कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींनी मिळून तातडीने केलेल्या विधायक कार्याबद्दल वाचा ‘वेध आरोग्याचा’मध्ये- ‘सरपंच संघटने’च्या पुढाकाराने उभे राहिले ‘कोरोना उपचार केंद्र’…
मी… रामभाऊ पारशे, सातवणे गावाचा सरपंच, जिल्हा कोल्हापूर, तालुका चंदगड. ‘कोरोनाचा कहर’, देशा-विदेशात मरत असलेल्या लोकांचा वाढता आकडा, कोरोना बाधितांची आणि उपचार करणाऱ्या यंत्रणेची घालमेल. या बातम्यांनी 25 मार्च, 2020 पासून अक्षरशः ग्रामीण लोकांचे डोके चक्रावून टाकले होते. ..आणि एप्रिलमध्ये खरंच तशी परिस्थिती आमच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात दिसायला लागली.
पहिल्या लॉकडाऊनची सुरुवात झाली तेव्हा लोक खूप घाबरले होते. कोरोनाविषयीची जबरदस्त धास्ती मनात बसली होती. त्यात आरोग्याच्या बाबतीत आधीच अपुऱ्या सोयी-सुविधा. ह्याच परिस्थितीत आमच्या तालुक्यातील लोकांनी झोकून देऊन काम केले. सरपंच व पोलीस पाटलांनी पोलिसांच्या बरोबरीने कामे केली. मात्र तेवढे पुरेसे नाही हे दिसत असताना ढेकोळीवाडी गावातील तरुण सरपंच नरसिंगराव गंगाराम पाटील यांनी सुचवले की, आता शहरातील गंभीर परिस्थिती बघता पुढील काही महिन्यात आपल्या तालुक्यात देखील अशी परिस्थिती उद्भवायला वेळ लागणार नाही, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत जाईल, म्हणून 110 गावातील ‘सरपंच संघटने’च्या वतीने तालुक्यात ‘कोरोना उपचार केंद्र उभारावे’. सगळ्यांनाच ही कल्पना पसंत पडली.
फक्त प्रश्न होता हे रुग्णालय उभारण्यासाठी जमीन कोण देणार? मी स्वत: दोन एकर जमीन देण्याचे कबूल केले. मात्र गाव तालुक्याहून लांब आहे, लोकांना एवढ्या लांब येणे गैरसोयीचे होईल असे लोकांचे म्हणणे पडले. शेवटी रुग्णालय बांधकामासाठी जास्तीत-जास्त निधी देण्याचे आव्हान मी स्वीकारले. सध्या तालुक्याच्या ठिकाणाजवळ जागा शोधण्याचे काम चालू आहे कारण रुग्णालय आताच बांधण्याची गरज सगळ्यांनाच मनापासून वाटत होती.
शेवटी जमीन कोण देणार, पैसे कसे जमणार यावर बऱ्याच चर्चा केल्यानंतर, रुग्णालय होईल तेव्हा होईल तोपर्यंत तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींनी मिळून किमान लोखंडी खाटा, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासाठी घेण्याचे ठरले. खाटांची खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पातळीवर उपलब्ध 14 व्या वित्त आयोगातून निधी वापरण्याचे ठरले व त्यानुसार 109 लोखंडी खाटा ग्रामीण रुग्णालयाला विकत घेऊन दिल्या.
सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी आणि बाहेरून आलेल्या लोकांना विलगीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात या खाटा ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून तालुक्याचे सर्व आरोग्य आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत मिळून चंदगड ग्रामीण रुग्णालयालाच ‘कोविड केअर सेंटर’चा दर्जा देण्यात आला. आता 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात नवीन 109 खाटांचाही पूर्णपणे वापर होत आहे.
सरपंच संघटनेच्या वतीने घेतलेल्या एका निर्णयामुळे लक्षात आले की, फक्त संकल्पना मांडण्याची आणि पुढाकार घेण्याची गरज आहे. पुढील गोष्टी सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या मागे लागून करता येतात. परिस्थितीचे गांभीर्य जेवढे शासनाला आहे तेवढेच जनतेला आहे.
फक्त गरज आहे काहीतरी करून दाखवायची!! एवढं केले तरी आरोग्यविषयक आणि समाजातील इतरही प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होईल असे या छोट्याशा अनुभवावरून लक्षात येते. रामभाऊ पारशे हे सातवणे गावाचे (तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर) सरपंच आहेत.
रामभाऊ पारशे