मी सुमन पुजारी. गेली १७ दिवस कोव्हिडचा अत्यंत भीषण असा अनुभव घेऊन मी घरी परतले आहे. हा काळ माझ्यासाठी जीवन मरणाचा होता. शरीराला आणि मनालाही असंख्य वेदना…
मी सुमन पुजारी. गेली १७ दिवस कोरोनाचा अत्यंत भीषण असा अनुभव घेऊन मी घरी परतले आहे. हा काळ माझ्यासाठी जीवन मरणाचा होता. शरीराला आणि मनालाही असंख्य वेदना झाल्या. आपलं जगणं किती मोलाचे आहे हे मत्यूच्या दरवाजावरून परतल्यानंतर मला कळले. एक प्रकारे माझा हा पुनर्जन्मच झालाय. मागच्या सात आठ महिन्यांपासून कोरोनाबद्दलच्या बातम्या मी ऐकत होते. याची काळजी कशी घ्यायची हे मला माहिती होते. तरीही त्या विषाणूने कुठल्या तरी बेसावध क्षणी मला गाठले आणि माझ्यासोबत माझ्या आप्तस्वकीयांची जणू परीक्षाच त्याने घेतली. मात्र ही लढाई जिंकण्यात आम्ही यशस्वी झालो याचे समाधान आहे.
..आणि कोरोनाची लागण झाली
५ सप्टेंबरचा तो शनिवारचा दिवस नेहमीसारखाच उजाडला. त्या दिवशी ‘आशा वर्कर्स संघटने’ची जिल्हा परिषदेवर निदर्शने होते. त्याची मी तयारी करीत होते. सकाळी आशा सांगलीत जमत असल्याचा निरोप मला मिळत चालला होता. आज आंदोलनात काय करायचे याची जुळवाजुळव सुरू झाली होती. आणि साडेदहाच्या सुमारास मला श्वास घ्यायला त्रास होतोय असे वाटायला लागले. मी कॉम्रेड शंकर पुजारींना याबद्दल सांगितले. त्यांनी मला धीर दिला आणि काही डॉक्टरांशी बोलायला सुरुवात केली. मी डॉक्टरांना काय होतय हे थोडक्यात सांगितले. त्यांनी मला पुण्यातील मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. कॉम्रेड शंकर यांनी आशांच्या आंदोलनाची जबाबदारी घेतली आणि मी रुग्णालयात जायचे ठरवले. माझी मुलगी शरयू आणि जावई विशाल बडवे यांनी मला रुग्णालयात भरती केलं. सुदैवानं तिथं बेड उपलब्ध होता. किमान सहा दिवस राहावे लागेल असे त्यांनी मला भरती होताना सांगितले. त्यामुळे काही दिवस इथंच राहावे लागणार याची मानसिक तयारी माझी झाली होती. मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काहीच वेळात मला ऑक्सिजन लावण्यात आला. इतर वेळा आपल्या निसर्गात असणारा मुबलक ऑक्सिजन आपल्याला जीवंत ठेवत असतो, त्याची किंमत मला आता कळायला लागली होती. त्या दिवशी रात्रभर मी तळमळत होते. आठवणींचा, माझ्या माणसांचा विचार करणे सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लेक शरयू मोबाईलचा चार्जर देण्यासाठी आली आणि देऊन निघून गेली. ती जाण्यासाठी मागे वळली तेव्हाही मला पुन्हा पुढचे काही आठवडे भेटणारचं नाही अशी शंकादेखील मनाला शिवली नाही. त्यानंतर जो काही तिच्याशी संपर्क होता तो मोबाईलच्या माध्यमातून.
तब्येत ढासळतच गेली..
पहिले दोन दिवस मी ऑक्सिजनच्या साहाय्याने प्रकृती सुधारण्याच्या मागे होते. दरम्यान माझी सीटी स्कॅन करण्याचे ठरले होते. त्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णवाहिका उभी होती. तिथपर्यंत जाण्यासाठी व्हिलचेअर मिळाली नाही आणि त्यामुळे मला चालत जावे लागले. रुग्णवाहिकेमधून आम्ही जिथे पोहोचलो तिथेही मला चालतच जावे लागले. परिणामी माझी धाप वाढली. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये परतले होते तेव्हा माझा त्रास वाढला होता. बेडवर पडल्यानंतर काही वेळाने मला शौचाला जावे लागले. मी तिथल्या मावशींना तसे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘समोरच आहे टॉयलेट, जाऊन या’. मी चालत गेले. काही वेळानंतर मला कमोडवरून उठताच येत नव्हते. कशीबशी मी बेसीनपर्यंत पोहोचले आणि मला तिथे झटका लागल्यासारखे झाले. तो मला आलेला स्ट्रोक होता. टॉयलेटचा दरवाजा उघडाच असल्यामुळे तिथले कर्मचारी धावत आले. त्यांनी मला व्हिलचेअरवरून बेडपर्यंत आणले. त्यानंतर काही काळ मला काहीच आठवायचे बंद झाले. मला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यात किती वेळ गेला हे मला आठवत नाही. पण मला जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या नाका तोंडावर व्हेंटिलेटर होते. त्यातूनच माझा श्वासोच्छवास सुरू होता. आता हाच व्हेंटिलेटर पुढचे अनेक दिवस माझ्या तोंडावर राहणार असल्याची कल्पना मला नव्हती. या काळात माझे शरीर अत्यंत थंड पडत चालले होते. माझ्या रक्तात गुठळ्या तयार होऊ शकत होत्या. ज्यामुळे तो खूप मोठा धोका होता. मला फारसा खोकला नव्हता पण उबळ यायची. एकदा रक्तही आले. व्हेंटिलेटर सलग तीन-चार तास असायचे. त्यानंतर थोडेसे पाणी दिले जायचे. सततच्या व्हेंटिलेटरमुळे माझ्या तोंडात अजिबात लाळ जमा होत नव्हती. दिवसभरात मला तीस इंजेक्शन्स लावण्यात आली होती.
