September 03, 2020
कोविड 19 च्या संकटामध्ये नर्सेसचे प्रश्न आणखीनच गंभीर झाले. या काळात नर्सेसच्या अडचणी आणि त्यांचा लढा याबद्दल एका नर्सचा अनुभव शब्दांकित केला आहे शकुंतला भालेराव यांनी- कोविड योद्धा म्हणून गवगवा, फुलांचा वर्षाव म्हणजे समाज आणि शासनाचा देखावा!…
नमस्कार! जिल्हा पातळीवरील एका सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. हे स्त्री रुग्णालय आहे. आमचे रुग्णालय कोविड केंद्र नाही. त्यामुळे इथे काम करायचे म्हणजे आणखी कठीण झाले आहे. कोविड केंद्र असले की किमान आपण सर्व दक्षता बाळगतो, ड्युटीच्या वेळा त्यानंतर क्वारंटाईनच्या वेळा, त्यासाठी लागणारी यंत्रणा आणि रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतात. परंतु इथे कोविड केंद्र नसल्यामुळे स्वसंरक्षणाची साधने (घ्घ्क कीट) तर दूरचाच मुद्दा पण आम्हाला साध्या मुखपट्टी आणि हातमोज्यांसाठीही (मास्क आणि ग्लोव्ह्ज) देखील भांडावे लागते. आणि आम्ही अशी मागणी केल्यावर ‘काम करायचे तर करा नाहीतर करू नका’ अशी उत्तरे मिळतात. कामाचा ताण तर आहेच. 50 नवजात बालकांना बघावे लागते त्यातले काही गंभीर पण असतात. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. कोविड 19 मध्ये पदभरतीची घोषणा केली होती परंतु अजून तसे काही झाले नाही. अनेकदा जोडून ड्युटी लागते म्हणजे दोन रात्री सलग काम करावे लागते. घरी 2 वर्षाचे बाळ आहे, कुटुंबाला अजिबात वेळ देता येत नाही.
आता सध्या मी क्वारंटाईन झाले आहे. कारण रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाली. यासोबतच नर्सेसच्या हक्काच्या मागणीसाठी मी ‘युनाइटेड नर्सेस फेडरेशन’मध्ये आहे. त्या अंतर्गत नर्सेसचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा पातळीवर काम बघते.
आम्हाला वाळीत टाकू नका..
नर्सेसचे प्रश्न आधीही होते आणि कोविड 19 च्या संकटामध्ये ते आणखी गंभीर झाले. आरोग्य कर्मचाऱ्याचा कोविड योद्धा म्हणून गवगवा करणे, फुलांचा वर्षाव करणे, यातून जरी आमचा जयजयकार झाला असेल तरी समाज आणि शासनाने हा सगळा देखावा केला असं म्हणायला हरकत नाही. हे होत असतानाच, अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या नर्सेसना घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले, काही ठिकाणी भाडे वाढवले. अचानक आलेल्या या मूलभूत संकटाला आमच्यापैकी अनेकींनी तोंड दिले. काहींनी कुटुंबातील सदस्यांना गावी पाठवले आणि जिथे शक्य आहे तिथे वेगळी रूम करून राहू लागले. काहीजणी मैत्रिणींच्या रूमवर राहू लागल्या. आमचे समाजाला हे सांगणे आहे की आम्ही देखील फक्त पगारासाठी काम करत नाही तर या महामारीमध्ये आमच्या स्वतःच्या संरक्षणाच्या तरतुदी नसताना जीव धोक्यात घालून काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला वाळीत न टाकता आमचा आदर ठेवा आम्ही समाजासाठी काम करत आहोत.
नर्सेसचा लढा!
रुग्णालय प्रशासन पातळीवर तर अशा काही गोष्टींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे नर्सेसच्या संघटनांना पण कंबर कसून उभे राहण्याशिवाय पर्याय नाही त्याचीच एक छोटी झलक आपल्यासमोर मांडत आहे. विदर्भातील एका मेडिकल कॉलेजमधील नर्सेसचा लढा! पहिला घाला बसला तो नर्सेसच्या पगार कपातीवर. म्हणजे कोविड 19 चे संकट असल्यामुळे मुख्यमंत्री निधीसाठी या मेडिकल कॉलेजने दीड कोटी रुपये दान केले. त्यामुळे या मेडिकल कॉलेजची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली. आणि याचा परिणाम म्हणजे पगार कपात. याबरोबरच कोविड काळामध्ये नर्सेसना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही, कामाचे तास वाढवलेले आहेत, होस्टेलला राहणाऱ्या नर्सेसना चांगल्या दर्जाचे जेवण नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. याबाबत संबंधित मेडिकल कॉलेजचे प्रशासन, कामगार आयुक्त, जिल्ह्यातील आमदार, मंत्री, प्रसारमाध्यमे यांच्यापर्यंत तक्रारींचे अर्ज पोचवले. पण काही फरक पडला नाही. उलट संबंधित मेडिकल कॉलेजमधून लढा देणाऱ्या नर्सेससोबत अर्वाच्च भाषेचा वापर केला, लायकी काढली, पूर्ण अमरावतीमध्ये तुम्हाला कुठेही नोकरी मिळणार नाही अशा धमक्या देखील दिल्या गेल्या. या लढ्यातील जवळपास 200 नर्सेस नव्याने कामाला लागलेल्या मुली आहेत आणि त्यांच्या शोषणाच्या विरोधात त्या जोरदारपणे उभ्या आहेत आणि युनाइटेड नर्सेस फेडरेशन त्यांच्यासोबत आहे.
केवळ कोविड योद्धा म्हणून संबोधनं आणि प्रतिकात्मक कृती या पलीकडे जाऊन, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविडच्या काळात रुग्ण सेवा करणाऱ्या नर्सेसच्या प्रश्नांची दखल शासनाने तातडीने घ्यायला हवी आणि किमान मूलभूत सुविधा मिळण्याची आणि त्यांच्या सुरक्षेची पूर्णपणे हमी त्यांना द्यायला हवी.
नर्सचे नाव गोपनीय ठेवले आहे.
लेखिका ‘साथी’ संस्थेत आरोग्य कार्यकर्ती म्हणून काम करतात. लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.
अनुभव- शकुंतला भालेराव