करोनाने जगभर आज एक हतबलता आली आहे. जिथे जागतिक आरोग्य संघटना आपल्या मार्गदर्शक सूचना बदलते आहे तिथे सामान्य माणूस गोंधळलेला असणं स्वाभाविक आहे. भारतातसुद्धा आज झपाट्याने साथ वाढू लागली आहे. शंभर दिवस लॉकडाऊनचे मिळूनसुद्धा सरकारी वैद्यकीय सेवा पुरेशा सक्षम झालेल्या नाहीत. जर आलीच तर लस यायला अजून वर्ष दीड वर्ष आहे, सामान्य जनता अगतिकतेने जादुई उपचारांची वाट बघत आहे…
करोनाने जगभर आज एक हतबलता आली आहे. जिथे जागतिक आरोग्य संघटना आपल्या मार्गदर्शक सूचना बदलते आहे तिथे सामान्य माणूस गोंधळलेला असणं स्वाभाविक आहे. भारतातसुद्धा आज झपाट्याने साथ वाढू लागली आहे. शंभर दिवस लॉकडाऊनचे मिळूनसुद्धा सरकारी वैद्यकीय सेवा पुरेशा सक्षम झालेल्या नाहीत. जर आलीच तर लस यायला अजून वर्ष दीड वर्ष आहे, सामान्य जनता अगतिकतेने जादुई उपचारांची वाट बघत आहे. चतुर व्यापारी होमिओपॅथीच्या गोळ्या, रामदेवबाबाच्या आयुर्वेदिक गोळ्या विकायला पुढे आले आहेत. या गोळ्यांमुळे आधी करोना शंभर टक्के बरं करायचा दावा होता. आता करोनाविरुद्ध रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी त्या उपयुक्त आहेत असे म्हणत आहेत!
भारतात ॲलोपॅथीबद्दल अनेक गैरसमज आहेत. ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट असतात आणि ॲलोपॅथी फक्त रोग बरे करते तर आयुर्वेद व होमिओपॅथी मुळात रोगच होऊ देत नाहीत असा चुकीचा समज जनमानसात आहे. आणि म्हणूनच रामदेवबाबाच्या गोळ्या आणि होमिओपॅथीची औषधे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात यावर भारतीय जनमानस चटकन विश्वास ठेवताना दिसत आहे – काहीही प्रश्न न विचारता! होमिओपॅथी वा आयुर्वेदामुळे साईड इफेक्ट होत नाहीत. हा तद्दन अंधविश्वास आहे. कुणीही प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करणारा/ करणारी त्या त्या पॅथीतील तज्ज्ञ असे विधान करणार नाही. आयुर्वेदाची म्हणून जी काही औषधे आज विकली जातात त्यांच्यावर ॲलोपॅथीसारखा क्वालिटी कंट्रोल नाही. वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना, मी स्वतः आयुर्वेदाची बाजारात मिळणारी ऑषधे घेऊन सीरिअस असे शिश्याचे (लेड) पॉयझनिंग झालेल्या केसेस बघितल्या आहेत. इतर काही डॉक्टर मित्रांचाही तो अनुभव आहे.
आपण थोडा इतिहासाचा धांडोळा घेऊ. सन 1850. तेव्हा जन्माला आलेला माणूस सरासरी किती वर्षे जगत होता? तर फक्त 25.4 वर्षे. सन 2019 – भारतात आज आयुर्मर्यादा काय आहे? 68.7 वर्षे. 1850च्या आसपास होमिओपॅथी नुकतीच जन्माला आली होती आणि आयुर्वेद तर काही हजार वर्षे अस्तित्वात होते. जर या दोन पॅथीकडे 1850 साली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची जादू होती तर त्यावेळच्या माणसाची आयुर्मर्यादा इतकी कमी का होती? त्यावेळचा माणूस हा ॲलोपॅथी प्रगत झाली असताना (तिचे शास्त्रीय नाव आहे – मॉडर्न मेडिसिन) आज जेवढा जगतो त्यापेक्षा तब्बल 43.3 वर्षे का आधी मरत होता?
