करोना आणि घरेलू कामगारांची व्यथा

मेधा थत्ते

Photo source – she the woman, The woman’s channel 

“कशी ही महामारी आली. झोप उडाली. भूक मेली, उदासी दाटली! भीती इतकी की घाबरून मरतो असे वाटले. या महामारीने आमच्या पाठीवर तर मारलेच मारले! पोटावरही मारले. कष्ट करणारे हात थंड पडले. गती गेली माणसांची. रोगाचा कहर माजला. कच्ची-बच्ची पंखाखाली घेऊन दिवस काढायची वेळ आली होती. काढले ते दिवस. पण वनवास कधी संपेल ते कळत नाही.’’ अशा उद्गारांनी घरेलू कामगार बोलतात.

घरेलू कामगार अतिशय हतबल आहेत. जी बाई करोनापूर्वी सात-आठ घरी जाऊन घरकाम करायची, ती सध्या एक किंवा दोन कामे करत आहे. ती सांगते “मालकिणीकडे मे महिन्यानंतर दर पंधरा दिवसांनी गेले. कधी फोन केले. पण नकार मिळत राहतो.’’ नवे कामही मिळत नाही. तगमग होते. करणार काय?’’

बहुसंख्य घरेलू कामगारांचे काम गेले आहे. काम परत मिळेल अशी त्यांना आशा आहे. पण खात्री नाही. घर प्रपंच कसा चालवायचा ही काळजी त्यांच्या मनाला खात राहते. या काळजीने रोग लागायचा ही धास्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. ज्या वस्त्यांमध्ये घरेलू कामगार राहतात त्या सर्व वस्त्या कष्टकऱ्यांच्या आहेत. हॉटेल कामगार, बांधकाम मजूर, प्लंबर, रंगकाम करणारे पेंटर, रिक्षावाले, भाजी विकणारे, दुकानात काम करणारे, वॉचमन अशी कामे करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या वस्त्या आहेत. ते सर्वजण मार्च २२ च्या लॉकडाऊननंतर घरात बसलेली आहेत. काम केले तर कमाई होईल. त्यावर घर प्रपंच चालेल. ते सगळेच ठप्प झाले. बचत बाहेर काढा आणि ती संपवून जीवन जगवा अशी वेळ आली आहे. पण बचत छोटी होती ती वर्षभर पुरेल हे शक्य नाही.

वंदना सांगते, “तिची दोन्ही मुलं पाच वर्षांपेक्षा लहान आहेत. नवरा हॉटेल कामगार आहे. ती चार घरी घरकामाला जात होती. झोपडपट्टीत ती भाड्याच्या खोलीत राहते. एप्रिलपासून ती आणि तिचा नवरा घरात बसून आहेत. गेले सहा-सात महिने घरातच आहेत.’’ ती म्हणते, “मला खूप खजील व्हावे लागते. घरमालक ‘भाडे द्या’ असा तगादा लावतो. काय सांगू. ‘थांबा दादा देऊ देऊ!’ सांगतो, ‘कामाला गेलो की पहिलं तुमचं देऊ’ सांगतो. किराणामाल दुकानदार विचारतो, ‘किती दिवस उधारी?’ ‘देऊ देऊ’ सांगतो. ‘कामाला गेलो की फेडू उधारी’ म्हणतो. काय सांगणार? विज बिल थकलयं त्याचं टेन्शन येतं. भाज्या कधीतरी आणतो. भागवतो आहोत कसंतरी’’ वंदना सांगते, ‘‘बचत संपली. उसनंपासनं काही थोडं मिळालं. त्यावर जगलो. पण थकलेलं घरभाडं, किराणा बिल, विज बिल, टोचत राहतं. झोप लागत नाही.’’ तिच्या बोलण्यात अजिजी आहे. काम मिळेल का याची ती सतत चाचपणी करते.

राहायला भाड्याचे घर असणाऱ्या घरेलू कामगार स्त्रियांची संख्या अंदाजे 20 टक्के होईल. 50 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे परिसरात 80 हजार घरेलू कामगार असावेत ह्या अंदाजाने 16,000 घरेलू कामगार भाड्याच्या घरात राहतात. त्या सर्वांची स्थिती कमी-अधिक प्रमाणात बिकट आहे. उधारी, उसनवारी याने त्यांचा जीव मेटाकुटीस आलाय.

सुवर्णा सांगते, “गणपती नंतर नवरा कामाला जायला लागला. ती स्वतः करोनापूर्वी पाच घरी कामाला जायची. आता फक्त एका घरी जाते. नवऱ्याचा पगार त्याच्या मालकाने निम्मा केला. आता त्याला 5,000 रुपये महिना काम करावे लागते. तक्रार करायची काही सोय नाही. तिची कामे परत मिळायची वाट बघत आहे.’’ केवळ वाट पाहत राहणे हेच सुवर्णाच्या हातात राहिले आहे.’’

लताबाई म्हणाली, “आमच्या घरी दुष्काळात तेरावा महिना आला. त्या 50 वर्षाच्या आहेत. मुलगा एका कंपनीत काम करतो. नवरा वॉचमन आहे. एप्रिलनंतर दसऱ्यापर्यंत दोघेही घरात बसलेले आहेत. त्यांना पेशंट सांभाळायचे काम मिळाले होते. ते चालू राहिले. पण या सहा महिन्यात घरात आजारपणाने बेजार केले. नवरा घरात जिन्यावरून पडला. त्याच्या पायाला, कमरेला फ्रॅक्चर झाले. एप्रिलमध्ये त्यांना दवाखान्यात न्यायला ॲम्बुलन्सही मिळाली नाही. रिक्षाही मिळेना. तेव्हा कडक लॉकडाऊन होता. कशीबशी रिक्षा मिळाली. एका खाजगी हॉस्पिटलात नेले. तिथे अवाच्या सव्वा बिल आले.’’

लताबाई सांगतात, “त्याच वेळी मुलगाही आजारी पडला. त्याचे पोट दुखायचे. निदान करायला दोन-तीन डॉक्टरांकडे गेलो. माझ्या मुलाचा धीर सुटत चालला. मी, माझी सून त्याला जपायचो. आम्ही या दोघांचे औषधपाणी केले. घरातलं सगळं सोन विकून टाकलं. सुनेचं गंठण गेलं. माझ्या कानातल्या कुड्या गेल्या. गळ्यातली सोन्याच्या मण्यांची पोत गेली. काय करणार माणसं वाचवलीत हे मोठं काम केलं. करोनात या पुरुष माणसांची कमाई झिरो झाली. त्यात आजारपण मोठं. जगून निघालो जिंकलो.’’

घरातील कोणालातरी आजाराने पीडलं असं सांगणाऱ्या अनेक घरेलू कामगारांच्या डोळ्यात पाणी भरून येते. रिक्षा, बस नाही, बाहेर जाता येत नाही. मोठा आजार, मोठा खर्च. 5 टक्के किंवा 10 टक्के व्याजाने कर्ज काढावं असं सांगणाऱ्या अनेक जणी भेटल्यात. काही जणींनी असे 50 हजार रुपये तर काहींनी एक लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे. हे फेडायला कामं मिळाली तर पुढची काही वर्षे खर्ची पडतील असं त्या सांगतात.

काही जणी खाजगी किंवा इंग्लिश मीडियम शाळेत मुलांना शिकवतात. या शाळांना फी माफ नाही. शाळेत जायचे नाही, ऑनलाईन शाळा झाली. पण फी भरावी लागली. त्याचा तगादा चालू आहे. ‘अपमान वाटतो पण मजबुरी आहे!’ असे अनेक जणी सांगतात. स्मार्टफोन ज्यांच्या घरी नाही त्यांच्या मुलांची शिकण्याची संधी हुकते आहे असे वाटते.

घरात पूर्वीपासून आपसातील वादविवाद होते. या करोनाच्या लॉकडाऊनमध्ये ते इतके वाढले की हमरीतुमरीवर आले. पोलीस चौकीत कुणीच कर्मचारी नसायचे. सर्व पोलीस  बंदोबस्तासाठी गेलेले असायचे. घरात स्त्रियांना मारहाण वाढली पण तक्रार करायला ठिकाणा नाही. बेवड्यांना दारू हवी असायची. त्यासाठी ते घरात धिंगाणा करायचे. खूप जास्त पैसे देऊन दारू प्यायचे. त्यासाठी घरात चोऱ्या, हाणामारी, वस्तू गहाण ठेवणे असे सारे चालायचे. ‘कमाई झिरो बेवड्या बनला गमाईचा हिरो’ असे घडले.

या सगळ्या संकटात एप्रिलमध्ये रेशनवर गहू, तांदूळ मोफत मिळाले. नोव्हेंबरपर्यंत सर्व रेशनकार्डवर धान्य मिळाले. ही मदत उपयोगी पडली असे सर्वजणींनी सांगितले. अनेक संस्थांनी जीवनावश्यक किराणामालांची किट्स तयार करून वाटलीत. काही जणींना दिलासा मिळाला हेही आवर्जून सांगितले. अनेक वस्त्यांमध्ये कार्यकर्ते मदत करण्यात तत्पर होते; असे जाणवले. रोज ताप मोजणे, ऑक्सिजन पातळी मोजणे हे काम ते करायचे. आजाऱ्यांना, करोनाग्रस्तांना मदत करायचे. पुणे मनपानेही मोफत उपचार, ॲम्ब्युलन्सची मदत केली. हाही मोठा दिलासा होता. उपचार मोफत मिळाले हे महत्त्वाचे ठरले.

