोव्हिड अजिबात नव्हतं. पण ऑगस्टपासून हळूहळू वाढत जाऊन ऑक्टोबरच्या मध्याला दोन हजारचे शिखर गाठलं. मात्र आता काहीसा उताराला लागून हा रोग हजाराच्या आसपास स्थिरावला आहे. बांगलादेशची स्थिती तुलनेनं बरी म्हणावी लागेल. जूनमध्ये चार हजारची पातळी गाठल्यावर गेले दोन महिने रोज हजार-दीड हजारवर रुग्णसंख्या स्थिरावली आहे.
पश्चिमेकडे सौदी अरेबियाची स्थितीही इतकी वाईट नाही. जूनमध्ये पाच हजाराचं शिखर गाठल्यावर रोग हळूहळू उताराला लागला आणि सध्या रोज दोन-अडीचशे रुग्ण आढळत आहेत. नेमका हाच पॅटर्न पाकिस्तानमध्येही दिसतो आहे. जूनमध्ये सहा हजाराचं शिखर, मग पुढील दोन महिन्यात उताराला लागून सध्या हजाराच्या आतबाहेर रुग्णसंख्या.
थोडक्यात, या रोगाच्या प्रादुर्भावाबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही. कुठे खूप जास्त कुठे कमी. पण कमी झाला तरी पूर्णपणे कुठं नाहीसा झालेला नाही. अमेरिकेत तिसरी लाट आली आहे आणि ती पहिलीच्या तिप्पट आणि दुसरीच्या दीडपट मोठी आहे. युरोपमध्ये, रशियात आणि मलेशियात पहिली लाट ओसरल्यावर दोन तीन महिन्यांनी दुसरी आली आहे. आणि ती पहिल्यापेक्षा खूपच जास्त तीव्र आहे. ब्राझील, अर्जेन्टिना आणि साउथ आफ्रिकेत मात्र एक लाट उताराला लागली. दुसरी आली नाही. बांगलादेश, सौदी अरेबिया, पाकिस्तानमध्येही जवळपास हाच पॅटर्न दिसतोय.
भारत कुठला पॅटर्न फॉलो करेल? आशा करूया की आपण युरोप-अमेरिकेच्या रस्त्यानं जाणार नाही. दुसरी लाट येणार नाही.
दुसरी लाट टाळता येऊ शकेल. पुरेशी काळजी घेतली तर ते अशक्य नाही. मात्र खूप सावधगिरी मात्र बाळगावी लागेल. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सतत हात धूत राहणे इत्यादी नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. अजून काही दिवस तरी अत्यावश्यक असल्याशिवाय बाहेर न पडणे, गर्दी न करणे हे पथ्य कटाक्षाने पाळावं लागेल.
जमेल हे आपल्याला? जमावावेच लागेल.
सुबोध जावडेकर हे सुप्रसिद्ध लेखक असून त्यांच्या विज्ञानकथा व विज्ञानविषयक लेखन लोकप्रिय आहे.
लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.