वस्तुत: 1850 साली ॲलोपॅथी वा आयुर्वेद दोन्हींकडे आनंदीआनंदच होता. ॲलोपॅथीचीसुद्धा मुख्य औषधं होती- अफू, दारू, शिसे, पारा. पण गेल्या दोनशे वर्षात शास्त्रीय पायावर प्रयोग करत ॲलोपॅथी – मॉडर्न मेडिसिन झाली आहे. युरोपात विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाने झेप घेतली. 1610 साली ल्युएन्हॉकने मायक्रोस्कोपचा शोध लावला. जंतुंमुळे रोग होतात हे समजण्याची ती सुरुवात होती. त्याचीच परिणीती म्हणून आज मॉडर्न मेडिसिनच्या विज्ञानाला – आयुर्वेद किंवा होमिओपॅथीला नव्हे, करोनाच्या विषाणूची जनुके सुद्धा माहीत झाली आहेत. 1867 साली लिस्टरने कार्बोलिक ॲनसीड – साध्या शब्दात डिसइंफेक्टंटचा अर्थात जंतुनाशकाचा शोध लावला. तो आज ब्लीचींग पावडरच्या पाण्याने करोनाचा व्हायरस मरतो इथपर्यंत आपल्याला घेऊन आला आहे. पेनीसीलीनचा शोध 1928 मध्ये लागला आणि जीवाणू मारता येतात हे माणसाला पहिल्यांदा समजले. त्यानंतरच आयुर्वेदाच्या काळात ज्या रोगांना माणूस अगतिकपणे शरण जात होता त्या टायफॉईड / टीबीवर प्रभावी ॲन्टिबायोटिक मिळाले. जेन्नरने देवीरोगाविरुद्ध लस शोधून काढली म्हणून आज सगळे जग करोनाविरुद्ध लस येईल.
आज लोक ॲलोपॅथीला पर्याय शोधत आहेत ते वाढत्या बाजारीकरणात तिचा खर्च हाताबाहेर गेल्यामुळे. आणि काही हॉस्पिटल्स व डॉक्टर्स ॲलोपॅथीचा उपयोग अगतिक पेशंटना फसवून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी करत आहेत. पण याचीही नोंद घ्यायलाच हवी की, आयुर्वेद व होमिओपॅथीसुद्धा त्याच बाजारात उभे आहेत. ज्या प्रमाणात ॲलोपॅथीचे डॉक्टर धंदेवाईक झाले आहेत त्याच प्रमाणात आयुर्वेद व होमिओपॅथीचे डॉक्टरसुद्धा. अर्थात जेव्हा होमिओपॅथी वा रामदेवबाबा असा काहीही पुरावा नसलेला दावा करतात की त्यांची औषधे ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील आणि तुमचा करोनापासून बचाव करतील तेव्हा ते बाजारात फक्त पैसे कमवायला उभे असतात आणि त्यांचे बळ हे समाजाच्या होमिओपॅथी व आयुर्वेदावरील भाबड्या अंधविश्वासात असते. नव्हे अवघ्या काही महिन्यात ते अब्जावधीची कमाई करणार आहेत ती तुमच्या आमच्या भाबड्या विश्वासामुळे. पी हळद आणि हो गोरी अशी रोगप्रतिकारशक्ती मिळत नसते. ना आयुर्वेदात ना होमिओपॅथीत ना ॲलोपॅथीत. तसा दावा करणारे फक्त चतुर व्यापारी असतात. आणि हे युगानुयुगे चालत आले आहे. दुनिया बेवफूक है, बिकनेवाला चाहिये!
मित्र-मैत्रिणींनो तुमची घालमेल मला समजते. नका लागू अशा बिनबुडाच्या बाजाराच्या नादी. त्याऐवजी आज शास्त्रज्ञ व विज्ञान जे सांगत आहे ते कटाक्षाने पाळा. मास्क वापरणे, सहा फूट शारीरिक अंतर ठेवणे, बाहेरच्या वस्तूला हात लागला की साबणाच्या पाण्याने हात धुणे, आणि जे साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत, ज्यांना ब्लडप्रेशर वा डाएबेटिस यासारखे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घेणे हे अत्यावश्यक आहे.
मला तर असा धोका वाटतो की या आयुर्वेदाच्या, होमिओपॅथीच्या गोळ्या खाऊन काहींचा आत्मविश्वास वाढेल आणि ही जी प्राथमिक काळजी घ्यायची आहे ती न घेतल्यामुळे करोनाची लागण होण्याची शक्यता वाढेल. तसे होऊ देऊ नका आणि आपल्या अगतिकतेमुळे व अंधविश्वासामुळे चतुर व्यापाऱ्यांना गडगंज कमवून देऊ नका. (डॉ. अरुण गद्रे हे ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ व लेखक आहेत.)
डॉ. अरूण गद्रे