घरेलू कामगार महिला म्हणतात, “आमची पूर्वीची कामे परत मिळायला पाहिजे. या सहा-सात महिन्यात सर्वांनाच कर्ज काढावे लागले. ते फेडण्यासाठी सरकारने आर्थिक मदत किमान दहा हजार रुपये महिना द्यावी. घरमालकाने भाडे थकले म्हणून बाहेर काढता कामा नये असा बंदोबस्त केला पाहिजे. दिवाळीचा बोनस सर्व मालकिणींनी द्यावा. सर्वच शाळांमधील शिक्षण मोफत करा. दिवाळीसाठी रेशनवर साखर, रवा, मैदा, तूप, डाळी या वस्तूंचा पुरवठा करा.

(अनेक घरेलू कामगारांना अजूनही मदतीची नितांत गरज आहे. या गरजूंना मदतीसाठी आपण मेधा थत्ते – 9422530186 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.)

मेधा थत्ते, पुणे शहर मोलकरीण संघटना 

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

[pvcp_1]

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.

कोव्हिडची दुसरी लाट : भारत आणि इतर देश!

सुबोध जावडेकर

भारतात कोव्हिड-19 आटोक्यात येत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला भारतात नऊ लाख रुग्ण कोव्हिडग्रस्त होते. आता ही संख्या सहा लाखांपेक्षा कमी झाली आहे. मृत्यूचा दर १.२ टक्क्यावरून ०.४ टक्क्यावर घसरला आहे. पण जगात मात्र कोव्हिडचं प्रमाण खूप वाढत आहे.

अमेरिकेत जुलैमध्ये आलेली दुसरी लाट ऑगस्टमध्ये ओसरू लागली होती. पण ती पूर्ण ओसरायच्या आत सप्टेंबरच्या सुरुवातीला तिसरी लाट आली. ती  त्याहीपेक्षा मोठी आहे आणि अजून वाढतच आहे. दुसऱ्या लाटेत तिथं कोव्हिडच्या रोज जास्तीत जास्त ७५,००० नव्या केसेस समोर येत होत्या.  सध्या रोज ९०,००० केसेस येत आहेत. भारतात हल्ली रोज ५०,००० पेक्षाही कमी नव्या केसेस आढळून येतात. अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या पावपट आहे. हे लक्षात घेतलं तर अमेरिकेत कोव्हिडचा प्रादुर्भाव भारताच्या तुलनेत किती मोठा आहे हे लक्षात येईल.

युरोपमधली स्थिती तर आणखीनच वाईट आहे. सोबत जोडलेल्या आलेखात एक लाख लोकसंख्येमागे गेल्या चौदा दिवसात किती नव्या केसेस आल्या ते दाखवलं आहे. त्यात दिसून येईल की फ्रांसमध्ये दर लाख लोकांमागे गेल्या चौदा दिवसात जवळपास ७०० नव्या केसेस आल्या. ऑक्टोबरच्या सुरुवातीला त्या फक्त २५० होत्या. यावरून तिथं किती भयानक प्रमाणात हा रोग वाढत आहे ते समजेल. त्या खालोखाल स्पेन (४९०), अर्जेन्टिना (४४०), यु.के. (४३०) हे देश आहेत. अर्जेन्टिनामध्ये तो काहीसा स्थिरावला असला तरी बाकी देशात वेगाने वाढत आहे.

भारतात हे प्रमाण कधीच १०० च्या वर गेलं नव्हतं. आता तर ते उताराला लागून ७० च्या आसपास आलं आहे. पण आपल्याला गाफील राहून चालणार नाही. फ्रांस, यु. के. आणि स्पेनमध्ये जून-जुलैमध्ये हे प्रमाण जवळजवळ शून्यावर आलं होतं पण ते किती पटकन प्रचंड वाढलं ते पहा.

भारतात टेस्ट्स कमी होतात, त्यामुळे भारतात हा रोग उताराला लागल्यासारखा असं दिसतं, असा आक्षेप काहीजण घेतात. पण ते खरं नाही. भारतातल्या टेस्ट्सची आकडेवारी पाहिली तर टेस्ट्स कमी होत आहेत असं दिसत तरी नाही. त्यामुळे भारतात कोव्हिड कमी होत आहे यात शंका घ्यायला जागा नाही. पण त्यामुळे आनंदून जाऊन सगळे निर्बंध टाकून दिले तर पश्चात्तापाची पाळी येऊ शकेल. याचं कारण कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेची भीती तज्ज्ञांना वाटते.

त्यांना ही भीती वाटते कारण ऑक्टोबर महिन्यात युरोपमधील सर्व देशात कोव्हिडचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गेल्या आठ महिन्यात युरोपमधल्या देशात कोव्हिडने हातपाय कसे पसरले यावर एक नजर टाकली तर या भीतीमागचं कारण लक्षात येईल.

ऑस्ट्रिया- ऑस्ट्रियात मार्च-एप्रिलमध्ये एक लाट येऊन गेली होती. त्यावेळी एका दिवसात जास्तीत जास्त १००० रुग्ण आढळत असत. पुढे हे प्रमाण कमी होऊन जून-जुलैमध्ये जवळपास शून्यावर आलं होतं. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ते हळूहळू वाढत गेलं आणि ऑक्टोबरमध्ये फार झपाट्याने वाढलं. सध्या त्या देशात कोव्हिडचे दररोज सुमारे ५,५०० रुग्ण सापडत आहेत.

बेल्जियम – या देशाची स्थितीसुद्धा पुष्कळ अंशी ऑस्ट्रियासारखीच आहे, मार्च-एप्रिलमध्ये एक लाट येऊन गेली होती. त्यावेळी एका दिवसात जास्तीत जास्त १५०० रुग्ण आढळत असत. तिथंही हे प्रमाण कमी होऊन जून-जुलैमध्ये जवळपास शून्यावर आलं होतं. सप्टेंबरपासून हळूहळू वाढत गेलं आणि ऑक्टोबरमध्ये फारचं झपाट्याने वाढलं. इतकं की सध्या तिथे दररोज तब्बल २०,००० ते २५,००० रुग्ण सापडत आहेत.

डेन्मार्क –  एप्रिलमध्ये आलेल्या लाटेत डेन्मार्कमध्ये रोज जास्तीत जास्त तीन-चारशे कोव्हिड रुग्ण सापडत असत. जून-जुलैमध्ये ही संख्या शंभरपर्यंत घटली होती. पण सप्टेंबरपासून वेगाने वाढू लागली आणि ऑक्टोबरच्या उत्तरार्धात रोज हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत.

फ्रांस – मार्च-एप्रिलमध्ये आलेल्या पहिल्या लाटेत पीकवर असताना रोज चार-पाच हजार नवे रुग्ण आढळत होते. जून-जुलैमध्ये हे प्रमाण कमी होऊन जवळपास शून्यावर आलं होतं. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ते हळूहळू वाढत गेलं आणि ऑक्टोबरमध्ये फार झपाट्याने वाढलं. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या देशात कोव्हिडचे दररोज तब्बल ५०,००० रुग्ण सापडत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दहापट!

जर्मनी – जर्मनीची स्थितीसुद्धा पुष्कळ अंशी फ्रांससारखीच आहे, मार्च-एप्रिलमध्ये एक लाट येऊन गेली होती. त्यावेळी एका दिवसात सुमारे ५,००० ते ७,००० रुग्ण आढळत असत. हे प्रमाण कमी होऊन जून-जुलैमध्ये रोज हजारपेक्षा कमी झालं होतं. सप्टेंबरपासून ते वाढू लागलं आणि ऑक्टोबरमध्ये फारच झपाट्याने वाढून दररोज १५,००० ते २०,००० झालं. ऑक्टोबर अखेरीस ते थोडं कमी होऊन सध्या रोज सुमारे १२,००० रुग्ण सापडत आहेत.

इटली – इटलीत फेब्रुवारीपासूनच कोव्हिडचे रुग्ण सापडू लागले. ते झपाट्याने वाढून मार्च अखेरीस रोज ७,००० पेक्षा रुग्ण आढळू लागले. ते हळूहळू कमी होऊन जून-जुलै-ऑगस्टमध्ये नवे रुग्ण सापडायचं प्रमाण खूप कमी झालं. सप्टेंबरमध्ये ते पुन्हा वाढू लागलं आणि ऑक्टोबरमध्ये अतिशय वेगाने वाढलं. महिन्याभरात चक्क पंधरापट वाढून  २,००० वरून आता थेट ३०,००० वर गेलंय.

स्पेन, पोर्तुगाल – या देशांची कहाणीही काही वेगळी नाही. मार्च-एप्रिलमध्ये पहिली लाट,  मे-जूनमध्ये ती ओसरणं, जुलै-ऑगस्टमध्ये दुसऱ्या लाटेची सुरुवात आणि ऑक्टोबरमध्ये ती प्रचंड प्रमाणात वाढणे. ही दुसरी लाट पहिलीच्या मानाने बरीच मोठी असते. दुसऱ्या लाटेत सध्या आढळणारे रुग्ण पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट असणं हा पॅटर्न नॉर्वेमध्येही दिसतो. फक्त रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे. 

युरोपियन देशात दिसणारा हा पॅटर्न भारतात तर दिसणार नाही ना या गोष्टीची चिंता तज्ज्ञांना वाटते आहे. युरोप सोडून इतर देशांमध्ये कोव्हिड संदर्भात काय स्थिती आहे त्यावरही एक नजर टाकूयात.

अमेरिका आणि भारताखालोखाल कोव्हिडचा प्रादुर्भाव ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये पहिली लाट एप्रिलमध्ये आली. जुलै-ऑगस्टमध्ये तिनं शिखर गाठलं. रोज साठ हजार रुग्ण! मग ती लाट उताराला लागून सध्या तिथं रोज पंधरा-वीस हजार रुग्ण सापडत आहेत.

त्या खालोखाल नंबर लागतो रशियाचा. तिथं पहिली लाट मेमध्ये आली. रोज दहा हजार रुग्ण तेव्हा आढळत होते. ते कमी होऊन ऑगस्टमध्ये ही संख्या पाच हजारावर आली. पण सप्टेंबरमध्ये दुसरी लाट आली. सध्या तिथं रोज सतरा-अठरा हजार रुग्ण सापडत आहेत. आणि ही संख्या कमी व्हायची लक्षणं दिसतं नाहीयेत.