त्यानंतर पुजारींनी पुण्याच्या डॉ. अनंत फडके आणि कोल्हापूरचे डॉ. शरद भुताडिया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी, मी ज्या रुग्णालयात दाखल होते तेथील डॉक्टरांशी ओळख काढण्याचा सल्ला दिला, ओळख काढण्यात आली. सदर डॉक्टर कॉम्रेड शंकर यांना ओळखत होते. पेशंट क्रिटिकल असल्याचे त्यांनी सांगितले पण डॉक्टरांनी बराच धीर दिला. माझी प्रकृती स्थिर होती. सुधारणा होण्याची शक्यता होती. माझी काळजी घेणारे केवळ कुटुंबातलेच नाहीत तर याच हॉस्पिटलमधील ही डॉक्टर मंडळी, नर्स, ब्रदर्सही आहेत याची जाणीव झाली. खचायचे नाही, हेच प्रत्येकजण सांगत होता. एके दिवशी मला खूप भरून आले. माझ्या डोळ्यातले पाणी पाहून एक मावशी म्हणाल्या, ‘तुम्ही बऱ्या होऊन घरी जाव्यात, म्हणूनच आम्ही काम करतोय.’
‘टोसीलीझँब’ इंजेक्शन ठरले वरदान!
आणखी एक उपाय म्हणून ‘टोसीलीझँब’ नावाचे इंजेक्शन द्यावे लागणार होते. मात्र या इंजेक्शनचे साईड इफेक्ट्सही होते. यातून शरीरातील इम्यूनिटी खूप वाढवली जाते आणि ती कमी करण्यासाठी काही वेळानंतर दुसरी दोन इंजेक्शन्स् द्यावी लागणार होती. टोसीलीझँब या इंजेक्शनची किंमत ४० हजार ५०० होती. याचे किती डोस द्यावे लागणार याची कल्पना कुणालाच नव्हती. दुसरे म्हणजे या इंजेक्शनचा तुटवडा होता. अखेर हे इंजेक्शन देण्याचा निर्णय माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतला. बऱ्याच प्रयत्नानंतर हे इंजेक्शन सांगलीत उपलब्ध झाले आणि अखेर रात्री बारा वाजता मला हे इंजेक्शन देण्यात आले. त्या रात्री माझी लेक शरयू आणि जावई विशाल रात्रभर हॉस्पिटलच्या बाहेर जीव मुठीत धरून बसले होते. हे इंजेक्शन दिल्यानंतर माझ्यावर नेमका काय इफेक्ट झालाय याची धास्ती त्यांना होती.
सकाळी जाग आली तेव्हा मला बरे वाटू लागले होते. मी सहाच्या सुमारास शरयूला फोन केला. मला बरे वाटत असल्याचे सांगितल्यानंतर तिच्या आवाजात झालेला बदल मला आनंद देणारा होता. तू आता नक्की बरी होऊन बाहेर येणार असे ती म्हणाली. त्यानंतर डॉक्टरांनी टोसीलीझँब इंजेक्शनचा आणखी डोस देण्याचे ठरवले आणि पुढील ट्रिटमेंट सुरू झाली. याचा चांगला परिणाम माझ्या प्रकृतीवर होत होता. खूप अशक्तपणा होता. अंगात त्राण उरले नव्हते. असे दहा बारा दिवस गेले. हळूहळू माझ्या तब्येतीत सुधारणा होत गेली.
कोव्हिड योद्ध्यांना सलाम !
१७ दिवसांच्या खडतर उपचारानंतर मला डिस्चार्ज मिळाला. या काळात माझ्या वॉर्डमधील अनेकांनी प्राण सोडला. एखादा पेशंट दगावल्यानंतर आतमध्ये जी आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ होते ती जीवघेणी असते. आपण केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश न आल्याचे शल्य डॉक्टरांसह सर्वांनाच असते. त्यांच्या पीपीई कीटच्या आतमध्ये त्यांचे पाणावलेले डोळे कुणाला दिसत नाहीत. ही माणसं आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत. त्यांचे मनोबल टिकवणे खूप गरजेचे आहे. आयुष्यात निसर्गाइतकेच प्राण वाचवण्याचे काम हे कोव्हिड योद्धे करीत आहेत. त्यांच्या या समर्पण वृत्तीला माझा सलाम.
रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे मी वाचले. या काळात माझे नातेवाईक, चळवळीतील असंख्य कार्यकर्ते, अनेक ज्ञात अज्ञातांनी माझ्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानते. आता माझी तब्येत सुधारत आहे. अशक्तपणा आहे. पुढचे काही दिवस मला विश्रांती घ्यावी लागणार आहे. मी पुन्हा लवकरच चळवळीच्या कामासाठी सक्रिय होईन याची मला खात्री आहे. तुम्हीही कोरोनापासून स्वतःला दूर ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. लढेंगे, जितेंगे!!!
संबंधित डॉक्टर व रुग्णालयाचे नाव गोपनीय ठेवले आहे.
सुमन पुजारी ह्या ‘महाराष्ट्र आशा वर्कर्स’ व ‘गटप्रवर्तक संघटना (आयटक)’च्या जनरल सेक्रेटरी आहेत.