• मोफत/सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी.. साथी हेल्पलाईन 94 22 32 85 78

कोविड नियंत्रणात यशस्वी ठरलेले ‘धारावी मॉडेल’!

शहरातील झोपडपट्ट्यांवर कोणत्याही साथरोगाचा मोठा परिणाम होत असतो. ‘धारावी’ ही जगातील सर्वात घनदाट लोकवस्ती असलेली झोपडपट्टी आहे. जेथे नऊ लाख लोकसंख्या 535 एकरावर 2.5 कि.मी. चौरस क्षेत्रावर वसली आहे. धारावीमध्ये अनेक साथीच्या रोगांचा (टायफाइड, कॉलरा, कुष्ठरोग, अमीबियासिस आणि पोलिओ) दीर्घकाळ प्रादुर्भाव राहिला आहे…

शहरातील झोपडपट्ट्यांवर कोणत्याही साथरोगाचा मोठा परिणाम होत असतो. ‘धारावी’ ही जगातील सर्वात घनदाट लोकवस्ती असलेली झोपडपट्टी आहे. जेथे नऊ लाख लोकसंख्या 535 एकरावर 2.5 कि.मी. चौरस क्षेत्रावर वसली आहे. धारावीमध्ये अनेक साथीच्या रोगांचा (टायफाइड, कॉलरा, कुष्ठरोग, अमीबियासिस आणि पोलिओ) दीर्घकाळ प्रादुर्भाव राहिला आहे. आजवरचा इतिहास पाहता 1896 मध्ये प्लेगच्या साथीमध्ये धारावीतील जवळपास अर्धी लोकसंख्या मृत्यू पावली होती. तसेच 1986 साली कॉलरा साथीला धारावी सामोरी गेली होती. या सर्व अरिष्टांमधून धारावी मात करून उभी राहिलेली दिसते. हीच बाब आता चालू असलेल्या कोविड 19 च्या साथीमध्ये पाहावयास मिळते.

एप्रिल 2020 मध्ये कोविडचा पहिला रुग्ण धारावीमध्ये सापडला व ही साथ वेगाने वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोविडच्या समुदाय संसर्गाचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला. वेळीच ही साथ आटोक्यात आणली नाही तर भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई धोक्याच्या गर्तेत येईल अशी चिंता सर्वांनाच वाटू लागली. यामुळे धारावी कोविडच्या नियंत्रणासाठी जागतिक केंद्रबिंदू ठरली. धारावीमध्ये कोविड नियंत्रण करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार याची पूर्ण कल्पना आरोग्य यंत्रणेला होती. कारण धारावीची संरचना ही अनेक छोट्या अरुंद गल्ल्यांची आहे. एका घरात सरासरी 8 ते 10 व्यक्ती राहतात. ही घरे दहा बाय दहा फुटाची असून दोन-तीन मजले वर चढवलेले आहेत. बऱ्याच घरांच्या तळमजल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध लघुउद्योग चालतात. धारावीत साधारण 450 सामुदायिक शौचालये असून जवळपास 80 टक्के लोकसंख्या ही या सामुदायिक शौचालयांचा वापर करतात. एक शौचालय अंदाजे 1300 ते 1400 लोक वापरतात. बरेच लोक उदरनिर्वाहासाठी धारावी बाहेरील नागरी व्यवस्थेवर अवलंबून आहेत.

ही सर्व आव्हाने लक्षात घेऊन व येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करून धारावीमध्ये तीन महिन्यात कोविडचे यशस्वीरित्या नियंत्रण केले. एप्रिलमध्ये रुग्ण वाढण्याचा दर 23 वर होता त्यात घट होऊन जूनमध्ये तो केवळ 0.85 वर आला हे नक्कीच उल्लेखनीय आहे. नवीन रुग्णांचा आकडा हा दोन-तीन वर आला आहे. धारावीसारख्या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी होण्याची नोंद ही ‘जागतिक आरोग्य संघटने’ने देखील घेतली.

हे सारे साध्य करण्यासाठी, धारावीत नेमके कोणते धोरण वापरले गेले याबाबत अनेकांना कुतूहल आहे. धारावीमध्ये कोविड नियंत्रित करण्यासाठी रुग्ण शोध, पाठपुरावा, चाचणी आणि उपचार या चतुःसूत्रीचा वापर कोविड 19 संसर्गाची साखळी तोडण्यास केला गेला.

1.     रुग्ण शोध- डॉक्टर आणि खासगी क्लिनिकद्वारे 47,500 कुटुंबांचा कोविड उपचारासाठी समावेश केला गेला. मोबाइल क्लिनिकमध्ये 1497 लोकांचे स्क्रीनिंग केले.

2.     पाठपुरावा- 3.6 लाखाहून अधिक लोकांचे स्क्रीनिंग केले आणि 8246 ज्येष्ठ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

3.     चाचणी- एकूण 13,500 लोकांची चाचणी धारावीमध्ये करण्यात आली.

4.     उपचार- उपचारासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या.

यासोबतच खालील सात प्रकारच्या कृती कार्यक्रमाची कोविड नियंत्रण होण्यास मदत झाली. 