युरोपमधले देश सोडले तर मग नंबर येतो अर्जेन्टिनाचा. तिथं मेपासून कोव्हिडचे रुग्ण सापडायला लागले आणि ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येने शिखर गाठलं. रोज पंधरा-वीस हजार रुग्ण. गेल्या दोन आठवड्यात मात्र तिथं हा रोग झपाट्यानं उताराला लागून सध्या रोज दहा हजारापेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत.

अर्जेन्टिनापाठोपाठ नंबर लागतो कोलंबियाचा. तिथंही सुरुवात मेमध्ये झाली आणि ऑगस्टमध्ये शिखर गाठलं. रोज बारा-तेरा हजार रुग्ण. मग काहीसा उताराला लागला पण ऑक्टोबरमध्ये पुन्हा वाढू लागला. सध्या पुन्हा रोज दहा हजार रुग्ण मिळताहेत. दुसऱ्या लाटेचं शिखर पहिल्या लाटेच्या वर जातं आहे की आता तिथं रोगाची साथ उताराला लागते ते पाहायचं. मग येतो मॅक्सीको. तिथं गेले सहा महिने रोज चार ते आठ हजार रुग्ण सापडत आहेत. फार वाढतही नाहीत आणि कमीही होत नाहीत.

साउथ आफ्रिकेमध्ये मात्र दुसरी लाट आली नाही (निदान आजपर्यंत!). जून-जुलैमध्ये आलेली पहिली लाट उताराला लागून गेले दोन महिने रुग्णसंख्या दोन हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. इराणमध्ये पहिली लाट एप्रिलमध्ये आली. त्यावेळी तीन हजाराचं शिखर गाठल्यावर रोग उताराला लागला. पण मेमध्ये पुन्हा वाढून रोज दोन-अडीच हजार रुग्ण आढळू लागले. ही पातळी सप्टेंबरपर्यंत स्थिर राहिली पण ऑक्टोबरमध्ये पुन्हा झपाट्याने वाढून सध्या रोज आठ हजार रुग्ण सापडत आहेत. इराकमध्ये गेले चार-पाच महिने रोज तीन ते पाच हजार रुग्ण सापडत आहेत. तिथंही रोग फार झपाट्याने वाढत नसला तरी उतारालाही लागलेला नाही.

भारताच्या पूर्वेकडचे देश बघितले तर इंडोनेशियात कोव्हिड एप्रिलपासून हळूहळू वाढत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्यानं चार हजाराची पातळी गाठली. गेल्या आठवड्यात मात्र तो थोडा कमी होऊ लागलाय. सध्या रुग्णसंख्या अडीच हजार. मलेशियाचा आलेख मात्र हुबेहूब युरोपियन देशांसारखा आहे. मार्च-एप्रिलमध्ये पहिली लाट. मग दोन-तीन महिने नगण्य रुग्णसंख्या. सप्टेंबरपासून अचानक उसळी घेऊन दुसरी लाट. ऑक्टोबरमध्ये बाराशेची पातळी. तोच पॅटर्न. मॅनमारची वेगळीच तऱ्हा. जूनपर्यंत तिथं कोव्हिड अजिबात नव्हतं. पण ऑगस्टपासून हळूहळू वाढत जाऊन ऑक्टोबरच्या मध्याला दोन हजारचे शिखर गाठलं. मात्र आता काहीसा उताराला लागून हा रोग हजाराच्या आसपास स्थिरावला आहे. बांगलादेशची स्थिती तुलनेनं बरी म्हणावी लागेल. जूनमध्ये चार हजारची पातळी गाठल्यावर गेले दोन महिने रोज हजार-दीड हजारवर रुग्णसंख्या स्थिरावली आहे.

पश्चिमेकडे सौदी अरेबियाची स्थितीही इतकी वाईट नाही. जूनमध्ये पाच हजाराचं शिखर गाठल्यावर रोग हळूहळू उताराला लागला आणि सध्या रोज दोन-अडीचशे रुग्ण आढळत आहेत. नेमका हाच पॅटर्न पाकिस्तानमध्येही दिसतो आहे. जूनमध्ये सहा हजाराचं शिखर, मग पुढील दोन महिन्यात उताराला लागून सध्या हजाराच्या आतबाहेर रुग्णसंख्या. 

थोडक्यात, या रोगाच्या प्रादुर्भावाबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही. कुठे खूप जास्त कुठे कमी. पण कमी झाला तरी पूर्णपणे कुठं नाहीसा झालेला नाही. अमेरिकेत तिसरी लाट आली आहे आणि ती पहिलीच्या तिप्पट आणि दुसरीच्या दीडपट मोठी आहे. युरोपमध्ये, रशियात आणि मलेशियात पहिली लाट ओसरल्यावर दोन तीन महिन्यांनी दुसरी आली आहे. आणि ती पहिल्यापेक्षा खूपच जास्त तीव्र आहे. ब्राझील, अर्जेन्टिना आणि साउथ आफ्रिकेत मात्र एक लाट उताराला लागली. दुसरी आली नाही. बांगलादेश, सौदी अरेबिया, पाकिस्तानमध्येही जवळपास हाच पॅटर्न दिसतोय.

भारत कुठला पॅटर्न फॉलो करेल? आशा करूया की आपण युरोप-अमेरिकेच्या रस्त्यानं जाणार नाही. दुसरी लाट येणार नाही.

दुसरी लाट टाळता येऊ शकेल. पुरेशी काळजी घेतली तर ते अशक्य नाही. मात्र खूप सावधगिरी मात्र बाळगावी लागेल. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सतत हात धूत राहणे इत्यादी नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. अजून काही दिवस तरी अत्यावश्यक असल्याशिवाय बाहेर न पडणे, गर्दी न करणे हे पथ्य कटाक्षाने पाळावं लागेल.

जमेल हे आपल्याला? जमावावेच लागेल.

सुबोध जावडेकर हे सुप्रसिद्ध लेखक असून त्यांच्या विज्ञानकथा व विज्ञानविषयक लेखन लोकप्रिय आहे.

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

[pvcp_1]

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.

कोव्हिडच्या सावटात गेलेला दुर्दैवी जीव!

डॉ. विपिन खडसे                 

मेळघाट, जिल्हा – अमरावती. कुपोषण व बाल-मातामृत्यूंसाठी कुप्रसिद्ध भाग. ‘महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल (महान)’च्या माध्यमातून डॉ. अशिष सातव यांची टीम या दुर्गम आदिवासी भागात कार्यरत आहे. सध्या आरोग्य सेवांची वानवा असलेल्या या भागात कोव्हिड चाचणीची सुविधा उपलब्ध व्हायलाही अक्षम्य दिरंगाई झाली त्यामुळे उद्भवलेल्या एका दुर्दैवी मृत्यूची ही हकिगत. अशा घटनांना ‘महान’ने पटलावर आणलं. परिणामी आता मेळघाटमध्ये करोना चाचणी होत आहे…

लॉकडाऊन सुरू झालं तेव्हाची ही घटना. अनिल हा मेळघाटातील एक मजूर. या भागातील अनेकांसारखाचं अनिल मोलमजुरीसाठी विस्थापन करत असे. पण काही कारणाने तो लॉकडाऊनपूर्वीच गावी परतला. परिणामी लॉकडाऊनमध्ये तो परगावी अडकला नाही किंवा गावी यायला त्याला पायपीटही करावी लागली नाही या अर्थाने तो सुदैवी. पण तो मेळघाटात होता म्हणूनच केवळ दुर्दैवी ठरला.

अनिल अचानक आजारी पडला. त्याला ताप, सर्दी व छातीत दुखी असा त्रास जाणवू लागला. अनिलच्या भावाने त्याला धारणीमधील खासगी डॉक्टरांकडे नेलं. या डॉक्टरांनी अनिलला वेदनाशामक औषधं दिली नि सलाईन चढवलं. आराम वाटल्याने अनिल घरी आला.

पण दुसर्‍याच दिवशी अनिलला रक्तस्राव, थंडी नि ताप जाणवू लागला. श्वास घेणंही कठीण झालं. त्याच दिवशी जनता कर्फ्यू जाहीर झालेला. बातम्यांमध्ये सातत्याने करोनाबद्दल बोललं जात होतं. त्यामुळे अनिलच्या भावाला ही करोनाचीच लक्षणं वाटली. त्याने अनिलला धारणीतील उपजिल्हा रुग्णालयात नेलं. येथील डॉक्टरांनाही करोनाचीच शंका आली. कारण अनिलला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याची ऑक्सिजन लेव्हलही (SPO2) पन्नास टक्क्यांवर आलेली. त्यामुळे अनिलला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवणं डॉक्टरांना आवश्यक वाटलं. पण अमरावतीच्या शासकीय दवाखान्यात पेशंटला पाठवायचं तर हे अंतर धारणीपासून किमान चार तासांचं. अनिलची अवस्था तर नाजूक होती. त्यामुळे अनिलला आमच्या ‘महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल’मध्ये आणलं गेलं.

अनिल करोनाचा संशयित रुग्ण होता. असा पेशंट आणला जाणार असल्याची सूचना मिळाल्याने आम्ही पूर्वतयारी केली. हा अगदीच सुरुवातीचा काळ असल्याने कोव्हिड रुग्णांसाठीच्या मूलभूत सुविधांचे निकषही ग्रामीण भागातील रुग्णालयांपर्यंत पोहोचले नव्हते. पण आमच्याकडे व्हेंटिलेटरची सुविधा आहे. त्यामुळे आम्ही किमान तयारीत होतो.

