डॉ. रितू परचुरे

कोव्हिड १९ च्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने विशिष्ट काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जसे की तोंडाला मुखपट्टी अर्थात मास्क लावणे, वारंवार साबणाने व सॅनिटायझरने हात धुणे, एकमेकांपासून सहा फुटाचे अंतर पाळणे इत्यादी. सदर लेखात कोव्हिडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण ‘मास्क का, कोणी, कधी, कुठे आणि कसा वापरायचा ?’ याबद्दल बोलणार आहोत.

मास्क का वापरावा?

जगभरातील अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की कोव्हिड १९ चा प्रसार मुख्यतः नाका-तोंडातून उडालेल्या तुषारांमार्फत होतो. मास्क वापरल्याने हा प्रसार बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतो. जेव्हा केव्हा घराबाहेरील व्यक्तीशी किंवा बाहेरून येणाऱ्या घरातील व्यक्तीशी जवळून संपर्क येतो तेव्हा लागण होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे अशा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. सर्व लोकांनी मास्क योग्य प्रकारे वापरला तर साथ नियंत्रणात राहायला बरीच मदत होईल.

मास्क कोणी, कधी व कुठे वापरावा?

सध्याच्या काळात घराबाहेर पडताना मास्क हा आपल्या इतर पेहरावाचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. ऑफिस किंवा कार्यालये, भाजी मंडई, सुपर मार्केट, सार्वजनिक वाहने, लिफ्ट, सार्वजनिक शौचालये, बँक, क्लिनिक्स, अशा सर्व ठिकाणी मास्क वापरावा. एखादा माणूस ओळखीचा तर आहे किंवा एखाद्या माणसाला कुठलीच लक्षणे दिसत नाहीत मग कशाला मास्क घालायचा असा विचार करून, आपण नातेवाईंकाकडे गेल्यावर किंवा मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना, सहकाऱ्यांबरोबर बोलत असताना, फोनवर बोलताना नकळत मास्क गळ्यापाशी उतरवतो. असं करणं चुकीचं आहे. अनेकांना कोव्हिड असूनही त्याची कुठलीच लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येकच वेळी संसर्गाचा धोका असू शकणार अशी खूणगाठ मनाशी बांधून मास्क सतत वापरला पाहिजे. एकत्र जेवताना, चहापाणी करताना मास्क घालणं शक्य नसतं. अशा वेळी एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखायला पाहिजे. शक्यतो एकत्र येण्याचे कार्यक्रम, विशेषतः बंदिस्त ठिकाणी एकत्र येण्याचे कार्यक्रम आवर्जून टाळायला पाहिजेत. जर कोणाच्या घरात कोव्हिड रुग्ण असेल, किंवा लागण झाल्याची शंका असेल तर अशी व्यक्ती, रुग्णांची काळजी घेणारे, रुग्णांच्या घरातील इतर नातेवाईक किंवा रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्ती अशा सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे.

मास्क कसा वापरावा?

सुती कपड्याचा मास्क वापरत असाल तर तो कमीत कमी तीन पदरी असावा. इलॅस्टिक आणि दोरी असलेले असे दोन्ही प्रकारचे मास्क येतात. दोरी असल्यास नीट बांधावी. वरची दोरी कानावरून डोक्यावर आणि खालची दोरी मानेच्या मागे बांधावी. इलॅस्टिक असल्यास ते पुरेसे घट्ट/आपल्या मापाची आहे ना बघावे, सैल नसावे. खूप सैल किंवा खूप घट्ट मास्क वापरू नये. सैल मास्क नाकावरून खाली घसरतो. खूप घट्ट मास्क असेलं तर श्वास घ्यायला अडचण येते आणि मग बोलताना मास्क सारखा खाली घेतला जातो. काही लोक मास्क बऱ्याचदा नाकाखाली ठेवतात. त्यामागे कारणं असू शकतात. गुदमरतं किंवा बोलताना अडचण होते किंवा मास्क सैल असतो वगैरे. पण मग अशाप्रकारे मास्क वापरण्याचा फारसा उपयोगच होत नाही.

मास्क घालताना नाक, तोंड आणि हनुवटी सर्व व्यवस्थित झाकले जाईल ह्याची काळजी घ्यायला हवी. नाक आणि गालाकडचा भाग उघडा राहत नाही ना ह्याकडे लक्ष द्यायला हवे. एकदा मास्क घातल्यावर सतत वर खाली करू नये, बोलत असताना नाकाच्या खाली किंवा गळ्यात लटकवून ठेवू नये. सुती मास्क रोजच्या रोज धुऊन आणि वाळवूनच वापरले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाकडे मास्कचे ३-४ संच असणे केव्हाही चांगले. खराब किंवा ओला झालेला मास्क वापरू नये. स्वत:चा मास्क स्वत:च वापरावा, इतरांचा मास्क वापरू नये.

डिस्पोजेबल मास्कचा वापर पुन्हा पुन्हा अजिबात करू नये. मास्क काढताना तो आधी मागच्या बाजूने सैल करावा आणि काढावा. मास्क काढताना मास्कच्या बाहेरील भागाला हात लावू नये. मास्क काढल्यावर हात साबण पाण्याने लगेचच धुवावेत. एकदा वापरलेला मास्क साबणाने धुऊन, पूर्ण वाळल्यावरच पुन्हा वापरावा.

• मास्क जर कोव्हिड पेशंट / पेशंटची काळजी घेणारे / पेशंटच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीने वापरलेले असतील तर अशा वेळी १% सोडियम हायपोक्लोराइट द्रावण वापरून मास्कचे निर्जंतुकीकरण करावे किंवा कागदी पिशवीमध्ये ७२ तास ठेवून नंतर त्याची विल्हेवाट नेहमीच्या कचऱ्यात करता येईल.

• व्यायाम करत असताना काही वेळेला मास्कमुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्यामुळे मास्क न घालता असे व्यायाम करायचे असतील तर समूहाने किंवा एकत्रितपणे व्यायाम करण्याचे टाळावे.

मास्क तर वापरायचा आहेच पण बरोबरीने वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवणे, साबणाने हात वरचेवर धुणे, बंद खोलीत खूप वेळ एकत्र बसायचे टाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे ह्यासारख्या गोष्टी पुढील काही काळ तरी नियमितपणे करत राहाव्या लागणार आहेत. ही सर्व काळजी पण सर्वांनी घेतली तरच कोव्हिडपासून आपला बचाव व्हायला तसेच कोव्हिडची साथ नियंत्रणात आणायला मदत होईल.

डॉ. रितू परचुरे ‘प्रयास आरोग्य गट’, पुणे येथे ‘सिनिअर रिसर्चर’ म्हणून काम करतात.

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

[pvcp_1]

This image has an empty alt attribute; its file name is Footer_Vedh-Arogyacha-1-1024x138.jpg

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.