“माझं बाळ जन्मल्यापासून मी त्याला एकदाच, तेही घाबरून हात लावला. मनात एक अपराधी भावना होती की आपल्यामुळे आपल्या बाळाला काही नको व्हायला. आता बाळ अडीच महिन्यांचं झालं आहे.” गेल्या तीन महिन्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रावर लगातार काम करणारे डॉक्टर सांगत होते.
“माझं बाळ जन्मल्यापासून मी त्याला एकदाच, तेही घाबरून हात लावला. मनात एक अपराधी भावना होती की आपल्यामुळे आपल्या बाळाला काही नको व्हायला. आता बाळ अडीच महिन्यांचं झालं आहे.” गेल्या तीन महिन्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रावर लगातार काम करणारे डॉक्टर सांगत होते.
या प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन डॉक्टरांची पोस्टिंग आहे पण सध्या मी एकटाच आहे. रविवारी सकाळी येतो आणि शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ड्युटी असते. एकटाच वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे संपूर्ण भार माझ्या खांद्यावर. नुसता भार नाही मानसिक ताण देखील. मी इथेच प्राथमिक आरोग्य केंद्रात राहतो. आम्हाला पुरेशा प्रमाणात ग़्95 मास्क, सॅनिटायजर, ग्लोव्हज् मिळाले नाहीत. मिळाले, परंतु साथ सुरू झाल्याच्या दोन महिन्यानंतर आम्हाला साहित्यांचा पुरवठा झाला. आम्हाला काही सामाजिक संस्थांनी साहित्य दिल्यामुळे आम्ही त्याआधारे काम करू शकलो. एक मनापासून आणि कळकळीची विनंती की टाळ्या-थाळ्या-फुलांपेक्षा आम्हाला आमच्या संरक्षणासाठी आवश्यक साहित्य, औषधे, पुरेसा स्टाफ द्या.
या भागात प्रत्येक टाळेबंदीनंतर शहरात कामासाठी गेलेले गावकरी परतत होते. आत्तापर्यंत या भागात 50 टक्के लोकं बाहेरून आलेली आहेत. या सर्वांची तपासणी तसेच गावा-गावातील विलगीकरण केंद्रात असलेल्या लोकांची तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य व्यवस्थेची म्हणजे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची, पण आमची सुरक्षितता भगवान भरोसे!
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, इथे गावात सर्वच पुढारी म्हणायला हरकत नाही (म्हणजे माजी सरपंच, पो.पा., चेअरमन, अध्यक्ष, तरुण मंडळ, ट्रस्ट त्यांचे नातेवाईक वगैरे). ‘मास्क लावा’ म्हणालं तरी पटायचं नाही, राग यायचा. इथे मास्क लावणे म्हणजे एकच रुमाल दोघा-तिघांनी वापरणे, साडीचा पदर किंवा ओढणी लावणे. एकूण पाच टक्के लोकदेखील इथे मास्क लावत नाहीत. जागृती अजून किती करावी? गांभीर्य नाही. बरं मुद्दा खर्चाचा पण नाही. साधे पर्याय दिले. घरातील जुन्या सुती व स्वच्छ कापडाचा मास्क बनवा, पण तेही नाही. हातात महागडे मोबाईल, टू-व्हीलर, चारचाकी, कडक इस्त्रीचे पांढरे कपडे पण मास्क नाही. आणि दुसरं म्हणजे आजूबाजूच्या गावात कोरोना रुग्ण आढळून आला की पुढचे आठ दिवस गावातल्या मुख्य रस्त्याला झाडाचा मोठ्ठा ओंडका पडला म्हणून समजायचं. गाव का बंद केलंं त्याचं काही लॉजिक नसायचं, गाव बंद करणे ही एक काही लोकांसाठी फॅशन झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. साध्या-सोप्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि अशी टाळेबंदी ठोकायची ही लोकांची मानसिकता माझ्या समजेपलीकडची आहे.
कोविडची साथ संकटकालीन परिस्थितीमध्ये ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टर-नर्स-सफाई कर्मचारी यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरव केला. परंतु जर या योद्ध्यांना साधे मूलभूत साहित्यदेखील पुरवली जात नसतील तर ‘कोविड योद्धा’ म्हणण्यास काही अर्थ नाही. एकीकडे वरून आम्हाला सुविधा-साहित्य मिळत नाही आणि खालून म्हणजे लोकांना आमच्या कामाचे काही महत्त्व वाटत नाही. काहीही आणि कधीही रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी डॉक्टरांनी लोकांच्या सेवेस हजर असावे ही मागणी असते. अशा परिस्थितीमध्ये काम करणे म्हणजे खरंतर तारेवरची कसरतच! असो. पण जीव ओतून केलेल्या कामाचं समाधान नाही हे मात्र नक्की!
आठवड्यातून एक दिवस घरी जातो. भाड्याने घर घेतले आहे तिथे राहतो. आमचं छोटंसं पिल्लू लांबून बघणं ही मोठी आणि कठोर शिक्षा आहे. बाळाला आणि कुटुंबाला भेटता येत नाही, घरी राहता येत नाही.
कुटुंबासाठी लागणारं आठवड्याचं सर्व साहित्य आणि भाजीपाला-औषधं आणून देतो आणि परत रविवारी सकाळी आरोग्य केंद्राच्या वाटेला लागतो.
(डॉक्टर मुलाखतदाराचे नाव गोपनीय ठेवले आहे.) लेखिका ‘साथी’ संस्थेत आरोग्य कार्यकर्ती म्हणून काम करतात.
अनुभव- शकुंतला भालेराव