पेशंटला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, प्राथमिक केस हिस्टरीवरून आम्हालाही करोनाचीच शंका आली. सुदैवाने आमच्याकडे पीपीई कीट होते. डॉक्टर्स व स्टाफची सुरक्षितता महत्त्वाची होती. आम्ही पीपीई कीट अंगावर चढवला. पेशंटला लागलीच ऑक्सिजन सपोर्ट दिला. त्यामुळे त्याच्यात सकारात्मक बदल दिसू लागले. अनिलची ऑक्सिजन लेव्हल वाढली पण त्याला श्वास घ्यायला फारच त्रास होत होता. पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंतच्या अवस्थेचा आम्ही आढावा घेतला. त्याची लक्षणे व श्वास घेण्यातील आत्यंतिक अडचणी पाहता आम्ही प्राथमिक इलाज तर केलेले पण अशा रुग्णांना तातडीने अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचे शासकीय आदेश होते. आमच्यासमोर पर्यायच नव्हता.

आम्ही अनिलला व्हेंटिलेटर लावलेला. त्यामुळे त्याची ऑक्सिजन लेव्हल चांगलीच सुधारली. ती  आता 92% झालेली. डॉ. अशिष सातवही सातत्याने पेशंटकडे लक्ष ठेवून होते. अनिल अधिक स्थिर झाला. मग आम्ही त्याचा ईसीजी घेतला. या चाचणीतून त्याला हृदयाशी निगडित आजार जाणवला. अनिलला आतापर्यंत सलाईनही भरपूर दिलं गेलं होतं त्यामुळेही त्याच्या फुफ्फुसात सूज असावी असाही आमचा अंदाज होता. आम्ही केलेल्या चाचण्या व काढलेल्या निष्कर्षांना येथे विस्ताराने लिहित नाही.

अनिलची ऑक्सिजन लेव्हल सुधारत होती नि आवश्यक चाचण्यांवरून आमच्याकडेच त्याच्यावर उपचार शक्य होते इतपत नोंदवणे सर्वसामान्य वाचकांसाठी पुरेसं आहे. पण लक्षणांवरून त्याची करोना चाचणी आवश्यक होती. ती सुविधा मेळघाटमध्ये कुठेही नव्हती. त्यासाठी पेशंटला अमरावतीलाच न्यावं लागणार होतं. आम्ही 108 नंबरला फोन करून रुग्णवाहिका मागवली. या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर होता. त्यामुळे अनिल अमरावतीला पोहोचेपर्यंत स्थिर राहील याची शाश्वती वाटली. पण रुग्णवाहिकेसोबत आलेल्या डॉक्टरांना पेशंटला व्हेंटिलेटर सपोर्ट कसा द्यायचा याची माहिती नव्हती. आम्ही त्या नवशिक्या डॉक्टरांना आवश्यक ती माहिती दिली. आता पेशंट सुरक्षित होता. आम्ही निर्धास्त झालो.

पेशंटची रवानगी जिल्हा रुग्णालयात झाली नि आमच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. आम्ही भानावर आलो. मेळघाटमध्ये ‘रेस्परेटरी डिस्ट्रेस केसेस’ हाताळण्याची अगदीच तुटपुंजी सुविधा आहे! या विचाराने आम्ही अस्वस्थ झालो. अशी अस्वस्थता मेळघाटमध्ये आम्हाला नेहमीच घेरते. यावेळी तिला करोनाची पार्श्वभूमी होती.

अनिल अमरावती जिल्हा रुग्णालयापर्यंत व्यवस्थित पोहोचला. त्याला तिथे विलगीकरण कक्षात ठेवलं गेलं. आमच्या जिवात जीव आला. पण दुसर्‍याच दिवशी अनिल गेल्याची वाईट बातमी आली. त्याची करोना चाचणी निगेटिव्ह आलेली. अनिलची करोना चाचणी मेळघाटमध्येच झाली असती तर तो नक्की वाचला असता. त्याला आयसीयू केअरमध्ये ठेवून सहज वाचवता आलं असतं. पण कोव्हिड चाचणीची सुविधाचं नव्हती त्यामुळे त्याच्यावर उपचार करता आले नाहीत. ही बाब आमच्यासाठी शरमेची व खेदाची होती. त्याचं कुटुंब, गाव-समाज नि देशानं एका जिवाला नाहक गमावलं. आम्ही हतबल होतो.

अनेक प्रश्न फेर धरून नाचू लागले. मेळघाटातील अनेक मजूर मोठमोठ्या शहरांमध्ये पोटासाठी जातात. करोनामुळे हे गरीब लोक अनेक यातायात करून गावी परतलेत. यांना केवळ करोना चाचणीची सुविधा नाही म्हणून पुन्हा शहराठिकाणी पाठवणं योग्य आहे का? मेळघाटमध्ये वाहतुकीच्या सुविधा नाहीत, डोंगरदर्‍यातून हॉस्पिटलपर्यंत पोहचतानाच अनेक गंभीर रुग्णांचा मृत्यू होतो. आम्हाला हेही अजून माहीत नव्हतं की लॉकडाऊनमुळे अशा किती रुग्णांची गैरसोय झालेली? कित्येकांनी रुग्णालयांच्या वाटेवर प्राण सोडले? मेळघाटमध्ये करोना चाचणी कधी सुरू होणार? या प्रश्नांनी आम्ही बैचेन झालो. 

मेळघाटात प्रतिकूल परिस्थिती आहे पण तरीही येथे रुग्णसेवेला आम्ही डॉक्टर मंडळी तयार आहोत. पण इथे मनुष्यबळाचा प्रश्न फारच तीव्र आहे. मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण आमच्याकडे येऊ लागले तर त्यांना अमरावतीला पाठवण्यासाठी पुरेशी वाहन सुविधाही नाही. अपुर्‍या संसाधनांमुळे आम्ही डॉक्टरही रुग्णांना सेवा देताना धास्तावलो आहोत! डॉक्टरही ‘हाय रिस्क’वर आहेत!! मग गरीब रुग्णांना जिल्ह्याच्या दवाखान्यातच पाठवायचं का? अमरावतीला पाठवलेल्या कुपोषित बाळाचं प्रेत पुन्हा गावी आणण्याइतकेही पैसे या भागातील लोकांकडे नसतात. प्रेताला गावी आणण्यासाठी शववाहिनीचं भाडं परवडत नाही, केवळ म्हणून या भागातील लोक जिल्ह्याच्या रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. ‘खिशात केवळ दहा रुपये आहेत, आपल्या प्रियजनाचं पार्थिव गावी कसं न्यावं?’ अशा जीवघेण्या विवंचनेतील लोक आम्ही पाहिलेत.

या पार्श्वभूमीवर ‘करोना चाचणी मेळघाटमध्ये व्हायलाच हवी’ या विचाराने आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. ‘महान’च्या टीमने सातत्याने तीन महिने पाठपुरावा केला. परिणामी आता मेळघाटमध्ये करोना चाचणी सुरू झाली आहे. आशा आहे आता अनिल सारख्या दुर्दैवी जीवांना आपले प्राण गमवावे लागणार नाहीत. 

डॉ. विपिन खडसे हे अमरावती जिल्ह्यातील ‘महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल (महान)’ येथे डॉक्टर म्हणून काम करतात.

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

[pvcp_1]

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.

होम क्वारंटाईन म्हणजे काय?

होम क्वारंटाईन म्हणजे काय? याबद्दल माहिती देत आहेत ‘कोरोना विरोधी जन अभियान’चे डॉ. अरुण गद्रे.

तेव्हा वेध आरोग्याच्या YouTube चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा.

चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करा.    आणि आपल्या कमेंट्स नक्की द्या.

 

[pvcp_1]

This image has an empty alt attribute; its file name is Footer_Vedh-Arogyacha-1-1024x138.jpg

कोव्हिड टेस्ट आणि विलगीकरण समज – गैरसमज

डॉ. अनंत फडके

 ‘करोना’ची म्हणजेच ‘कोव्हिड’ची लागण झाली आहे का हे पाहण्यासाठी आता काही वस्त्यांमध्ये आरोग्य खात्याचे कर्मचारी येऊन कोव्हिड-टेस्ट करत आहेत. रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांना त्यांच्या घरीच वेगळ्या खोलीत अलग राहायला ते सांगतात. हे शक्य नसलेल्यांना सरकारच्या ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये १४ दिवस दाखल करतात. असे दाखल करायला काही ठिकाणी गैरसमजापोटी विरोध होतो आहे. काही ठिकाणी या विरोधी अफवाही पसरल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या चाचण्या करणं आणि ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये काही जणांना दाखल करणं याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे ते थोडक्यात समजावून घेऊयात.

कोव्हिडची लागण झालेल्यांचे लवकरात लवकर निदान होण्याची फार गरज असते. एक तर कोव्हिडची लागण झालेल्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून त्यांच्यापैकी कोणामध्ये काही गंभीर गुंतागुंत झाली तर ती वेळेवर ओळखून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येते. दुसरे म्हणजे कोव्हिडची लागण झालेल्यांना इतरांपासून वेगळे ठेवले म्हणजे विलगीकरण केले तर इतरांचा लागणीपासून बचाव होतो. जेव्हा कोव्हिडची लागण झालेल्याला वेगळ्या खोलीत ठेवण्याइतके घर मोठे नसते तेव्हा त्याला दहा ते चौदा दिवस सरकारी कोव्हिड-केंद्रात ठेवण्याची गरज असते. थोडक्यात ही चाचणी करणे आणि गरज असल्यास लागण झालेल्याला सरकारी कोव्हिड-केंद्रात भरती करणे हे नागरिकांच्या हिताचे आहे.

टेस्ट करतात म्हणजे काय करतात?

