‘कोरोनाविषयक क्षमता बांधणी आणि स्थानिक शासकीय यंत्रणेत अपेक्षित सुधारणा करणे’ या प्रकल्पा अंतर्गत कोविड-19 टाळेबंदीच्या काळात रेशन यंत्रणेच्या तरतुदीवर आधारित…
‘कोरोनाविषयक क्षमता बांधणी आणि स्थानिक शासकीय यंत्रणेत अपेक्षित सुधारणा करणे’ या प्रकल्पा अंतर्गत कोविड-19 टाळेबंदीच्या काळात रेशन यंत्रणेच्या तरतुदीवर आधारित सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये गावातील होतकरू, प्रतिष्ठित आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आशा प्रत्येक गावातील चार व्यक्तींकडून रेशनविषयक प्रश्नावली भरून घेण्यात आली. ही माहिती घेत असताना यवतमाळ तालुक्यातील ‘बिसनी’ गावातील रेशन कार्ड नसलेल्या 10 कुटुंबांना रेशन मिळाले नसल्याचे समजले. सगळीकडे टाळेबंदी असताना आणि लोकांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा असताना अशा परिस्थितीत हक्काचे धान्य मिळत नाही, हे लक्षात येताच ‘ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, यवतमाळ’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गावातील माजी सरपंच, गाव आरोग्य, पाणी पुरवठा, पोषण आणि स्वच्छता समिती सदस्य, आशा सेविका व रेशन न मिळालेल्या कुटुंबातील सदस्य यांच्याशी चर्चा केली व सगळी हकीकत समजून घेतली. या चर्चेमध्ये या सर्व कुटुंबांच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये अगोदरच केल्या असल्याचे समजले. शासनाच्या आदेशानुसार नोंद केलेल्या कुटुंबाला धान्य देणे नियमाला धरून आहे. तरीदेखील गावातील ही गरीब कुटुंबे धान्य मिळण्यापासून वंचित कशी हा प्रश्न समोर उभा राहिला आणि तो सोडविण्यासाठी लगेचच सर्वजण रेशन वितरकाकडे गेले. त्यावेळी गाव समिती सदस्य आणि माजी सरपंच यांनी स्वत: रेशन वितरकास भेटून 10 कुटुंबांना शासनाचा आदेश दाखवत त्या आदेशानुसार या 10 कुटुंबांना लगेचच धान्य देण्यास सांगितले. प्रकल्पाच्या निमित्ताने का होईना पण रेशन विषयक सर्व्हे झाला आणि त्यातून शासनाने देऊ केलेल्या लाभापासून वंचित असणाऱ्या बिसनी गावातील त्या 10 कुटुंबांना मोफत धान्य मिळवून देण्यात मदत करता आली. आज त्या कुटुंबांना त्यांच्या हक्काचे माणशी पाच किलो मोफत धान्य मिळत आहे.
अखेर आशांना ‘मास्क’ मिळाले…!
मार्च 2020 पासून संपूर्ण जगभर कोरोना या विषाणूने थैमान घातलेले असताना लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी शासनाने देाभर लॉकडाऊन लागू केले आणि सरकारी आरोग्य यंत्रणेत एकच धावपळ सुरू झाली. आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली. वरिष्ठ पातळीपासून अगदी गाव स्तरावर असणारे आरोग्य सेवकही एकजुटीने काम करू लागले. शहरात जशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत होती तशीच ती गाव खेड्यांतही हळूहळू वाढू लागली.ग्रामीण भागात आरोग्याचे काम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘आशासेविका’. गावांमधील कोरोनाच्या रुग्ण संख्येचा आणि एकंदरीत लोकांच्या आरोग्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे महत्त्वाचे काम शासनाकडून आशा सेविकांवर सोपविण्यात आले. याच काळात म्हणजे मे 2020 पासून ‘साथी संस्था, पुणे’ यांचा ‘लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रिया अंतर्गत कोरोनाविषयक क्षमता बांधणी आणि स्थानिक शासकीय यंत्रणेत अपेक्षित सुधारणा करणे’ हा प्रकल्प महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तेथील संस्थेमार्फत सुरू झाला. या प्रकल्पा अंतर्गत ‘ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, यवतमाळ’ या संस्थेचे याच तालुक्यामध्ये 5 प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणाऱ्या 20 उपकेंद्र व त्या अंतर्गत असणाऱ्या गावांमध्ये काम सुरू झाले. या प्रकल्पाच्या
माध्यमातून जवळपास 43 आशा सेविका जोडल्या गेल्या. त्यांच्यासोबत कोरोना व लॉकडाऊन काळामध्ये आरोग्य व्यवस्था आणि सेवा कशाप्रकारे दिल्या जात आहेत, याबाबत सर्व्हेक्षण करण्यात आले व माहिती घेण्यात आली. ही माहिती घेत असताना जवळपास सर्वच आशांनी सांगितले की, ‘त्यांना आरोग्य विभागाने सुरुवातीला प्रत्येकी 2 मास्क दिले व ते स्वच्छ करून पुन्हा पुन्हा वापरण्यास सांगितले’. परंतु ‘कोरोना’ हा विषाणू श्वसन यंत्रणेशी निगडित असल्याने प्रत्येक व्यक्तीचे त्याच दृष्टीने संरक्षण होणे खूप गरजेचे आहे. अपुरे मास्क यामुळे आमचे आरोग्य धोक्यात येऊन संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. गावातील लोकांच्या आरोग्याची माहिती घेण्यासारखी इतकी महत्त्वाची जबाबदारी पार पाडताना खरेतर त्यासोबत आशा सेविकांचे स्वत:चे आरोग्य सुरक्षित असणे देखील खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रत्येक आशा सेविकेकडे पुरेसे मास्क, सॅनिटायझर व इतर सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची आहे. सुरुवातीच्या काळात यंत्रणेने ही जबाबदारी पार पाडली देखील. परंतु जसजसे महिने उलटले तसतसे आशा सेविकांकडील हे साहित्य अपुरे पडू
लागले. प्रकल्पांतर्गत केवळ माहिती घेणे इतकेच काम नव्हते तर त्यातून समोर येणारे मुद्दे, आरोग्य सेवकांच्या अडचणी आणि आरोग्य विभागाला सहकार्य करणे हे देखील काम होते. त्यामुळे आशांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी
संबंधित तालुका समन्वयक यांनी लगेचच पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मास्क पुरवठ्याबाबत चर्चा केली. वरिष्ठ पातळीवर नेमकी काय अडचण आहे, हे समजावून घेतले. तसेच त्यांना गाव पातळीवर
आशांना येणाऱ्या अडचणी देखील सांगितल्या. चर्चेअंती समजले, की तालुका पातळीवरूनच मास्कचा पुरवठा पुरेसा नसल्याने आशा सेविकांना पुन्हा मास्क देता आले नाहीत. अखेर यवतमाळच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून सर्व परिस्थिती पुन्हा एकदा सांगितली. संस्थेकडून सांगण्यात आलेली ही अडचण व वस्तुस्थिती ऐकता तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी लगेचच या 43 आशांना पुन्हा एकदा प्रत्येकी 2 मास्क देण्याचे आदेा दिले व त्यानुसार दुसऱ्या दिवशी मास्क देण्यातही आले. अशा प्रकारे आशा सेविकांचा प्रश्न मार्गी लागला. शुभम हूड हे ‘ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट’, यवतमाळ या संस्थेत ‘तालुका समन्वयक’ म्हणून काम करतात.
शुभम हूड फिल्ड समन्वय- ज्योती शेळके