जर एखादी व्यक्ती कोव्हिड – 19ने आजारी असलेल्या व्यक्तीच्या सहवासात आली असेल आणि जरी तिला काही त्रास नसला तरी तिला घरात किंवा घरी शक्यच नसेल तर सरकारने सोय केलेल्या ठिकाणी सतरा दिवस इतर माणसांपासून वेगळे ठेवतात. त्याला ‘क्वारंटाईन / विलगीकरण करणे’ असे म्हणतात.
‘क्वारंटाईन / विलगीकरण’ म्हणजे काय?
जर एखादी व्यक्ती कोव्हिड – 19ने आजारी असलेल्या व्यक्तीच्या सहवासात आली असेल आणि जरी तिला काही त्रास नसला तरी तिला घरात किंवा घरी शक्यच नसेल तर सरकारने सोय केलेल्या ठिकाणी सतरा दिवस इतर माणसांपासून वेगळे ठेवतात. त्याला ‘क्वारंटाईन / विलगीकरण करणे’ असे म्हणतात.
जर एखादी व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह असेल आणि तिला सौम्य त्रास असेल तर तिला आपल्या घरात किंवा सरकारने सोय केलेल्या ठिकाणी आयसोलेशनमध्ये ठेवतात.
या व्यक्तींपासून इतरांना संसर्ग होऊ न देणे आणि करोनाची साखळी तोडणे हा याचा मुख्य उद्देश असतो.
आपण यापुढे ‘क्वारंटाईन अथवा विलगीकरण / आयसोलेशन’ यासाठी ‘क्वारंटाईन’ हा शब्द वापरणार आहोत.
जिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्या व्यक्तीमध्ये दहा दिवसात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि त्यानंतर तिच्यापासून दुसर्या व्यक्तीला करोनाची लागण होत नाही. म्हणून सरकारी सोय जिथे असते तिथून त्या व्यक्तीला दहा दिवसांनी घरी सोडतात. तसेच बहुसंख्य व्यक्ती सतरा दिवसात ताप/ खोकला/ अशक्तपणा यातून बाहेर पडतात व त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हायचे दहा दिवस अधिक सात दिवस खबरदारी म्हणून असा क्वारंटाईनचा सतरा दिवसांचा कालावधी असतो.
क्वारंटाईनचा अजून हा उपयोग असा आहे की कोव्हिड पॉझिटिव्ह पेशंटवर लक्ष ठेवणे आणि गरज भासल्यास त्याला तत्काळ हॉस्पिटलला हलवणे.
कुणाला क्वारंटाईन केले जाते?
- ज्या व्यक्ती दुसर्या ‘कोव्हिड – 19 बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आल्या आहेत, मग त्यांना त्रास असो वा नसो. त्यांची टेस्ट झाली नसली तरी.
- कोव्हिडची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे; ज्यांना ताप खोकला आहे पण गंभीर लक्षणे नाहीत असे पेशंट.
कोव्हिड – 19साठी क्वारंटाईन / विलगीकरण आपआपल्या घरात करू शकतो का?
जर तुमचं घर तुम्ही एका खोलीत स्वतंत्रपणे २४ तास एकटे राहू शकत असाल एवढं मोठं असेल तर. आणि टॉयलेटही स्वतंत्र आहे तर तुमचे क्वारंटाईन घरात अगदी सहज होऊ शकते नव्हे तसेच करावे. एकच काळजी घ्यायची. तुमचा संपर्क इतरांना होऊ नये. पण जर ते शक्यच नसेल तर मात्र सरकारने सोय केलेल्या ठिकाणी, क्वारंटाईन करावे.
कृपया आमच्या घरात सोय आहे असे खोटे सांगून आरोग्य यंत्रणांना फसवू नका. तुम्ही तुम्हाला स्वतःलाच फसवत आहात हे लक्षात घ्या. घरी विलगीकरणाची सोय करता येत नसली तरी घरी थांबताना आपल्यामुळे आपल्या घरच्यांना -शेजारच्यांनाच कोव्हिडची लागण होणार आहे हे लक्षात घ्या. म्हणून घरी सोय होत नसेल तर सरकारने जिथे सोय केली आहे तिथे जा.
आपल्या घरात विलगीकरण करताना ही काळजी घ्यावी.
- आजारी व्यक्ती व इतर सर्वांनी सतत मास्क लावायला हवा. (कापडी मास्क)
- दर आठ तासांनी मास्क बदलायचा आहे. मास्कऐवजी तीन पदरी रुमाल/ कापड चालेल.
- आजारी व्यक्तीने वापरलेला मास्क तसेच त्या व्यक्तीने वापरलेले कपडे तसेच त्या व्यक्तीच्या जेवणाची भांडी साध्या साबण पाण्यात पंधरा वीस मिनिटे बुडवून ठेवली तर ते कपडे इतर कपड्यांबरोबर साबणाने धुता येतात. (कोव्हिडचा व्हायरस साबण पाण्यात पटकन मरून जातो.)
- आजारी व्यक्तीने त्याच्या खोलीतच जेवण घ्यावे. दिवसभर वेगळ्या खोलीत आणि संध्याकाळी कंटाळा आला म्हणून टीव्ही बघायला इतरांबरोबर असं नको.
- आजारी व्यक्ती एकटीच घरात नको. एक तरी इतर व्यक्ती आजारी माणसावर लक्ष ठेवायला आजूबाजूला हवी. किंवा ऐनवेळी कुणीतरी धावून येईल अशी व्यवस्था हवी.
व्यक्ती घरात क्वारंटाईन असताना एकच बाथरूम व संडास कसे वापरता येईल?
शक्यतो क्वारंटाईन / विलगीकरण घरी केले गेले तर त्या माणसाला वेगळी रूम, बाथरूम वा टॉयलेट असावी. पण भारतात अशी चैन काहींनाच शक्य आहे. मग त्या कुटुंबात एकच बाथरूम व संडास कसा वापरायचा?
बाथरूम व संडासमध्ये ब्लिचिंग पावडर घातलेल्या पाण्याची (1 % सोडियम हायपोक्लोराईट याचे पाच लिटरचे कॅन उपलब्ध असतात) वेगळी बादली ठेवावी. ज्याला क्वारंटाईन/ विलगीकरण केले आहे त्याने ती बाथरूम व संडास वापरण्याआधी आणि नंतर (जमीन, कडी, नॉब व भिंती) या पाण्याने धुऊन घ्याव्यात. क्वारंटाईन/ विलगीकरण केलेल्या व्यक्तीने जाता-येता इतरांपासून कमीत कमी सहा फूट अंतर राहील हे बघावे.
काय झाले तर क्वारंटाईनमधल्या व्यक्तीला तत्काळ कोव्हिड सेंटरला घेऊन जायचे?
- श्वास घ्यायला त्रास होणे/ दम लागणे.
- छातीत दुखू लागणे, दाब वाटू लागणे.
- गुंगी येणे/ शक्तीपात झाल्यासारखे वाटणे.
- ओठ, हाताची नखे निळसर पडणे.
- जर पल्स ऑक्सीमीटर असेल तर,
– 94 वा त्या खाली रीडिंग येणे.
– चार पाचने रीडिंग खाली जाणे (नेहमी समजा 98 असेल आणि ते 94 झाले तर),
– खोलीतल्या खोलीत सहा मिनिटे चालून जर रीडिंग चार पाचने कमी झाले तर.
डॉ. अरूण गद्रे हे ज्येष्ठ स्रीरोग तज्ज्ञ व लेखक आहेत.
लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही. This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.