तर कापूस गुंडाळलेल्या निर्जंतुक काडीने नाक आणि घशातील स्रावाचा नमुना (स्वाब) घेतात आणि त्यावर टेस्ट करून रिपोर्ट देतात. कुटुंबाच्या आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण करायला हवे. या टेस्टविषयी असा गैरसमज पसरला आहे की कोव्हिडची लागण न झालेल्या माणसाला तो कोव्हिड-पॉझिटिव्ह आहे असे खोटे सांगून त्याला विनाकारण कोव्हिड-सेंटरमध्ये दाखल करतात. यामागे कोव्हिड-सेंटरचे कॉन्ट्रॅक्टर, भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे कारस्थान आहे असा आरोप केला जातो. खरी परिस्थिती अशी आहे की कोव्हिड बाबतचे खोटे रिपोर्ट दिले जात नाहीत. मात्र आरोग्य-खात्याने केवळ तोंडी नव्हे तर लेखी रिपोर्ट द्यायला हवा. नाहीतर ‘खोटे रिपोर्ट’चे आरोप होतच राहतील.

या टेस्ट बाबत दुसरी तक्रार म्हणजे पहिल्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर दुसरी ‘पीसीआर’ नावाची टेस्ट करायला सांगतात आणि ती मात्र अनेकदा पॉझिटिव्ह येते. त्यामुळे या टेस्ट करण्याबाबत काहीतरी गडबड आहे असे अनेकांना वाटते. हा गैरसमज का आहे हे थोडक्यात समजावून घेऊयात.

वस्त्यांमध्ये जाऊन आरोग्य-कर्मचारी करत असलेल्या टेस्टला ‘रॅपिड अँटीजेन-टेस्ट’ म्हणजे ‘जलद-टेस्ट’ असे म्हणतात. तिचा फायदा असा की तिचा रिपोर्ट लगेच, अर्ध्या तासात मिळतो. पण तिची मर्यादा अशी की कोव्हिड-लागण असूनही टेस्ट झालेल्यांपैकी अर्ध्या लोकांच्या बाबतीत रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोव्हिड-लागण झाली असण्याची शक्यता खूप आहे आणि त्याचे निदान ताबडतोब करायची गरज आहे अशा वेळी ही जलद टेस्ट केली जाते. उदा. समजा एखाद्यामध्ये दम लागण्यासारखी गंभीर कोव्हिड-आजाराची लक्षणे आहेत पण पीसीआर टेस्ट केलेली नाही. या पेशंटला कोव्हिड-वॉर्डमध्ये दाखल करण्याआधी ही जलद-टेस्ट करतात. किंवा समजा एखाद्या वस्तीत करोनाच्या खूप केसेस सापडल्या आहेत. अशावेळी त्या वस्तीतल्या आणखी ज्यांना लागण झाली आहे अशांना लगेच हुडकून लगेचच इतरांपासून वेगळे करण्याची गरज असते. तेव्हा अशा वस्तीतील लोकांची रॅपिड टेस्ट करतात. तसेच ती निगेटिव्ह येऊनही डॉक्टरांना वाटले की या व्यक्तीला कोव्हिडची लागण झाली आहे तर दुसरी, अधिक खात्रीलायक पीसीआर टेस्ट करतात. पण तिचा रिपोर्ट मिळायला एक-दोन दिवस लागतात. वरील सर्व बाबी लक्षात घेता जलद टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला पण दुसऱ्या पीसीआर टेस्टचा पॉझिटिव्ह आला तर त्याबाबत संशय घेऊ नये.

तिसरे म्हणजे ‘कोव्हिड केअर सेंटर’ मधून रुग्णाला घरी परत पाठवायच्या आधी आता पुन्हा टेस्ट करत नाहीत यामुळेही काही जण संशय घेतात. पण तज्ज्ञ सांगतात की, ‘लक्षणे दिसल्यापासून १० दिवसांनी बहुसंख्य रुग्णांकडून इतरांना लागण होण्याचे बंद होते’.

एकंदरित पाहता हे लक्षात घ्यायला हवे की ज्या वस्त्यांमध्ये कोव्हिडचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत तिथे शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये ही जलद टेस्ट जरूर केली पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त कोव्हिड-बाधित व्यक्तीचे लवकरात लवकर निदान होईल. त्यांना योग्य वेळेत सल्ला देणं, औषधे देणं हे करता येईल. तसेच त्यांना इतरांपासून लगेच अलग राहायला सांगून कोव्हिडच्या प्रसाराला आळा घालायला मदत होईल. हे लक्षात घेता सर्वांनी आपल्या भागा/वस्तीमध्ये येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करायला हवे.

डॉ. अनंत फडके हे ‘जन आरोग्य अभियान, महाराष्ट्रा’चे समन्वयक आहेत.

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

[pvcp_1]

This image has an empty alt attribute; its file name is Footer_Vedh-Arogyacha-1-1024x138.jpg

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.

‘होम क्वारंटाईन’बद्दल थोडे महत्त्वाचे…

डॉ. अरूण गद्रे

क्वारंटाईन / विलगीकरण’ म्हणजे काय?

जर एखादी व्यक्ती कोव्हिड – 19ने आजारी असलेल्या व्यक्तीच्या सहवासात आली असेल आणि जरी तिला काही त्रास नसला तरी तिला घरात किंवा घरी शक्यच नसेल तर सरकारने सोय केलेल्या ठिकाणी सतरा दिवस इतर माणसांपासून वेगळे ठेवतात. त्याला ‘क्वारंटाईन / विलगीकरण करणे’ असे म्हणतात.

जर एखादी व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह असेल आणि तिला सौम्य त्रास असेल तर तिला आपल्या घरात किंवा सरकारने सोय केलेल्या ठिकाणी आयसोलेशनमध्ये ठेवतात.

या व्यक्तींपासून इतरांना संसर्ग होऊ न देणे आणि करोनाची साखळी तोडणे हा याचा मुख्य उद्देश असतो.

आपण यापुढे ‘क्वारंटाईन अथवा विलगीकरण / आयसोलेशन’ यासाठी ‘क्वारंटाईन’ हा शब्द वापरणार आहोत.

जिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्या व्यक्तीमध्ये दहा दिवसात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि त्यानंतर तिच्यापासून दुसर्‍या व्यक्तीला करोनाची लागण होत नाही. म्हणून सरकारी सोय जिथे असते तिथून त्या व्यक्तीला दहा दिवसांनी घरी सोडतात. तसेच बहुसंख्य व्यक्ती सतरा दिवसात ताप/ खोकला/ अशक्तपणा यातून बाहेर पडतात व त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हायचे दहा दिवस अधिक सात दिवस खबरदारी म्हणून असा क्वारंटाईनचा सतरा दिवसांचा कालावधी असतो.

क्वारंटाईनचा अजून हा उपयोग असा आहे की कोव्हिड पॉझिटिव्ह पेशंटवर लक्ष ठेवणे आणि गरज भासल्यास त्याला तत्काळ हॉस्पिटलला हलवणे.

कुणाला क्वारंटाईन केले जाते?

• ज्या व्यक्ती दुसर्‍या ‘कोव्हिड – 19 बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आल्या आहेत,  मग त्यांना त्रास असो वा नसो. त्यांची टेस्ट झाली नसली तरी.

• कोव्हिडची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे; ज्यांना ताप खोकला आहे पण गंभीर लक्षणे नाहीत असे पेशंट.

कोव्हिड – 19साठी क्वारंटाईन / विलगीकरण आपआपल्या घरात करू शकतो का?

जर तुमचं घर तुम्ही एका खोलीत स्वतंत्रपणे २४ तास एकटे राहू शकत असाल एवढं मोठं असेल तर. आणि टॉयलेटही स्वतंत्र आहे तर तुमचे क्वारंटाईन घरात अगदी सहज होऊ शकते नव्हे तसेच करावे. एकच काळजी घ्यायची. तुमचा संपर्क इतरांना होऊ नये. पण जर ते शक्यच नसेल तर मात्र सरकारने सोय केलेल्या ठिकाणी, क्वारंटाईन करावे.

कृपया आमच्या घरात सोय आहे असे खोटे सांगून आरोग्य यंत्रणांना फसवू नका. तुम्ही तुम्हाला स्वतःलाच फसवत आहात हे लक्षात घ्या. घरी विलगीकरणाची सोय करता येत नसली तरी घरी थांबताना आपल्यामुळे आपल्या घरच्यांना -शेजारच्यांनाच कोव्हिडची लागण होणार आहे हे लक्षात घ्या. म्हणून घरी सोय होत नसेल तर सरकारने जिथे सोय केली आहे तिथे जा.

आपल्या घरात विलगीकरण करताना ही काळजी घ्यावी.

• आजारी व्यक्ती व इतर सर्वांनी सतत मास्क लावायला हवा. (कापडी मास्क)
• दर आठ तासांनी मास्क बदलायचा आहे. मास्कऐवजी तीन पदरी रुमाल/ कापड चालेल.
• आजारी व्यक्तीने वापरलेला मास्क तसेच त्या व्यक्तीने वापरलेले कपडे तसेच त्या व्यक्तीच्या जेवणाची भांडी साध्या साबण पाण्यात पंधरा वीस मिनिटे बुडवून ठेवली तर ते कपडे इतर कपड्यांबरोबर साबणाने धुता येतात. (कोव्हिडचा व्हायरस साबण पाण्यात पटकन मरून जातो.)
• आजारी व्यक्तीने त्याच्या खोलीतच जेवण घ्यावे. दिवसभर वेगळ्या खोलीत आणि संध्याकाळी कंटाळा आला म्हणून टीव्ही बघायला इतरांबरोबर असं नको.
• आजारी व्यक्ती एकटीच घरात नको. एक तरी इतर व्यक्ती आजारी माणसावर लक्ष ठेवायला आजूबाजूला हवी. किंवा ऐनवेळी कुणीतरी धावून येईल अशी व्यवस्था हवी.

व्यक्ती घरात क्वारंटाईन असताना एकच बाथरूम संडास कसे वापरता येईल?