  1. समस्याग्रस्त कृतीशील कार्य

कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय पातळीवर शारीरिक अंतर राखणे आणि लॉकडाऊन यावर भर देण्यात आला. परंतु शारीरिक अंतर राखणे हे धारावीसारख्या भागात शक्य नव्हते. म्हणूनच धारावीमध्ये मुख्य धोरण ठेवण्यात आले ते म्हणजे कोविड रुग्णाचा काटेकोर शोध व त्यांचे विलगीकरण करणे यावर.

2. कोविडविषयी जनजागृती कार्यक्रम

धारावीमध्ये कोविड जनजागृती कार्यक्रमामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. त्याचा फायदा आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड स्क्रीनिंगसाठी झाला. लोक स्वतःहून स्क्रीनिंगसाठी पुढे येऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करत होते. जर कोणत्या रहिवाशामध्ये कोविडची लक्षण आढळून आली तर लोक स्वतःहून विलगीकरण आणि अलगीकरण करण्यासाठी पुढाकार घेत होते.

3. उस्फूर्त स्क्रीनिंग

सरकारी अंदाजानुसार धारावीमध्ये सहा ते सात लाख लोकांचे कोविड स्क्रीनिंग करण्यात आले, त्याचा कोविड नियंत्रणामध्ये खूप मोलाचा वाटा राहिला आहे. सुरुवातीलाच 47,000 कुटुंबांचे स्क्रीनिंग करण्यात आले, त्यापैकी 20 टक्के लोक कोविडबाधित आढळले. या स्क्रीनिंगसाठी पल्स ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरचा वापर करण्यात आला. त्यामुळे कोविडबाधित रुग्ण लवकर ओळखण्यात मदत झाली. या सोबत दैनंदिन सामुदायिक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले. या सर्व कारणांमुळे पहिल्या टप्प्यावरच कोविड संसर्ग नियंत्रित करण्यात मदत झाली.

4. खाजगी डॉक्टर्स व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

धारावीमध्ये 360 खाजगी डॉक्टर्स कार्यरत होते. त्यांनी वस्तीमध्ये, रुग्णांमध्ये जाणीवजागृती वाढविण्याचे काम देखील केले. दुसऱ्या बाजूला विविध स्वयंसेवी संस्था कोविड नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सोबत सहभागी झाल्या होत्या. अनेक स्वयंसेवी संस्थांनी रुग्णांचे स्क्रीनिंग आणि वस्तीमध्ये जाणीवजागृती करण्याचे काम केले. 

5. खाजगी रुग्णालयांचा सहभाग व विलगीकरण केंद्रांची निर्मिती

धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी रुग्णालयांचा सहभाग व विलगीकरण केंद्रांची निर्मिती करण्यात आली. विलगीकरण कक्षांसाठी वस्तीमधील शाळा, सभागृह क्रीडागृहांचा त्वरित वापर करण्यास सुरुवात केली. धारावीलगतची पाच खाजगी रुग्णालये मुंबई महानगरपालिकेने उपचार करण्यासाठी कार्यपद्धतीत सहभागी करून घेतली. धारावीमधील 90 टक्के रुग्णांवर या पाच रुग्णालयात उपचार करण्यात आले.

6. फीव्हर क्लिनिक्स आणि टेस्टिंग केंद्र

धारावीत विविध फीव्हर क्लिनिक्स आणि टेस्टिंग केंद्रांची निर्मिती करण्यात आली. या केंद्रांची मदत पहिल्या टप्प्यावर रुग्णांचे निदान करण्यासाठी झाली. त्यामुळे कोविडचा संसर्ग आणि मृत्यूदर रोखण्यात मदत झाली. सरासरी 7000 टेस्ट या धारावीमध्येच करण्यात आल्या व त्यामधील 2000 टेस्ट या खाजगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या.

7. सक्तीचा कंटेनमेंट प्लॅन

धारावीसाठी तत्काळ कंटेनमेंट धोरण बनवून त्याची सक्तीची अंमलबजावणी करण्यात आली. वस्तीत एखादा रुग्ण आढळल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड बाधित रुग्णाच्या घरातील सर्व सदस्य व संपर्कातील शेजारी यांना घरात राहण्याची सक्ती केली होती. स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने अशा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी तयार जेवण व दैनंदिन लागणाऱ्या किराणा वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे लोक सार्वजनिक ठिकाणी न येता घरातच थांबत होते.

थोडक्यात, धारावीत कोविड नियंत्रणासाठी,

अगदी सुरुवातीच्याच टप्प्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली गेली त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन ते स्वतःहून स्क्रीनिंगसाठी पुढे आले. यामध्ये सर्व स्तरांमधील लोकप्रतिनिधी, सामाजिक स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, वस्ती पातळीवरील विविध मंडळे, प्रशासकीय अधिकारी व विविध क्लब यांचा सहभाग एकत्रित करून ‘धारावी मॉडेल’ यशस्वीपणे राबविण्यात आले. खाजगी इस्पितळांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला.

केरळ पाठोपाठ धारावी मॉडेलमधूनही साथरोग नियंत्रणासाठी लोकांना सहभागी करून घेणे आणि साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आरोग्य यंत्रणेने तत्परतेने, काटेकोरपणे आवश्यक धोरण राबविणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित झाले आहे.  डॉ. दिपक आबनावे हे ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, तुळजापूर’ येथे सार्वजनिक आरोग्य विषयाचे साहाय्यक प्राध्यापक आहेत.

डॉ. दिपक आबनावे