• मोफत/सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी.. साथी हेल्पलाईन 94 22 32 85 78

माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली; मी आता काय करू?

बहुतांश लोक घरी ट्रीटमेंट घेऊन बरे होतात. अजिबात घाबरू नका. कोव्हिड झालेल्या १० पैकी ९ जण हॉस्पिटलमध्ये दाखल न होता घरी ट्रीटमेंट घेऊन बरे होतात. काळजी मात्र सर्वांनी घ्यायला…

.    बहुतांश लोक घरी ट्रीटमेंट घेऊन बरे होतात.

  • अजिबात घाबरू नका. कोव्हिड झालेल्या १० पैकी ९ जण हॉस्पिटलमध्ये दाखल न होता घरी ट्रीटमेंट घेऊन बरे होतात.
  • काळजी मात्र सर्वांनी घ्यायला पाहिजे.
  • रिपोर्ट मिळाल्यावर सरकारी किंवा खाजगी डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • तुमची लक्षणे व एकंदर परिस्थिती पाहता आणखी काही टेस्ट करायच्या का ते तुम्हाला सांगतील.
  • तसेच कोणती औषधे घ्यायची ते सांगतील;
  • उदा.- ताप कमी करण्यासाठी ‘पॅरासिटॅमॉल’ची गोळी दिवसातून गरजेप्रमाणे तीन ते चार वेळा घ्यायला सांगतील.
  • कोरडा खोकला, ताप, उलट्या इ. पैकी त्रास असल्यास डॉक्टर त्यासाठी गोळ्या/ औषध सांगतील.

२. असे असेल तर विशेष काळजी घ्यायला हवी.

  • वय साठ पेक्षा जास्त असेल किंवा डायबेटिस, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, दम्याचा आजार असे इ. पैकी आजार असेल तर विशेष काळजी घ्यायला हवी.
  • उदा.- ‘डायबिटीस’ असेल तर रक्तातील साखर परत तपासायला हवी, जादा ब्लडप्रेशर असेल तर परत ब्लडप्रेशर तपासायला हवे.
  • आपण घेत असलेली औषधे व त्यांचा डोस बरोबर आहेत ना याची डॉक्टरमार्फत परत खात्री करा.
  • दम लागायला लागला तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी ताबडतोब सरकारी किंवा खाजगी डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • खरं तर दम लागेपर्यंत वाट न बघता पल्स ऑक्सीमीटर या छोट्याशा उपकरणाने रोज रक्तातील ऑक्सीजनची पातळी तपासायला हवी; ती ९४ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा.
  • ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमामार्फत सरकार ‘पल्स ऑक्सीमीटर’ची सोय सर्व कोव्हिड-रुग्णांना उपलब्ध करून देणार आहे.
  • ‘डायबिटीस’ असलेल्यांची रक्तातील साखर तपासणे, ब्लडप्रेशर असलेल्यांचे ब्लडप्रेशर तपासणे हेही करणार आहे.

३.    कोव्हिड-लागण आणखी पसरू नये म्हणून…

  • तुमच्या घरातील मंडळींची तसेच गेल्या चौदा दिवसात मास्क न लावता सहा फुटाच्या आत दहा-पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ जे कोणी आले त्या सर्वांची सरकारी यंत्रणा टेस्ट करेल. त्यांच्याशी सहकार्य करा.
  • लक्षणे सुरू झाल्यापासून १४ दिवस घराबाहेर पडू नका.
  • घरातही १४ दिवस इतर सर्वांपासून दूर, नाकाला मास्क लावून एका वेगळ्या खोलीत रहा!
  • जेवण-खाण्यासाठी वेगळी ताट-वाटी, भांडी वापरा किंवा शक्यतो स्वत: साबण-पाण्याने धुवा. 
  • शक्यतो तुम्ही स्वतंत्र संडास/बाथरूम वापरा. 
  • हे शक्य नसेल तर संडास/बाथरूम वापरल्यावर संडास-बाथरूम मधील नेहमी हात लागणाऱ्या जागा १% टक्के ब्लीचिंग म्हणजे सोडियम हायपोक्लोराइट सोल्युशनने ते पुसून घ्या किंवा त्यावर फवारा. 

४.         कोव्हिड-केअर सेंटरमध्ये का दाखल व्हायचे?

  • बहुतांश लोकांची घरे फार लहान असल्याने रुग्णासाठी वेगळी खोली असे शक्य नसते.
  • अशांनी जवळच्या असलेल्या सरकारी कोव्हिड-केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे.
  • अनेक सरकारी सेंटर्समध्ये चांगली सोय असते. 
  • नाश्ता, चहा, जेवण, आंघोळीसाठी पाणी इ. सर्व सोयी असतात.
  • गरजेप्रमाणे साधी औषधे, ब्लड प्रेशर तपासणी, पल्स ऑक्सीमीटर तपासणी इ. सोयी असतात.
  • तब्येत बिघडली तर ते सुयोग्य हॉस्पिटलमध्ये दाखलही करतात.
  • या सोयींच्यामध्ये काही कमतरता असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्फत तक्रार करून सुधारणा करून घ्या. 
  • या केंद्रांच्या विरोधात खोटा प्रचार केला जात आहे. त्यावर विश्वास ठेवू नका.     

५.    बरे झाल्यावर घ्यायची काळजी

  • हे १४ दिवसांचे अलगीकरण संपल्यावर परत टेस्ट करायला हवी का? तर ‘नाही’.
  • दुसरे म्हणजे निदान काही महिने तरी या कोव्हिड-विजेत्यांना कोव्हिड होत नाही.
  • मात्र काही जणांना १४ दिवसांनंतरही काही त्रास होत राहतो व काही ना काही चिवट आजारही होतो.
  • त्यामुळे काही त्रास होत असल्यास जरूर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. अनंत फडके हे ‘जन आरोग्य अभियान, महाराष्ट्रा’चे समन्वयक आहेत,