शक्यतो क्वारंटाईन / विलगीकरण घरी केले गेले तर त्या माणसाला वेगळी रूम, बाथरूम वा टॉयलेट असावी. पण भारतात अशी चैन काहींनाच शक्य आहे. मग त्या कुटुंबात एकच बाथरूम व संडास कसा वापरायचा?

बाथरूम व संडासमध्ये ब्लिचिंग पावडर घातलेल्या पाण्याची (1 % सोडियम हायपोक्लोराईट याचे पाच लिटरचे कॅन उपलब्ध असतात) वेगळी बादली ठेवावी. ज्याला क्वारंटाईन/ विलगीकरण केले आहे त्याने ती बाथरूम व संडास वापरण्याआधी आणि नंतर (जमीन, कडी, नॉब व भिंती) या पाण्याने धुऊन घ्याव्यात. क्वारंटाईन/ विलगीकरण केलेल्या व्यक्तीने जाता-येता इतरांपासून कमीत कमी सहा फूट अंतर राहील हे बघावे.

काय झाले तर क्वारंटाईनमधल्या व्यक्तीला तत्काळ कोव्हिड सेंटरला घेऊन जायचे?

• श्वास घ्यायला त्रास होणे/ दम लागणे.
• छातीत दुखू लागणे, दाब वाटू लागणे.
• गुंगी येणे/ शक्तीपात झाल्यासारखे वाटणे.
• ओठ, हाताची नखे निळसर पडणे.
• जर पल्स ऑक्सीमीटर असेल तर,

– 94 वा त्या खाली रीडिंग येणे.
– चार पाचने रीडिंग खाली जाणे (नेहमी समजा 98 असेल आणि ते 94 झाले तर),
– खोलीतल्या खोलीत सहा मिनिटे चालून जर रीडिंग चार पाचने कमी झाले तर.

डॉ. अरूण गद्रे हे ज्येष्ठ स्रीरोग तज्ज्ञ व लेखक आहेत.

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

[pvcp_1]

This image has an empty alt attribute; its file name is Footer_Vedh-Arogyacha-1-1024x138.jpg

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.

‘कोव्हिड टेस्ट आणि विलगीकरण’ समज गैरसमज

कोव्हिडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांना सरकारच्या ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये १४ दिवस दाखल करायला काही ठिकाणी गैरसमजापोटी विरोध होतो आहे. काही ठिकाणी त्याच्या विरोधात अफवाही पसरल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या चाचण्या करणं आणि ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये  याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे ते थोडक्यात समजावून सांगत आहेत ‘करोनाविरोधी जन अभियान’चे डॉ. अनंत फडके. 

तेव्हा वेध आरोग्याच्या YouTube चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा.

चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करा.    आणि आपल्या कमेंट्स नक्की द्या.

[pvcp_1]

This image has an empty alt attribute; its file name is Footer_Vedh-Arogyacha-1-1024x138.jpg

मास्क का व कसा वापरावा?

डॉ. रितू परचुरे

कोव्हिड १९ च्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने विशिष्ट काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जसे की तोंडाला मुखपट्टी अर्थात मास्क लावणे, वारंवार साबणाने व सॅनिटायझरने हात धुणे, एकमेकांपासून सहा फुटाचे अंतर पाळणे इत्यादी. सदर लेखात कोव्हिडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण ‘मास्क का, कोणी, कधी, कुठे आणि कसा वापरायचा ?’ याबद्दल बोलणार आहोत.

मास्क का वापरावा?

जगभरातील अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की कोव्हिड १९ चा प्रसार मुख्यतः नाका-तोंडातून उडालेल्या तुषारांमार्फत होतो. मास्क वापरल्याने हा प्रसार बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतो. जेव्हा केव्हा घराबाहेरील व्यक्तीशी किंवा बाहेरून येणाऱ्या घरातील व्यक्तीशी जवळून संपर्क येतो तेव्हा लागण होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे अशा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. सर्व लोकांनी मास्क योग्य प्रकारे वापरला तर साथ नियंत्रणात राहायला बरीच मदत होईल.

मास्क कोणी, कधी व कुठे वापरावा?

सध्याच्या काळात घराबाहेर पडताना मास्क हा आपल्या इतर पेहरावाचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. ऑफिस किंवा कार्यालये, भाजी मंडई, सुपर मार्केट, सार्वजनिक वाहने, लिफ्ट, सार्वजनिक शौचालये, बँक, क्लिनिक्स, अशा सर्व ठिकाणी मास्क वापरावा. एखादा माणूस ओळखीचा तर आहे किंवा एखाद्या माणसाला कुठलीच लक्षणे दिसत नाहीत मग कशाला मास्क घालायचा असा विचार करून, आपण नातेवाईंकाकडे गेल्यावर किंवा मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना, सहकाऱ्यांबरोबर बोलत असताना, फोनवर बोलताना नकळत मास्क गळ्यापाशी उतरवतो. असं करणं चुकीचं आहे. अनेकांना कोव्हिड असूनही त्याची कुठलीच लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येकच वेळी संसर्गाचा धोका असू शकणार अशी खूणगाठ मनाशी बांधून मास्क सतत वापरला पाहिजे. एकत्र जेवताना, चहापाणी करताना मास्क घालणं शक्य नसतं. अशा वेळी एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखायला पाहिजे. शक्यतो एकत्र येण्याचे कार्यक्रम, विशेषतः बंदिस्त ठिकाणी एकत्र येण्याचे कार्यक्रम आवर्जून टाळायला पाहिजेत. जर कोणाच्या घरात कोव्हिड रुग्ण असेल, किंवा लागण झाल्याची शंका असेल तर अशी व्यक्ती, रुग्णांची काळजी घेणारे, रुग्णांच्या घरातील इतर नातेवाईक किंवा रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्ती अशा सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे.

मास्क कसा वापरावा?

सुती कपड्याचा मास्क वापरत असाल तर तो कमीत कमी तीन पदरी असावा. इलॅस्टिक आणि दोरी असलेले असे दोन्ही प्रकारचे मास्क येतात. दोरी असल्यास नीट बांधावी. वरची दोरी कानावरून डोक्यावर आणि खालची दोरी मानेच्या मागे बांधावी. इलॅस्टिक असल्यास ते पुरेसे घट्ट/आपल्या मापाची आहे ना बघावे, सैल नसावे. खूप सैल किंवा खूप घट्ट मास्क वापरू नये. सैल मास्क नाकावरून खाली घसरतो. खूप घट्ट मास्क असेलं तर श्वास घ्यायला अडचण येते आणि मग बोलताना मास्क सारखा खाली घेतला जातो. काही लोक मास्क बऱ्याचदा नाकाखाली ठेवतात. त्यामागे कारणं असू शकतात. गुदमरतं किंवा बोलताना अडचण होते किंवा मास्क सैल असतो वगैरे. पण मग अशाप्रकारे मास्क वापरण्याचा फारसा उपयोगच होत नाही.

मास्क घालताना नाक, तोंड आणि हनुवटी सर्व व्यवस्थित झाकले जाईल ह्याची काळजी घ्यायला हवी. नाक आणि गालाकडचा भाग उघडा राहत नाही ना ह्याकडे लक्ष द्यायला हवे. एकदा मास्क घातल्यावर सतत वर खाली करू नये, बोलत असताना नाकाच्या खाली किंवा गळ्यात लटकवून ठेवू नये. सुती मास्क रोजच्या रोज धुऊन आणि वाळवूनच वापरले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाकडे मास्कचे ३-४ संच असणे केव्हाही चांगले. खराब किंवा ओला झालेला मास्क वापरू नये. स्वत:चा मास्क स्वत:च वापरावा, इतरांचा मास्क वापरू नये.

डिस्पोजेबल मास्कचा वापर पुन्हा पुन्हा अजिबात करू नये. मास्क काढताना तो आधी मागच्या बाजूने सैल करावा आणि काढावा. मास्क काढताना मास्कच्या बाहेरील भागाला हात लावू नये. मास्क काढल्यावर हात साबण पाण्याने लगेचच धुवावेत. एकदा वापरलेला मास्क साबणाने धुऊन, पूर्ण वाळल्यावरच पुन्हा वापरावा.

• मास्क जर कोव्हिड पेशंट / पेशंटची काळजी घेणारे / पेशंटच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीने वापरलेले असतील तर अशा वेळी १% सोडियम हायपोक्लोराइट द्रावण वापरून मास्कचे निर्जंतुकीकरण करावे किंवा कागदी पिशवीमध्ये ७२ तास ठेवून नंतर त्याची विल्हेवाट नेहमीच्या कचऱ्यात करता येईल.

• व्यायाम करत असताना काही वेळेला मास्कमुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्यामुळे मास्क न घालता असे व्यायाम करायचे असतील तर समूहाने किंवा एकत्रितपणे व्यायाम करण्याचे टाळावे.

मास्क तर वापरायचा आहेच पण बरोबरीने वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवणे, साबणाने हात वरचेवर धुणे, बंद खोलीत खूप वेळ एकत्र बसायचे टाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे ह्यासारख्या गोष्टी पुढील काही काळ तरी नियमितपणे करत राहाव्या लागणार आहेत. ही सर्व काळजी पण सर्वांनी घेतली तरच कोव्हिडपासून आपला बचाव व्हायला तसेच कोव्हिडची साथ नियंत्रणात आणायला मदत होईल.

डॉ. रितू परचुरे ‘प्रयास आरोग्य गट’, पुणे येथे ‘सिनिअर रिसर्चर’ म्हणून काम करतात.

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

[pvcp_1]

This image has an empty alt attribute; its file name is Footer_Vedh-Arogyacha-1-1024x138.jpg

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.

कोव्हिडशी सामना.. कसोटीचा पण यशस्वी ठरलेला…

एका कोव्हिडग्रस्त रुग्णाचा अनुभव

सुमन पुजारी

मी सुमन पुजारी. गेली १७ दिवस कोव्हिडचा अत्यंत भीषण असा अनुभव घेऊन मी घरी परतले आहे. हा काळ माझ्यासाठी जीवन मरणाचा होता. शरीराला आणि मनालाही असंख्य वेदना झाल्या. आपलं जगणं किती मोलाचे आहे हे मत्यूच्या दरवाजावरून परतल्यानंतर मला कळले. एक प्रकारे माझा हा पुनर्जन्मच झालाय. मागच्या सात आठ महिन्यांपासून कोव्हिड बद्दलच्या बातम्या मी ऐकत होते. याची काळजी कशी घ्यायची हे मला माहिती होते. तरीही त्या विषाणूने कुठल्या तरी बेसावध क्षणी मला गाठले आणि माझ्यासोबत माझ्या आप्तस्वकीयांची जणू परीक्षाच त्याने घेतली. मात्र ही लढाई जिंकण्यात आम्ही यशस्वी झालो याचे समाधान आहे.

..आणि कोव्हिडची लागण झाली

५ सप्टेंबरचा तो शनिवारचा दिवस नेहमीसारखाच उजाडला.  त्या दिवशी ‘आशा वर्कर्स संघटने’ची जिल्हा परिषदेवर निदर्शने होते. त्याची मी तयारी करीत होते. सकाळी आशा सांगलीत जमत असल्याचा निरोप मला मिळत चालला होता. आज आंदोलनात काय करायचे याची जुळवाजुळव सुरू झाली होती. आणि साडेदहाच्या सुमारास मला श्वास घ्यायला त्रास होतोय असे वाटायला लागले. मी कॉम्रेड शंकर पुजारींना याबद्दल सांगितले. त्यांनी मला धीर दिला आणि काही डॉक्टरांशी बोलायला सुरुवात केली. मी डॉक्टरांना काय होतय हे थोडक्यात सांगितले. त्यांनी मला पुण्यातील मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. कॉम्रेड शंकर यांनी आशांच्या आंदोलनाची जबाबदारी घेतली आणि मी रुग्णालयात जायचे ठरवले. माझी मुलगी शरयू आणि जावई विशाल बडवे यांनी मला रुग्णालयात भरती केलं. सुदैवानं तिथं बेड उपलब्ध होता. किमान सहा दिवस राहावे लागेल असे त्यांनी मला भरती होताना सांगितले. त्यामुळे काही दिवस इथंच राहावे लागणार याची मानसिक तयारी माझी झाली होती. मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काहीच वेळात मला ऑक्सिजन लावण्यात आला. इतर वेळा आपल्या निसर्गात असणारा मुबलक ऑक्सिजन आपल्याला जीवंत ठेवत असतो, त्याची किंमत मला आता कळायला लागली होती. त्या दिवशी रात्रभर मी तळमळत होते. आठवणींचा, माझ्या माणसांचा विचार करणे सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लेक शरयू मोबाईलचा चार्जर देण्यासाठी आली आणि देऊन निघून गेली. ती जाण्यासाठी मागे वळली तेव्हाही मला पुन्हा पुढचे काही आठवडे भेटणारचं नाही अशी शंकादेखील मनाला शिवली नाही. त्यानंतर जो काही तिच्याशी संपर्क होता तो मोबाईलच्या माध्यमातून. 

तब्येत ढासळतच गेली..

पहिले दोन दिवस मी ऑक्सिजनच्या साहाय्याने प्रकृती सुधारण्याच्या मागे होते. दरम्यान माझी सीटी स्कॅन करण्याचे ठरले होते. त्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णवाहिका उभी होती. तिथपर्यंत जाण्यासाठी व्हिलचेअर मिळाली नाही आणि त्यामुळे मला चालत जावे लागले. रुग्णवाहिकेमधून आम्ही जिथे पोहोचलो तिथेही मला चालतच जावे लागले. परिणामी माझी धाप वाढली. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये परतले होते तेव्हा माझा त्रास वाढला होता. बेडवर पडल्यानंतर काही वेळाने मला शौचाला जावे लागले. मी तिथल्या मावशींना तसे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘समोरच आहे टॉयलेट, जाऊन या’. मी चालत गेले. काही वेळानंतर मला कमोडवरून उठताच येत नव्हते. कशीबशी मी बेसीनपर्यंत पोहोचले आणि मला तिथे झटका लागल्यासारखे झाले. तो मला आलेला स्ट्रोक होता. टॉयलेटचा दरवाजा उघडाच असल्यामुळे तिथले कर्मचारी धावत आले. त्यांनी मला व्हिलचेअरवरून बेडपर्यंत आणले. त्यानंतर काही काळ मला काहीच आठवायचे बंद झाले. मला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यात किती वेळ गेला हे मला आठवत नाही. पण मला जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या नाका तोंडावर व्हेंटिलेटर होते. त्यातूनच माझा श्वासोच्छवास सुरू होता. आता हाच व्हेंटिलेटर पुढचे अनेक दिवस माझ्या तोंडावर राहणार असल्याची कल्पना मला नव्हती. या काळात माझे शरीर अत्यंत थंड पडत चालले होते. माझ्या रक्तात गुठळ्या तयार होऊ शकत होत्या. ज्यामुळे तो खूप मोठा धोका होता. मला फारसा खोकला नव्हता पण उबळ यायची. एकदा रक्तही आले. व्हेंटिलेटर सलग तीन-चार तास असायचे. त्यानंतर थोडेसे पाणी दिले जायचे. सततच्या व्हेंटिलेटरमुळे माझ्या तोंडात अजिबात लाळ जमा होत नव्हती. दिवसभरात मला तीस इंजेक्शन्स लावण्यात आली होती.

त्यानंतर पुजारींनी पुण्याच्या डॉ. अनंत फडके आणि कोल्हापूरचे डॉ. शरद भुताडिया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी, मी ज्या रुग्णालयात दाखल होते तेथील डॉक्टरांशी ओळख काढण्याचा सल्ला दिला, ओळख काढण्यात आली. सदर डॉक्टर कॉम्रेड शंकर यांना ओळखत होते. पेशंट क्रिटिकल असल्याचे त्यांनी सांगितले पण डॉक्टरांनी बराच धीर दिला. माझी प्रकृती स्थिर होती. सुधारणा होण्याची शक्यता होती. माझी काळजी घेणारे केवळ कुटुंबातलेच नाहीत तर याच हॉस्पिटलमधील ही डॉक्टर मंडळी, नर्स, ब्रदर्सही आहेत याची जाणीव झाली. खचायचे नाही, हेच प्रत्येकजण सांगत होता. एके दिवशी मला खूप भरून आले. माझ्या डोळ्यातले पाणी पाहून एक मावशी म्हणाल्या, ‘तुम्ही बऱ्या होऊन घरी जाव्यात, म्हणूनच आम्ही काम करतोय.’

‘टोसीलीझँब’ इंजेक्शन ठरले वरदान!

आणखी एक उपाय म्हणून ‘टोसीलीझँब’ नावाचे इंजेक्शन द्यावे लागणार होते. मात्र या इंजेक्शनचे साईड इफेक्ट्सही होते. यातून शरीरातील इम्यूनिटी खूप वाढवली जाते आणि ती कमी करण्यासाठी काही वेळानंतर दुसरी दोन इंजेक्शन्स् द्यावी लागणार होती. टोसीलीझँब या इंजेक्शनची किंमत ४० हजार ५०० होती. याचे किती डोस द्यावे लागणार याची कल्पना कुणालाच नव्हती. दुसरे म्हणजे या इंजेक्शनचा तुटवडा होता. अखेर हे इंजेक्शन देण्याचा निर्णय माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतला. बऱ्याच प्रयत्नानंतर हे इंजेक्शन सांगलीत उपलब्ध झाले आणि अखेर रात्री बारा वाजता मला हे इंजेक्शन देण्यात आले. त्या रात्री माझी लेक शरयू आणि जावई विशाल रात्रभर हॉस्पिटलच्या बाहेर जीव मुठीत धरून बसले होते. हे इंजेक्शन दिल्यानंतर माझ्यावर नेमका काय इफेक्ट झालाय याची धास्ती त्यांना होती.

सकाळी जाग आली तेव्हा मला बरे वाटू लागले होते. मी सहाच्या सुमारास शरयूला फोन केला. मला बरे वाटत असल्याचे सांगितल्यानंतर तिच्या आवाजात झालेला बदल मला आनंद देणारा होता. तू आता नक्की बरी होऊन बाहेर येणार असे ती म्हणाली. त्यानंतर डॉक्टरांनी टोसीलीझँब इंजेक्शनचा आणखी डोस देण्याचे ठरवले आणि पुढील ट्रिटमेंट सुरू झाली. याचा चांगला परिणाम माझ्या प्रकृतीवर होत होता. खूप अशक्तपणा होता. अंगात त्राण उरले नव्हते. असे दहा बारा दिवस गेले. हळूहळू माझ्या तब्येतीत सुधारणा होत गेली.

कोव्हिड योद्ध्यांना सलाम !

१७ दिवसांच्या खडतर उपचारानंतर मला डिस्चार्ज मिळाला. या काळात माझ्या वॉर्डमधील अनेकांनी प्राण सोडला. एखादा पेशंट दगावल्यानंतर आतमध्ये जी आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ होते ती जीवघेणी असते. आपण केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश न आल्याचे शल्य डॉक्टरांसह सर्वांनाच असते. त्यांच्या पीपीई कीटच्या आतमध्ये त्यांचे पाणावलेले डोळे कुणाला दिसत नाहीत. ही माणसं आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत. त्यांचे मनोबल टिकवणे खूप गरजेचे आहे. आयुष्यात निसर्गाइतकेच प्राण वाचवण्याचे काम हे कोव्हिड योद्धे करीत आहेत. त्यांच्या या समर्पण वृत्तीला माझा सलाम.

रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे मी वाचले. या काळात माझे नातेवाईक, चळवळीतील असंख्य कार्यकर्ते, अनेक ज्ञात अज्ञातांनी माझ्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानते. आता माझी तब्येत सुधारत आहे. अशक्तपणा आहे. पुढचे काही दिवस मला विश्रांती घ्यावी लागणार आहे. मी पुन्हा लवकरच चळवळीच्या कामासाठी सक्रिय होईन याची मला खात्री आहे. तुम्हीही कोरोनापासून स्वतःला दूर ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. लढेंगे, जितेंगे!!!

संबंधित डॉक्टर व रुग्णालयाचे नाव गोपनीय ठेवले आहे.

सुमन पुजारी ह्या ‘महाराष्ट्र आशा वर्कर्स’ व ‘गटप्रवर्तक संघटना (आयटक)’च्या जनरल सेक्रेटरी आहेत.

[pvcp_1]

लेखात व्यक्त केली गेलली मते लेखकाची स्वतःची वैयक्तिक मते असून ‘वेध आरोग्याचा’चे संपादन मंडळ त्यासोबत सहमत असेलच असे नाही.

This image has an empty alt attribute; its file name is Footer_Vedh-Arogyacha-1-1024x138.jpg

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.

साथीच्या माध्यमातून अन् कार्यकर्तीच्या प्रयत्नातून झाली जनजागृती आणि काकड कुटुंबाला रेशन रूपात मिळाली हक्काची रोजी रोटी..!

बेबीताई कुरबुडे
फिल्ड समन्वय- ज्योती शेळके

कोरोनाची सगळीकडे साथ पसरली आणि मार्च २०२० अखेरीस संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आला. मोठमोठेच नाहीच तर लहान उद्योगधंदे देखील बंद झाले. गोरगरिबांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीमध्ये सरकारने गोरगरीब लोकांना अन्नधान्य सहज आणि पुरेशा प्रमाणात मिळावे या हेतूने रेशनच्या योजनेत थोडासा बदल केला. त्यानुसार अंत्योदय, केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य तसेच विकतचे धान्य यामध्ये सवलत आणि पुरवठ्यात वाढ करून दिली. याचवेळी कोरोनाच्या संकटात आरोग्य यंत्रणा, इतर विभागीय प्रशासन यंत्रणा आणि सामान्य लोकांची ‘कोरोनाविषयी क्षमता बांधणी आणि स्थानिक शासकीय यंत्रणेत अपेक्षित सुधारणा करणे’ या ‘साथी, पुणे’ संस्थेच्या प्रकल्पाच्या माध्यमातून कोरोनाविषयीच्या कामाला एप्रिल २०२० मध्ये सुरुवात झाली. या प्रकल्पा अंतर्गत पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात देखील ‘आरोहन’ संस्थेने गाव पातळीवर काम सुरू केले. त्यानुसार इतर विषयांप्रमाणेच रेशनविषयक माहिती ऑनलाइन पद्धतीने घेतली. तसेच जिथे शक्य आहे तिथे संपूर्ण काळजी घेऊन प्रत्यक्ष भेटीद्वारेदेखील माहिती घेतली. ही माहिती घेत असताना वेगवेगळ्या गावांमध्ये रेशन संदर्भात वेगवेगळ्या घटना, गोष्टी होत असल्याचे दिसून आले. त्यातीलच एक घटना समोर आली ती ‘खडखड’ या गावात.

कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून त्या कुटुंबाला मागील एक वर्षाचे २०० किलो मोफत धान्य मिळाले!
तर गोष्ट अशी होती की, खडखड गावातील गणेश रायकर यांच्या कुटुंबाला गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना एक वर्षापासून त्यांचे हक्काचे धान्य देण्यात आले नाही. मात्र अंगठ्याचे ठसे न चुकता दर महिन्याला घेतले जात आणि याचे कारण असे की,  त्यांनी रेशन कार्डमधील काही बदलांकरिता त्यांचे रेशनकार्ड रेशन दुकानदाराकडे ठेवले होते व दुकानदाराने अद्याप ते बदल करून परत दिले नाही. असेही समजले आहे की दुकानदाराने त्यांचे रेशनकार्ड हरविले आहे. गरीब अशिक्षित कुटुंब म्हटले की असा गैरफायदा नेहमीच घेतला जातो. परंतु संस्था कार्यकर्ता म्हणून आपलीही महत्त्वाची जबाबदारी ठरते याची जाणीव असल्याने ‘आरोहन’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गाव समिती सदस्य यांच्यासहित रेशन दुकानदाराची दुकानात त्वरित भेट घेतली. दुकानदार तर तिथे उपस्थित नव्हता मात्र त्याची पत्नी हजर होती. तिला गणेश रायकर यांच्या बाबतीत व्यवस्थित विचारले. तिने फारसे गांभीर्याने घेतले नाही. तसेच उडवा-उडवीची कारणे दिली. जसे की, ‘गणेश रायकर यांची दोन-तीन लग्न झाली आहेत. त्यामुळे घरात प्रत्येकाचे आधार कार्डदेखील वेगवेगळ्या नावाचे आहे. असे असताना कसे देणार त्यांना धान्य..?’ त्यांच्या या अशा उत्तरांना प्रत्युत्तर देत ‘आरोहन’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, काहीही असले तरी हे गावातील कायमचे रहिवासी आहेत. शिवाय त्यांचे रेशनकार्ड दुकानदाराने स्वत:कडे ठेवले तर ते परत देण्याची जबाबदारी देखील दुकानदाराची असते. याशिवाय शासनाच्या आदेशानुसार कोविड-१९ च्या काळातील मोफत धान्य तरी अशा लाभार्थींना दिलेच पाहिजे. अशा प्रकारचा दबाव आणल्यानंतर मात्र त्या दुकानदाराच्या पत्नीने पुढील दोन-तीन दिवसात धान्य वाटप होणार आहे  तेव्हा या कुटुंबाला देखील थोडेफार धान्य देऊ असे आश्वासन दिले. पण पुढे प्रश्न होता तो मागील एक वर्षापासून या कुटुंबाला धान्य न देता अंगठे मात्र घेतले जात होते. याबद्दल चौकशी करणे गरजेचे होते. नक्कीच काहीतरी घोळ असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे ‘आरोहन’ संस्थेच्या कार्यकर्त्या स्वत: तहसीलदारांना भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी लगेच रवाना झाल्या. परंतु त्वरित भेट न झाल्याने या पाठपुराव्यासाठी थोडा वेळ गेला. याच दरम्यान कार्यकर्त्यांनी गणेश रायकर यांना व्हॉट्सअपवर रेशनसंबंधित सर्व शासन निर्णय पाठविले व समजावून सांगितले. तसेच ‘श्रम मुक्ती’चे कार्यकर्ते यांचीही भेट घेण्यास सांगितले. ते देखील रेशन विषयावर काम करत असल्याने या प्रकरणात मदत करू शकतील असे सांगितले. त्यांच्या सहकार्याने सर्व कुटुंब सदस्यांची नावे रेशन संबंधित ऑनलाइन नोंदीत आहेत का हे तपासून घेतले. गणेश रायकर यांच्या कुटुंबीयांची नावे शासनाकडे नोंद आहेत व २०१९ पासून त्यांना रेशन देखील वेळच्या वेळी मिळत असल्याचे दिसत होते. या सर्व गोष्टींचा छडा लावणे खूप गरजेचे होते. शेवटी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी  गणेश रायकर यांना नवीन रेशन कार्ड मिळाले व त्यांनी एक अर्ज तयार करून त्यांच्याबाबत घडलेली सर्व बाब त्या अर्जात लिहिली. अखेर गणेश रायकर, एक ग्रामस्थ, व श्रम मुक्तीचे कार्यकर्ते असे सर्वजण तहसीलदारांकडे प्रत्यक्ष गेले व त्यांच्यासमोर दुकानदाराला दटावून विचारले असता त्याने स्वत:ची चूक कबूल केली. तसेच या गरीब कुटुंबाचे नुकसान झाले असल्याचे देखील कबूल केले. तहसीलदारांसमोर त्याने गणेश रायकर, यांना मागील एक वर्षाचे २०० किलो मोफत धान्य जे त्यांना मिळणे गरजेचे होते ते लगेचच त्यांना देतो असे कबूल केले. शिवाय दुसऱ्या दिवशीच सर्व धान्य या कुटुंबाला मिळाल्याची कार्यकर्तीने शहानिशा केली. अशाप्रकारे सर्व्हेच्या माध्यमातून का होईना पण एका गरजू कुटुंबाला त्यांचे हक्काचे अन्नधान्य मिळाले आणि त्यांची होणारी उपासमार थांबली..!

बेबीताई कुरबुडे या ‘आरोहन’ संस्था, ता. जव्हार, जि. पालघर येथे कार्यकर्ती म्हणून काम करतात.
रेशन न मिळालेल्या सदर गावकऱ्यांचे नाव बदलेले आहे.

[pvcp_1]

This work has been gratefully supported by Association for India’s Development (AID), Cleveland, USA.

SATHI

Contact Info

SATHI (Support for Advocacy and Training to Health Initiatives)

Address: Plot No.140, Flat No. 3 & 4, Aman E Terrace, Dahanukar Colony, Kothrud, Pune, 411038, Maharashtra, India.

Phone: +91 20 25473565 / 25472325 / 09422328578 / 09168917788



Connect Us

Related Info

Anusandhan Trust

Address: A-103 & B-103, First Floor, Moniz Tower, Yeshwant Nagar Road, Vakola, Santacruz (E), Mumbai 400 055, Maharashtra, India.

Phone: +91 22 26661176 / 26673571 

 

CEHAT (Centre for Enquiry Into Health and Allied Themes  

Website: www.cehat.org

© Copyright 2023 SATHI All Rights Reserved

Website Designed & Developed By Kalpak Solutions